हॅप्पी पेरेंटिंग : सौंदर्यदृष्टी

मुलांचं, विशेषतः शिशुवयातलं विश्व, हे अगदी ताजेतवानं, नावीन्यपूर्ण आणि सुंदर असतं; पण दुर्दैवानं मूल मोठं होत जातं, तसतसं ज्ञान आणि व्यवहाराच्या खिडक्या- दरवाजांमध्ये हे सुंदर जग बंदिस्त होत जातं.
Parents
ParentsSakal

मुलांचं, विशेषतः शिशुवयातलं विश्व, हे अगदी ताजेतवानं, नावीन्यपूर्ण आणि सुंदर असतं; पण दुर्दैवानं मूल मोठं होत जातं, तसतसं ज्ञान आणि व्यवहाराच्या खिडक्या- दरवाजांमध्ये हे सुंदर जग बंदिस्त होत जातं. रॅचेल कार्सननं ‘द सेन्स ऑफ वंडर’मध्ये म्हटल्याप्रमाणे जर वस्तुनिष्ठ माहिती ही उद्याच्या ज्ञानाची आणि चातुर्याची बीजं असतील, तर भावना आणि पंचेंद्रियांच्या संवेदना म्हणजे ती सुपीक जमीन आहे. त्यात या बीजांची वाढ होईल आणि मग कुतूहल, कल्पनाशक्ती आणि कलात्मकता या गुणांनी युक्त अशी सौंदर्यदृष्टी (Aesthetic sense) विकसित होईल.

आपल्याकडे शिक्षणक्षेत्रात सौदर्यदृष्टी म्हणजे कला, संगीत आणि नृत्य या अभ्यासेतर विषयांच्या आवडीपुरतीच मर्यादित आहे. पण सौंदर्यदृष्टी अगदी गणितातसुद्धा असू शकते. ‘३६’च्या आकड्यातला रचनात्मक आणि अर्थात्मक विरोधाभास कळणं ही सौंदर्यदृष्टीच. वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास करताना जगदीशचंद्र बोस यांना वनस्पतींनाही भावना असतात हे जाणवणं ही सौंदर्यदृष्टीच.

मोबाईलसारखी सपाट वीट जेव्हा स्टीव्ह जॉब्जसारख्या सौंदर्यदृष्टी असलेल्या संगणकतज्ज्ञाच्या हातात येते, तेव्हा आयफोनसारखं सुंदर; पण बहुविध उपयोगांनी सज्ज असं जगाला वेडं करणारं साधन तयार होतं. आपल्या मुलांमधील सौंदर्यदृष्टी जिवंत ठेवायची, विकसित करायची असेल तर...

  • मुलांची उत्सुकता दाबून न टाकता त्यांच्या उत्सुकतेला व्यक्त करायला वाव द्या.

  • मुलांच्या भन्नाट विचारांना शब्दांनी, हावभावांनी प्रकट करायला संधी द्या. गोष्टी, चित्रं, बडबडगीतं स्वतःच्या मनाप्रमाणे तयार करायला प्रोत्साहन द्या.

  • चित्रं रंगवताना मनातले आकार- रंग कागदावर उतरू द्या. कॉपी-पेस्ट नकोच!

  • निसर्गातून फिरताना चहाचा ब्रेक नसला तरी चालेल; पण एखादा सुंदर पक्षी, रंगांची उधळण करणारा सूर्यास्त रसिकतेनं अनुभवण्याचा ब्रेक हवाच.

  • शास्त्रीय प्रयोगसुद्धा सुंदर बनवता येईल. आकाशातलं इंद्रधनुष्य, त्रिकोणी लोलकातून प्रकाशकिरण जातो, तेव्हा घरातल्या भिंतीवर उतरतं हे सौंदर्यच.

  • दुर्दैवानं सध्याचं जाहिरातीचं जग चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांचं ‘सौंदर्य’, तेसुद्धा बऱ्याच वेळा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडून दाखवण्यात आनंद मानतं; पण आईस्क्रीम खाताना आपल्याच चिमुरड्याचं निखळ हास्य किती सुंदर असतं हे अनुभवून बघा.

नेहमीचंच काम, नेहमीचाच अभ्यास मनापासून करणं, ते नीटनेटकं नजाकतीनं करणं ही सौंदर्यदृष्टीच. पालकमित्रांनो, ‘चौकट राजा’ चित्रपटातलं ‘हे जीवन सुंदर आहे’ हे गाणे नक्की ऐका, पाहा, मुलांना दाखवा! खरंच, जीवन सुंदर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com