
शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
अनेक वेळेला असे घडत असते, की आपली मते, आपले विचार, आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, इतरांबरोबर जुळत नाही. मग ते कुटुंबीयांबरोबर असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा मित्रपरिवारात असो आणि कधीतरी ही असहमती आपल्या संभाषणांमध्ये तणाव निर्माण करते, आणि कधीकधी, दोन व्यक्तींमध्ये गैरसमज आणि दुरावाही निर्माण करते.
आपण जेव्हा कुणाबरोबर असहमत होतो, तेव्हा खरेतर, आपल्या विचारांपेक्षा आपल्या भावना जास्त उत्तेजित होतात. आपले विचार समोरच्या व्यक्तीला पटावेत अशी आशा आणि अपेक्षा आपण करत असतो आणि ही अपेक्षा पूर्ण होत नाही, तेव्हा आपले मन अस्वस्थ होते.
कारण आपल्या विचारांपेक्षा भिन्न विचार कसा हाताळायचा, या कोड्यात आपले मन हरवलेले असते आणि मग या कोड्यातून कसे बाहेर पडायचे हे कळत नाही, तेव्हा आपण ‘डिफेन्सिव्ह’ होतो आणि मग आपल्यात असहमतीतून गैरसमज आणि तणाव निर्माण होतो.
प्रत्येक व्यक्तीला विचारस्वतंत्र्य असते, हे लक्षात घेऊन, आदरयुक्त असहमती व्यक्त करणे, हेही उच्च भावनिक बुद्धिमत्तेचे एक लक्षण आहे.
खरे तर आपल्या सर्वांनाच, आपल्या विचारांना विनासंघर्ष, सहजपणे मांडता यावे ही एवढी एकच ‘मूलभूत गरज’ असते आणि ही गरज ‘नैसर्गिक’ आहे. यालाच आपण विचारांची देवाणघेवाण असेही म्हणतो; पण जेव्हा ‘माझा विचार हाच फक्त बरोबर विचार’ अशी समजूत आपण करतो, तेव्हा आपला विचार सर्वांनी मान्य करावा ही आपली ‘अपेक्षा’ बनते आणि मग या अपेक्षेतून आपण इतरांच्या ‘विचारांचा’ आणि त्यामागील ‘भावनांचा’ नकळत अनादर करतो. म्हणून, आदरयुक्त असहमतीमधून वैचारिक भिन्नता जोपासणे, हेही जीवनातील एक आवश्यक कौशल आहे.