
आपल्याला सवय असते अशा प्रसंगांची. खासकरून मुलं लहान असतील, तर हमखास हा अनुभव येतोच येतो. मोठ्यांचा त्रागा होतो आणि मुलं एकतर घाबरतात किंवा ‘यांचं हे रोजचच आहे’ असं म्हणून आपली मजा पाहतात.
‘पालन’गोष्टी : आवराआवरीचं ‘मदत’तंत्र
- फारूक काझी
प्रसंग १
‘किती कचरा करून ठेवलाय? सगळं घर म्हणजे कचराकुंडी झालीय...’ आई खूप वैतागून बोलत होती. आणि छोटी खुशी ऐकून न ऐकल्यासारखं करून हसत होती.
प्रसंग २
‘तुला तुझ्या वस्तू उचलून ठेवण्याची अक्कल नसेल तर तू काहीच करत जाऊ नकोस,’ बाबा मोठ्याने ओरडले. लहानगा कबीर घाबरून गेला. आणि त्याने तिथून चटकन काढता पाय घेतला.
आपल्याला सवय असते अशा प्रसंगांची. खासकरून मुलं लहान असतील, तर हमखास हा अनुभव येतोच येतो. मोठ्यांचा त्रागा होतो आणि मुलं एकतर घाबरतात किंवा ‘यांचं हे रोजचच आहे’ असं म्हणून आपली मजा पाहतात. मग तर आपली चिडचिड आणखीच वाढते. कारण आपल्याला तो आपला अपमान वाटतो. ‘मुलांनी आपलं नेहमीच ऐकलं पाहिजे’ हा एक अहंभाव आपण बाळगून असतो. मुलं त्याला अध्येमध्ये सुरुंग लावत असतात.
घरात मुलं लहान असतात, तेव्हा थोडा कचरा, थोडी चिकचिक होणारच. त्याचा मोठा बाऊ आपण करावा का? तुमचं उत्तर ‘नाही’ असं असेल, तर तुम्ही समजूतदार व्यक्ती आहात. याचं कारण लहान मुलं सतत काहीतरी करून पाहत असतात. त्यांच्या कृतिशील हातांना आणि सृजनशील मेंदूला सतत काहीतरी करून पाहायचं असतं. ते फार जोखमीचं नसेल तर करू द्यावं. हे सर्व करताना कचरा होणं, वस्तू इकडेतिकडे पडणं, सांडणं, अंथरुण विस्कटणं, वस्तूंची जागा बदलणं असलं काहीबाही घडत राहतं. तेव्हा उगीच चिडून किंवा स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा एक पाऊल आपणच टाकायला हवं. आपण मिळून ते सर्व काम करायला मुलांना शिकवायला हवं. हेही एक प्रकारचं शिकणंच असतं.
मुलांनी एखादी कृती केली आणि काम झालं तर मागे जो काही पसारा पडलेला असतो, तो कुणी उचलायचा? ‘साहजिकच आईनं किंवा बाबांनी!’ असंच मुलं म्हणतील. इथं मुलांना आपण हे पटवून दिलं पाहिजे, की हे काम फक्त एकट्या आईचं किंवा बाबांचं नाही. ते काम सर्वांनी मिळून करायचं आहे. ‘कचरा कुणी केला? मग तूच उचलायला पाहिजेस’ असं दरडावून काम नाही चालणार. मुलं लहान आहेत तर त्यांना मिळून काम करण्याची सवय लावूया. पुढे त्यांची कामं ती स्वत: करतील.
मिळून काम केलं, की मुलांना मजा वाटते, पालकांचा कामातला सहभाग त्यांचा उत्साह वाढवतो. चुकारपणा न करता काम केलं पाहिजे, हे मुलं आपोआप शिकतात आणि असे प्रसंग पालक आणि मुलांना एकत्र आणण्याचं काम करतात. आपल्या नात्याला अशा प्रसंगांची नितांत गरज असते. एकमेकांना समजून घेऊन काम करण्याचं हे प्रशिक्षणच असतं.
यातूनच मुलांना आपलं काम झालं, की वस्तू जागेवर ठेवावी, कचरा स्वच्छ करावा आणि जे काम करावं ते मन लावून करावं हे शिकायला मिळतं. याकडे पालक म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि मुलं स्वत:हून काम करत असताना आपल्या सूचनांचा अलार्म सारखा वाजता न ठेवता मुलांच्या कामाचं निरीक्षण करावं. गरज असेल तिथंच पुढं व्हावं. मुलांच्या शिकण्यात सहभागी व्हायचं आहे, अडसर नव्हे!
घर आवरणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. तेव्हा मिळून काम करण्याचा आनंद घेत आपण मोठं व्हायचं आहे. शिकत शिकत पुढं जायचं आहे. बालक आणि पालक म्हणूनही!