चांगुलपणातले‘आनंद तरंग’

आयुष्यात छोटे छोटे प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. परवा सकाळी मला असा एक अनुभव आला. वाटलं, की मैत्रिणी, तुझ्याबरोबर हे शेअर करायलाच हवं. मी सकाळी ॲपवर रिक्षा बुक केली. रिक्षाचे चालक रस्त्याच्या समोरच्या बाजूला उभे होते. त्यांनी अंदाजानं मीच रिक्षा बुक केली असावी हे ओळखून मला हात केला.
चांगुलपणातले‘आनंद तरंग’
चांगुलपणातले‘आनंद तरंग’sakal
Updated on

-तू फुलराणी

डॉ. समीरा गुजर-जोशी

आयुष्यात छोटे छोटे प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. परवा सकाळी मला असा एक अनुभव आला. वाटलं, की मैत्रिणी, तुझ्याबरोबर हे शेअर करायलाच हवं. मी सकाळी ॲपवर रिक्षा बुक केली. रिक्षाचे चालक रस्त्याच्या समोरच्या बाजूला उभे होते. त्यांनी अंदाजानं मीच रिक्षा बुक केली असावी हे ओळखून मला हात केला. माझ्या नेहमीच्या जागी रिक्षा नव्हती, मला किंचित आश्चर्य वाटलं; पण मी रिक्षेत बसताच त्यांनी स्पष्टीकरण दिल, की मला रास्ता क्रॉस करावा लागला; पण मला ज्या दिशेला जायचं होतं, त्या बाजूला त्यांनी रिक्षा लावली होती. सकाळच्या ऐन ट्रॅफिकच्या वेळी माझी काही मिनिटं वाचावी म्हणून त्यांनी असं केलं. मला रस्ता क्रॉस करावा लागला म्हणून त्यांनी माफीही मागितली. त्यांचं बोलणं अतिशय गोड, आदबशीर होते. मी त्यांना दाद देत म्हटलं, ‘‘तुम्ही नका सॉरी म्हणू. आणि तुमच्यासारखी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं फार कमी आढळतात.’’ ते माझे शब्द ऐकून खूश झाले असावेत. मनापासून म्हणाले, ‘‘ मला एवढंच माहिती आहे, की आपण समोरच्याला आनंद द्यावा. कर भला तो हो भला.’’

मग ते त्याचे अनुभव सांगू लागले. म्हणाले, ‘‘कालचीच गोष्ट, एका बाईंकडे खूप सामान होतं. मी त्यांना मदत करावी म्हणून रिक्षा अगदी आतपर्यंत आणली... त्यांच्या दोन पिशव्या लिफ्टपर्यंत नेऊन ठेवल्या. त्या इतक्या खूश झाल्या. किती छोटीशी गोष्ट; पण त्यांना आनंद देऊन मलाच जास्त आनंद झाला.’’ मीही त्याच्या गप्पांमध्ये रमले. इतक्यात त्यांनी असं काही सांगितलं, ज्याची मी अजिबात कल्पना केली नव्हती. ते म्हणाले, ‘‘माझा एक नियम आहे. मी रात्री शेवटचे भाडे सोडून घरी जायला निघतो, तेव्हा माझ्या परतीच्या वाटेवर कोणी ना कोणी मला रस्त्यात हात दाखवतं. त्या व्यक्तीला माझ्याच दिशेनं जायचं असतं; पण तेव्हा मी त्यांना अगदी त्यांच्या इच्छित स्थळी सोडू शकत नसतो. अशावेळी बाकीचे रिक्षावाले काय करतात? भाडे घ्यायला नाही म्हणतात. मी तसं करत नाही. मी माझ्या घरापर्यंतच्या टप्प्यावर त्यांना दुसरी रिक्षा मिळेल अशा ठिकाणी त्यांना सोडतो आणि याचे मी पैसे घेत नाही. इतका आनंद होतो सवारीला! मला दुवा देत घरी जातात. माझा दिवसही छान संपतो. ते आनंदित होतात; पण त्यांच्यापेक्षा मी जास्त आनंदित होतो.’’ त्यांच्या स्वरांतून त्याचा खराखुरा, प्रामाणिक आनंद जाणवत होता. त्यांनी मला माझ्या ठिकाणी सोडलं खरं; पण त्यांचे शब्द मला दिवसभर आठवत राहिले.

आनंदाचा किती सोपा आणि सुंदर मंत्र गवसला होता त्यांना! दुसऱ्यासाठी काहीतरी करणं आणि तसा नियम स्वतःला घालून घेणं ही फारच फलदायी गोष्ट आहे. समोरच्यासाठी ती उपकारक असतेच; पण नकळत आपण स्वतःचाही लाभ घडवून आणतो. आता हा रिक्षावाल्या चालकांचा नियम बघा. हा नियम नाहीच, तर आनंदाचं व्रत आहे. आपल्या संतांनी आपल्याला हेच सांगितलं, ‘‘सदाचार हा थोर सांडू नये तो। जनी तोचि तो मानवी धन्य होतो.’’ आधुनिक मानसशास्त्रही आपल्याला हेच सांगतं. मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो, की आपल्या गरजा तात्पुरत्या बाजूला ठेवून दुसऱ्याच्या गरजेला प्राधान्य देणं यालाच आपण दयाळू वृत्ती असं म्हणतो. असं दयाळूपणे वागल्यानं काय होतं? तर त्यानं आपला तणाव कमी व्हायला मदत होते. आपलाच मूड छान होतो आणि आपली स्वप्रतिमा (सेल्फ एस्टीम) सुधारते. सगळ्याचा फायदा म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं. कुणासाठी तरी आपण आनंद निर्माण करू शकलो, की आयुष्य आपल्या ताब्यात आहे असं वाटून आपला आत्मविश्वास वाढतो. या गोष्टी किती अनमोल आहेत.बरं यासाठी खूप पैसा खर्च करायला हवा किंवा खूप वेळ द्यायला हवा असंही नाही.

थोडं डोळसपणे पाहिलं, तर चांगलं वागण्याच्या संधी आपल्या आसपासच असतात. एखाद्या गर्भवती स्त्रीला किंवा ज्येष्ठ व्यक्तीला बसमध्ये उठून जागा देणं असेल, घरपोच सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीला पाणी विचारणं असेल, इतक्या छोट्या गोष्टीही आनंदाचं कारण ठरू शकतात; पण कुणा विद्वानानं यासाठी काही नियमसुद्धा घालून दिले आहेत. तेही विचार करण्याजोगे आहेत - तुम्हाला सहज शक्य असेल अशी आणि तुमच्या आवडीची गोष्ट करा. ओढाताण होऊन केलेली कृती तुम्हालाही धड आनंद देणार नाही आणि समोरच्यालाही. एखाद्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी असेल तर जरूर करा; पण यातलं काहीही करताना स्वार्थ साधणं, कौतुक होणं किंवा आणखी काही अपेक्षा न ठेवता निखळ आनंदासाठी हे करायला हवं. जग ही एक ‘आनंदाची पेठ’ बनावी यासाठी आपण हा खारीचा वाटा उचलत आहोत याचा विसर पडू देऊ नये आणि चांगल्या गोष्टीचाही अतिरेक वाईट हेही ध्यानात असू द्यावं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.