
Catfish Discovery : शिंगळा माशाच्या नव्या प्रजातीचा शोध
नवी दिल्ली : भारतीय-जर्मन संशोधकांच्या पथकाने केरळमध्ये शिंगळा(कॅटफिश) माशाची नवी प्रजाती शोधली आहे. हा मासा अवघ्या ३२ मि.मी. आकाराचा असून डोळे नसलेल्या या माशाचे शरीर रक्तविरहीत आहे. संशोधकांनी कॅटफिशच्या होराग्लॅनिस प्रजातीचा अभ्यास केला आहे. नवीन प्रजातीला ‘होराग्लॅनिस पोप्युली’ असे नाव दिले आहे.
या प्रजातीतील माशांचा आकार अवघा तीन सेंमी असून ते स्थानिक जलाशयात प्रकाशाशिवाय राहतात. व्यापक नागरिक-विज्ञान प्रकल्पाचा भाग असलेले हे संशोधन ‘व्हर्टिब्रेट झूऑलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
सेनकेनबर्ग नॅचरल हिस्ट्री कलेक्शन्सचे संशोधक राल्फ ब्रिट्झ म्हणाले, की सध्या जगभरात भूगर्भातील जलीय अधिवासात माशांच्या २८९ प्रजाती राहत असल्याची माहिती आहे. त्यापैकी दहा टक्क्यांपेक्षा कमी प्रजाती भूगर्भातील खडकाच्या स्तरात भूजल असलेल्या ठिकाणी आढळतात.
या जवळजवळ अज्ञात संरचेतून माहिती मिळविण्यासाठी आम्ही केरळमधील जलवाहक लॅटराइट खडकाचाच्या थराचा आणि त्यातील माशांचाही अभ्यास केला. शिंगळा माशाची होराग्लॅनिस पोप्युली ही प्रजाती केवळ भूगर्भात खडकांच्या थरातच आढळते.
हा मासा आकाराने अतिशय छोटा, अंध असून त्यांच्यात रंगद्रव्याचाही अभाव असतो. या प्रजातीविषयी कागदोपत्री फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. विहीर जेव्हा खोदली किंवा साफ केली जाते, तेव्हाच हे छोटे मासे पृष्ठभागावर येतात, असेही त्यांनी नमूद केले.
कोची विद्यापीठातील संशोधक राजीव राघवन आणि दिल्लीतील शिव नादर इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्समधील संशोधक नीलेश डहाणूकर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. यात संशोधकांना स्थानिक संशोधकांचीही मदत झाली.
सुमारे सहा वर्षांच्या कालावधीत संशोधकांनी केरळमधील अनेक ठिकाणी विविध समुदायाशी अनौपचारिक संवाद साधला. गटचर्चा, कार्यशाळांवरही त्यांनी भर दिला. संशोधकांनी विहिरी, जमिनीवरील साठवण टाक्या, पाणथळ जागा, जलवाहिन्या, घरातील बागा तसेच शेत, तलाव आणि गुहांत या माशाबाबत संशोधन केले. या संशोधनामुळे नव्या ४७ ठिकाणे व ६५ नवीन आनुवंशिक संचासह नवीन डेटा जमविण्यात यश आले.
लाखो वर्षांच्या उत्क्रांतीनंतरची आनुवंशिक विविधता हे या प्रजातीचे वैशिष्ट्य असले तरी माशांचे स्वरूप फारसे बदलले नाही. ‘होराग्लॅनिस पोप्युली’ ही प्रजाती होराग्लॅनिसच्या यापूर्वीच्या ज्ञात तीन प्रजातींपेक्षा वेगळी आहे. होराग्लॅनिस माशाबद्दलचे आमचे संशोधन सार्वजनिक सहभागामुळे सहजतेने पोचता न येणाऱ्या अधिवासात राहणाऱ्या सजीवांबद्दलचे आमच्या ज्ञानात मोलाची भर कशी पडू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे.
- राल्फ ब्रिट्झ, संशोधक