
गेल्या काही वर्षांत ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना विशेषतः शहरांमध्ये चांगलीच फोफावली आहे. विशेषत: सॉफ्टवेअर क्षेत्रात तर ‘न्यू नॉर्मल’ झालीय.
हॅप्पी पेरेंटिग : वर्क फ्रॉम होम... आहे मनोहर, तरीही!
गेल्या काही वर्षांत ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना विशेषतः शहरांमध्ये चांगलीच फोफावली आहे. विशेषत: सॉफ्टवेअर क्षेत्रात तर ‘न्यू नॉर्मल’ झालीय. सुरुवातीला त्यात सगळ्यांनाच फायदे दिसत होते : जंतूसंसर्ग नाही, रोजचा प्रवास नाही, वेळेचे टेन्शन नाही, बॉसची कटकट नाही, बाहेरचे अन्न खावे लागत नाही, कंपनीच्या दृष्टीने ऑफिस सांभाळण्याचा खर्च नाही आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे छोट्या कुटुंबपद्धतीत मुलांवर लक्ष ठेवणे, मुले सांभाळणे एकदम सोप्पे झाले!
पालकांसाठी तोटे : पण ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणतात तसं, जसजशी ही कामाची व मुलं सांभाळण्याची पद्धत रोजचीच व्हायला लागली, तेव्हा फायद्यांबरोबर त्यातले तोटेही जाणवू लागले. कामाचा बोजा कमी न होता, वाढू लागला. एके काळी नऊ ते पाच अशी आठ तासांची नोकरी आता रात्री अकरा-बारा वाजेपर्यंत चालूच राहायला लागलीय. एके काळी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी भांडणारे नवरा-बायको आता एकमेकांशी भांडायला लागलेत. समोरासमोर असूनही दोघंही जण संगणकात डोकं खुपसून बसलेले असतात. जेवणाखाण्याच्या वेळांचं स्वातंत्र्य जरा वेगळ्या प्रकारे म्हणजे ‘पोट सुटणं’, पचनाच्या तक्रारी यातून जाणवायला लागलंय.
मुलांसाठी तोटे : मुलांसाठी आई-बाबा समोर दिसणं हे आनंददायक असलं, तरी प्रत्यक्षात मुलांबरोबर खेळायला मात्र आई-बाबांना वेळ नसतो हे जरा त्रासदायकच ठरतंय. काही वेळा आई-वडील सारखे ‘डोक्यावर बसलेले’ असणं हेही मुलांसाठी कटकटीचं बनू लागलंय. शिशूवयातल्या मुलांसाठी तर घरी बसलेले आई-वडील हे हक्काचे नोकर बनू लागलेत. सकाळपासून झोपी जाईपर्यंत सगळेच घरात राहण्यानं प्रेम वाढण्याऐवजी भांडणंच वाढू लागली आहेत. आई-बाबा आपल्यासाठी कष्ट करून पैसे कमवत आहेत, याची जाणीव मुलांना होत नसल्याचं दिसतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं समाजात वावरणं कमी होत चाललंय.
सोपे उपाय - एवढं सगळं असलं, तरी ‘वर्क फ्रॉम होम’ हे वास्तव आहे. थोडं ‘डोकं’ (!) लावलं, तर त्यातूनही ‘स्मार्ट पालकत्व’ करता येईल :
1) थोडं ‘घरून’, थोडं ‘ऑफिस’मध्ये जाऊन ‘हायब्रीड’ काम केलं, तर काम आणि कुटुंब यातलं संतुलन राखता येईल.
2) घरून काम करताना त्यासाठी वेगळी खोली, वेगळा कोपरा ठेवता आला, तर मुलांना हळू हळू त्याचा अर्थ कळू शकेल.
3) आई-वडिलांनी स्वतःच्या कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवल्या, उदाहरणार्थ- आईनं काम लवकर सुरू करून लवकर संपवलं आणि बाबांनी उशिरा सुरू करून उशिरापर्यंत सुरू ठेवलं, तर त्यातून मुलांना एकतरी पालक ‘मोकळा’ मिळेल.
4) ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे वेळेचं बंधन नाही, हा गैरसमज आहे. त्याउलट वेळेचं नियोजन जास्त अचूकपणे करावं लागतं- तेही स्वतःचं स्वतः! त्यात मध्ये मध्ये मुलांच्या शाळा- क्लासच्या वेळांचा अंदाज घेऊन ‘ब्रेक’ घेतले, तर नक्कीच उपयोगाचे!
5) संपूर्ण कुटुंबानं मुद्दामहून रोज मोकळ्या हवेत जाणं, खेळणं, समाजात/ मित्रमैत्रिणींमध्ये जाणीवपूर्वक वेळ देणं हा नियम केला पाहिजे.
6) दोघंही आई-वडील कामात असतील, तर मुलांना सांभाळण्यासाठी एखादी मदतनीस तरी हवी, नाहीतर पाळणाघराचा मार्गही उपयुक्त ठरू शकतो. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या गोंधळात घराचं ऑफिस होऊ न देता ‘घराचं घरपण’ टिकवलं पाहिजे.