

Dr Smita Prakash Joshi counseling advice
sakal
डॉ. स्मिता प्रकाश जोशी समुपदेशक
प्रश्न : मी एक उच्चशिक्षित गृहिणी आहे. पूर्वी मी नोकरी करत होते. परंतु घरची जबाबदारी आणि मुलांचे शिक्षण याकडे लक्ष देण्यासाठी मी नोकरी सोडण्याचा विचार केला. आता मुले मोठी झाली आहेत, त्यांच्या विश्वात रमली आहेत. माझे पती त्यांच्या करिअरमध्ये गुंतले आहेत. पती जेव्हा घरी असतात तेव्हा त्यांचा संपूर्ण वेळ त्यांच्या आई-वडिलांसाठी आणि उरलेला वेळ मुलांसाठी असतो. माझे आजारपण, माझ्या गरजा, याकडे त्यांचे कधीच लक्ष नसते. माझे मी करण्यास सक्षम आहे, असे त्यांना वाटते. माझ्या मानसिक गरजा पूर्ण होत नाहीत. मला आता जगावे की नको असे वाटू लागले आहे. आपली कुणालाच किंमत नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. मी खूप नैराश्यात आहे.
उत्तर : तुम्ही मांडलेली व्यथा अनेक स्त्रियांची आहे. अजूनही बहुसंख्य घरांमध्ये मुले सांभाळणे, संसाराकडे लक्ष देणे, ही जबाबदारी स्त्रीचीच असते. त्यामुळे मुलांसाठी आपल्या करिअरशी तडजोड करण्याचे धाडस स्त्रीलाच करावे लागते. खरेतर बदलत्या परिस्थितीत ही जबाबदारी नवरा-बायको दोघांनी घ्यायला हवी आणि दोघांचेही करिअर करताना मुलांचा सांभाळ कसा करायचा याचे नियोजन करायला हवे. दोघांनी एकमेकांना मदत करण्याचे ठरवले तर मार्ग निघू शकतो. तुमच्या बाबतीत तुम्ही मुलांसाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु आता ती मोठी झाल्याने ती त्यांच्या विश्वात रमली, तर पती त्याच्या करिअरमध्ये. त्यामुळे तुमच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे. पण तुम्हाला निराश होऊन चालणार नाही. बऱ्याच वेळा आपण स्वतःच प्रश्न निर्माण करतो आणि त्यात गुंतून राहतो. पतीने तुमच्या मानसिक गरजांचा नक्कीच विचार करणे जरुरीचे आहे. तुम्हाला वेळ देणे, सुट्टीच्या दिवशी तुमच्याबरोबर बाहेर फिरायला जाणे, अशा गोष्टींत पुढाकार घेणे गरजेचे आहे. ते वेळ देत नाहीत याची तुम्हाला खंत आहे. एक लक्षात घ्या, की आपण दुसऱ्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही, पण स्वतःमध्ये नक्की बदल करू शकतो. स्वतःवर प्रेम करायला शिका. अजूनही तुम्ही स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू शकता. भरभरुन जगण्यासारखे आयुष्यात खूप काही आहे. आपला आनंद आपणच मिळवायचा. दुसरे कुणी आपल्याला समजून घेईल आणि आनंद देईल ही अपेक्षा असली, तरी अट्टहास नको. मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये छान रमण्याचा प्रयत्न करा. इतर विविध उपक्रमांत स्वतःला गुंतवून घ्या. या प्रक्रियेत नैराश्य निघून जाईल. योग्य वेळी पतीला समुपदेशकांकडे येण्याबाबत विनंती करा. तुम्ही सांगितलेले त्यांना पटत नसेल, पण बऱ्याच वेळा सोनाराने कान टोचलेले बरे असतात! त्यामुळे समुपदेशकांशी बोलणेही गरजेचे आहे.