‘पालन’गोष्टी... : आधी ‘आपण’ ऐकायला शिकू या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Family

‘माझं ऐकून तर घ्या आधी...’ आदी बाबांना पुनःपुन्हा सांगत होता; पण बाबा मात्र स्वत:चंच बोलणं रेटत होते.

‘पालन’गोष्टी... : आधी ‘आपण’ ऐकायला शिकू या!

- फारूक एस. काझी

प्रसंग १ - ‘माझं ऐकून तर घ्या आधी...’ आदी बाबांना पुनःपुन्हा सांगत होता; पण बाबा मात्र स्वत:चंच बोलणं रेटत होते.

‘अहो, ऐकून तर घ्या तो काय सांगतोय ते,’ आईने मध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न केला; पण निष्फळ. बाबा ओरडतच राहिले. आदी बाहेर निघून गेला.

रात्री आईनं विचारलं, ‘तू बाबा बोलत असताना निघून का गेलास?’

आदीनं एक कटाक्ष आईकडे टाकला आणि बोलायला सुरुवात केली. ‘‘हे बघ, त्यांना माझं काहीच ऐकायचं नव्हतं. मग मी का म्हणून त्यांचं ऐकायचं? सारखं त्यांचंच म्हणणं का ऐकायचं आपण? आपण बोलायचंच नाही का?’’

प्रसंग २ - ‘आई, ओरडू नकोस. मी काहीही केलेलं नाही. त्यानंच माझी खोड काढलेली,’ आश्विनचा आवाज चढला होता.

त्याचा आवाज वाढला म्हणून आईचा आवाज वाढला होता.

‘अगं, तो काय सांगतोय ते तर नीट ऐकून घे आधी. त्याचं न ऐकताच कसं काय बोलतेयस तू?’ बाबा मध्येच बोलले. ‘‘तुम्ही शांत बसा हो. मला माहीत आहे त्याची सवय. तुमच्या लाडाने तो बिघडत चालला आहे.’

आईचं हे बोलणं ऐकून आश्विन आणखीनच चिढला. बाबांनी त्याला शांत राहण्याची खूण केली. आश्विन धुसफुसत बाहेर निघून गेला.

वरील दोन्ही प्रसंग आपल्याला काय सांगतात. ऐकायला शिकायला हवं, की आपण मोठे म्हणून आपलंच बोलणं रेटत रहायला हवं? खरंतर दैनंदिन जीवनातला हा सोपा नियम आहे, आपण इतरांचंही ऐकावं. समोरचा काय सांगतोय ते समजून घ्यावं. सतत आपलंच रेटत राहणं हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अवगुण ठरू शकतो. त्यात लहानांना तर ऐकलंच पाहिजे. कारण त्यांच्यासाठी तुम्ही हक्काची जागा असता.

मूल उत्साहाने एखादी गोष्ट सांगत असतं, काहीतरी सुचवू पाहत असतं. तेव्हा आपण ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. कारण तुम्ही तुमच्या मुलांसाठी ‘बोलण्याची हक्काची जागा असता.’ अशा ठिकाणीच मुलं मोकळेपणाने व्यक्त होत असतात. तेव्हा त्यांचं बोलणं ऐकणं, त्यावर अधून माधून प्रतिक्रिया देणं हे आपण करत रहायला हवं.

मुलांचं म्हणणं ऐकणं हे मुलांसाठी एक प्रकारचं ट्रेनिंगच असतं. ज्याचा वापर ते आपल्या वैयक्तिक आयुष्यात करणार असतात. तेव्हा मुलांचं ऐकायला शिकूया. म्हणजे ते इतरांचं ऐकतील. अन्यथा ते पण आपलंच म्हणणं सतत रेटत राहतील. अशावेळी त्यांना गरज असते इतरांना ऐकून घेण्याच्या सवयीची. जी फार गरजेची गोष्ट आहे. त्यातून गैरसमज टाळायला मदतच होते. आणि हे मुलं आपल्याकडूनच शिकत असतात.

आपण जेव्हा इतरांचं काळजीपूर्वक ऐकतो, त्याला प्रतिसाद देतो. तेव्हा आपण त्या व्यक्तीचा अप्रत्यक्षपणे आदरच करत असतो. ‘तुमचं बोलणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे,’ याची जाणीव आपण त्यांना करून देत असतो. आपलं मूल इतरांचं म्हणणं ऐकतंय का? हे पण आपण पाहायला हवं. ते इतरांचं ऐकत नसेल, तर त्याच्याशी बोललं पाहिजे. त्याला हे समजायला हवं, की ‘इतरांचं ऐकायला शिकणं ही सुसंवादाची महत्त्वाची पायरी आहे.’

टॅग्स :lifestylefamily