esakal | सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

immune system

सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्रशासन मोठ्या कसोशीने प्रयत्न करत आहेत. या महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य सरकाराने लसीकरणाचा वेगदेखील वाढवला आहे. सोबतच नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहनदेखील वारंवार करत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये प्रशासनाला मदत करण्याची व कोरोनावर मात करण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे या काळात कामाव्यतिरिक्त बाहेर जाणं टाळलं पाहिजे. तसंच जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल यावर लक्ष दिलं पाहिजे.

सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त आहारात समावेश केला पाहिजे. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांसोबतच असेही काही पदार्थ आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे हे पदार्थ कोणते ते पाहुयात.

१. कॅफिन -

अनेक जणांना दर दोन तासाने कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय सध्याच्या काळात धोकादायक ठरु शकते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनचा परिणाम आपल्या इम्युनिटीवर होत असतो. त्यामुळे सध्याच्या काळात कॉफी पिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

२. मद्यपान व धुम्रपान -

मद्यपान किंवा धुम्रपान करणं हे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, तरीदेखील काही जण याचं सेवन करतात. परंतु, या पदार्थांमुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे या पदार्थांना कायम दूर ठेवा.

३. प्रोसेस्ड फूड -

प्रोसेस्ड फूड म्हणजे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ. धकाधकीच्या जीवनात अनेक जण प्रोसेस्ड फूड खाण्यावर भर देतात. यात प्रोसेस्ड मीट किंवा अन्य काही पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

४.फास्ट फूड -

आजकाल प्रत्येकालाच फास्टफूड खाण्याचं प्रचंड वेड आहे. पिझ्झा,बर्गर हे पदार्थ अनेक जण आवडीने खातात. परंतु, हे पदार्थ तयार करतांना त्यात वापरण्यात येणारे पदार्थ शरीरासाठी घातक असतात. मैदा, तिखट मसाले, तेलकट पदार्थ यामुळे शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो. व आपली रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होते.

हेही वाचा : कोरोना काळात चुकूनही जाऊ नका अशा ७ ठिकाणी; अन्यथा...

५. रिफायनरी ऑइल -

कोणताही पदार्थ तयार करतांना त्यात मर्यादित तेलाचा वापर केला पाहिजे.तेलामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढते. त्यामुळे अनेक शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे तेलकट पदार्थ, भरपूर तेलाचा वापर करणं टाळावं.

६. सोडा -

वडा, ठोकळा , बेकरी प्रोडक्ट असे पदार्थ चांगले व्हावेत यासाठी अनेक जण त्याच्यात सोडा वापरतात. परंतु, सोड्याचा अतिरेक केल्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. सोड्यामध्ये शर्करेचं प्रमाण अधिक असतं. म्हणून सोड्यामुळे इन्शुलिनमधील साखरेची पातळी वाढू शकते.

हेही वाचा : COVID Tongue : ओठांभोवती पाच लक्षणं जाणवल्यास कोरोना चाचणी नक्की करा

७. सीलबंद सूप किंवा फळे -

स्वच्छतेच्या नावाखाली आजकाल बाजाराता प्रत्येक पदार्थ सीलबंद पाकिटात किंवा डब्यात मिळू लागले आहेत. यात रेडी टू इट सारखे सूप, मसाले उपलब्ध आहेत किंवा फळेदेखील बंद डब्यात किंवा पिशवीत मिळतात. परंतु, असे सीलबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. पदार्थ सील बंद केल्यावर त्यातील पोषक तत्व निघून जातात.

८. दुषित पाणी -

पिण्याचे पाणी असो वा स्वयंपाक करतांना वापरायचे पाणी असो ते कायम स्वच्छ असलं पाहिजे. कारण, अनेक आजार हे दुषित पाण्यामुळे पसरत असतात. त्यामुळे या दुषित पाण्याचा परिणाम थेट तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो.