हॅप्पी पेरेंटिंग : मुलांची ‘इकिगाई’

इकिगाई’ म्हणजे जपानी भाषेत ‘जगण्याचा अर्थ!’ आता या जड संकल्पनेचा आपल्या मुलांसाठी काय उपयोग?
Happy Parenting
Happy ParentingSakal

इकिगाई’ म्हणजे जपानी भाषेत ‘जगण्याचा अर्थ!’ आता या जड संकल्पनेचा आपल्या मुलांसाठी काय उपयोग? कल्पना करा, की आपल्या जीवनाचे यश एका मोठ्या चौकात आहे- जिथे चार रस्ते एकत्र येऊन मिळतात. एक रस्ता आहे- जो आपल्याला मनापासून आवडते ते करण्याकडे नेतो. दुसरा रस्ता आपल्याला ज्यात अंगभूत कौशल्य आहे ते करण्याकडे जातो.

तिसरा रस्ता जगाच्या/ आजूबाजूच्या लोकांच्या आपल्याबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे नेतो, तर चौथा रस्ता आपल्याला कीर्ती, कौतुक आणि पैसा मिळवून देतो. आता एखाद्या व्यक्तीनं त्याच्या आवडीच्या गोष्टीमध्ये कौशल्य प्राप्त केलं असेल, त्यात त्याचं काम समाजाच्या गरजेचं असेल आणि त्यासाठी त्याला कौतुक, पैसेही मिळत असतील, तर त्याला त्याची ‘इकिगाई’ सापडली आहे. जगण्याचा अर्थ कळल्याचं सचिन तेंडुलकर हे एक ‘बेस्ट’ उदाहरण.

सध्या मात्र दुर्दैवानं भलंमोठं ‘पॅकेज’, चकचकीत राहणीमान आणि त्यासाठी लागणारं ठोकळेबाज शिक्षण एवढंच महत्त्वाचं राहिलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी वयाच्या दहा-बारा वर्षांपासून मुलांना रेसचे घोडे बनवायला सुरुवात होते. त्यांना काय आवडतं, त्यांच्यात काय अंगभूत कौशल्यं आहेत याचा विचारच केला जात नाही. शिक्षण, नोकरी यशस्वी सुरू होते; पण आनंद मिळत नाही. पालकमित्रांनो, आता तुम्हाला ‘मुलांची इकिगाई’ का शोधायची, याची गरज जाणवायला लागेल. अर्थातच हा एक दिवसाचा खेळ नाही. त्यासाठी सुरुवात मात्र लवकरच्या वयात (साधारणतः दहा-बारा वर्षं) केली पाहिजे.

१) आपल्या मुलांच्या आवडीनिवडी समजून घेऊ; मात्र त्यांना मनापासून काय करायला आवडतं ते शोधू यात. सुदर्शन पटनाईक हा साधा मदतनीस म्हणून काम करायचा. त्याला वाळूत खेळणं आवडायचं. आता तोच त्याच्या वालुकाशिल्पांसाठी जगप्रसिद्ध‌ आहे.

२) रोजच्या जीवनात, अभ्यासात, खेळात, कलावर्गात आपल्या मुलाला कशात गती आहे? गीतांजली राव या १६ वर्षांच्या मुलीनं पाण्यातील शिशाचं प्रमाण मोजण्याचं यंत्र बनवलं.

३) समाजाची ‘आजची, अजून दहा वर्षानतेची गरज काय आहे?’ याचा अभ्यास करू या. कदाचित आज संगणक क्षेत्राची चलती असेल; पण दहा वर्षांनी इंधन-समस्या, जागतिक तापमान, आणि माणसांनी माणसांची काळजी घेणं महत्त्वाचं बनेल. हे समजून घेऊ या आणि मुलांच्या आवडीनिवडी, कौशल्यं लक्षात घेऊन तशी छोटी मोठी ध्येयं दिली पाहिजेत.

४) मुलांना पैसे कसे कमवायचे हे शिकवायला वेळ आहे; पण पैशांची किंमत आणि पैसे सांभाळायला शिकवायची सुरुवात तर केलीच पाहिजे. या चारही आघाड्यांवर आपण मुलांना दिशा दाखवू शकलो, तर मुलांना त्यांची ‘इकिगाई’ नक्की सापडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com