

Mental Health
sakal
सावनी देशपांडे,समुपदेशक
मानसिक समस्यांवर समुपदेशन घेताना पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या सहभागाबद्दल फारशी जागरूकता नाहीये. त्याची कारणे अनेक आहेत. मानसिक समस्यांबद्दल उघडपणे बोलले जात नाही आणि त्याकडे सकारात्मकतेने बघितलेही जात नाही. अनेकदा पीडित व्यक्ती पूर्णपणे बरी होऊ शकते, असा विश्वास कुटुंबीयांना वाटत नाही. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींची पूर्णपणे माहिती न देता त्यांचे विवाह करून दिले जातात, त्यातून समोरच्या व्यक्तीचे आयुष्य पणाला लागते. आपला विश्वास बसत नसला, तरी आजसुद्धा अनेक ठिकाणी मानसिक आजार हे काळी जादू, नजर लागणे, भूतबाधा अशा कारणांमधून होत असल्याचा समज आहे. असे विविध गैरसमज आणि ‘सामाजिक प्रतिष्ठे’चा विचार, यांपायी रुग्ण डॉक्टरांकडे उशिराच पोहोचतात. परंतु रुग्णाच्या कुटुंबीयांना आजाराबद्दल व्यवस्थित माहिती दिली, त्यांची भूमिका समजावून दिली, तर ते रुग्णाला नक्की मदत करू शकतात.