
स्मिता शेवाळे - अभिनेत्री
या पुरवणीत खरोखरच्या माझ्या मैत्रिणी मृण्मयी देशपांडे, जुई गडकरी आणि अश्विनी आपटे याही लेख लिहितात. लिहिताना बऱ्याचदा आपण आपल्याला जसे उमजत जातो, तसंच त्यांच्या लेखातून माझ्या या मैत्रिणीही मला अधिक उलगडत आहेत. त्यांच्यामध्ये असलेली संवेदनशीलता, सर्जनशीलताही वाखाणण्याजोगी आहे. मागे एका लेखांमध्ये अश्विनीनं सांगितलं होतं, की तिनं एक असा बॉक्स केला आहे, की त्यामध्ये आनंदाच्या गोष्टींच्या चिठ्ठ्या लिहून ती त्या जमा करते. मला ही कल्पना इतकी आवडली, की मीसुद्धा आता हे करायला सुरुवात केली आहे. आपल्याला एखादा आनंदाचा क्षण आठवायला सांगितला तर बराच वेळ लागतो. दुःख मात्र आपण कवटाळून बसतो. हे आनंदाचे क्षण आपण खरंतर टिपायला हवेत आणि आठवणीतून पुनःपुन्हा ते जगायलाही हवेत. या आनंदाच्या क्षणांची उजळणी करण्यासाठी हा आनंदाचा बॉक्स खरच खूप चांगला आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहण्याने आपण ते क्षण दुपटीनं वाढवत जाऊ शकतो याचा प्रत्यय मला आला.