Friendship Day : खरे मित्र कोण?

मैत्री असावी विश्वासाची आणि मदतीची
Friendship Day 2023
Friendship Day 2023esakal

सूरज पी. दहागावकर

खरे मित्र असतात हृदयाच्या ढासळलेल्या भिंतींना नव्याने उभे करणारे कारागीर, आशेचे नवनवे रंग देणारे रंगारी, मित्राच्या जीवनात प्रेरणा भरणारे प्रेरणास्रोत, मित्र वाईट मार्गाकडे जाताना रोखणारे, प्रसंगी टोकणारे, मित्राचे कौतुक करणारे... खऱ्या मित्रांची अशी कितीतरी रूपे असतात.

मैत्री असावी विश्वासाची आणि मदतीची

मैत्री असावी सुख-दुःखाची आणि प्रेमाची

मैत्री असावी आचरणाची आणि विचारांची

मैत्री असावी त्यागाची आणि जिवाभावाची

मैत्रीदिनी आपापल्या मित्र-मैत्रिणींचे फोटो स्टेट्सवर ठेवून, एकमेकांना फ्रेंडशिप बॅन्ड बांधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊन आपापल्या परीने हा दिवस साजरा केला जातो. खरे मित्र म्हणजे आपण जीवनात यशस्वी व्हावे म्हणून जे स्वतः मेहनत घेतात. आपल्यासाठी झिजतात. वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

आपल्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेतात. स्वतः पूर्ण करू न शकलेले स्वप्न आपल्यात बघतात. आपल्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा कमी करून आपल्याला कसलीही कमी होऊ देत नाही, असे आपल्या आयुष्याचे मार्गदाते असलेले आई-बाबा, आपले शिक्षक, आपले मार्गदर्शक हे आपले खरे मित्र नाहीत का...?

खरंतर आज मैत्रीची व्याख्याच बदललेली दिसते. वाढदिवसाच्या दिवशी हॉटेलमध्ये पार्ट्या देणारे आपले बेस्ट फ्रेंड बनतात, शिकवणीवर्गाच्या नावाखाली क्लास बुडवून फिरायला जाणारे आपले बेस्ट फ्रेंड बनतात. मौजमजा करणारे बेस्ट फ्रेंड असतात. काल-परवा ओळख झालेले मुलं-मुली बेस्ट फ्रेंड होतात. परंतु आपल्या उन्नतीसाठी दिवस-रात्र झटणारे व्यक्ती आपले बेस्ट फ्रेंड होऊ शकत नाही का?

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी जर एखादा व्यक्ती स्वतःचा अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन करत असेल तर तो तुमचा सच्चा मित्र आहे. पण, आम्ही खऱ्या मैत्रीची व्याख्या कशी करत आहोत तर, ‘आपल्या वयाचा जो आहे तो, आपल्यासोबत जो बोलतो, राहतो त्या व्यक्तीसोबत जगणे म्हणजे मैत्री’ मैत्री करायला सुंदरतेची, वयाची, पैशाची बंधने नसतात; पण आम्ही वयाच्या, पैशाच्या बंधनात अडकून आहोत. आम्ही आज मैत्री कुणाशी करतो आहे तर एखाद्या सुंदर दिसणाऱ्या, आपल्या समवयीन असलेल्या व्यक्तीशी.

पण, कधी विचार केला का मित्रांनो आपल्याला सुंदर दिसणारा चेहराच का आवडतो? एखादा सुंदर विचार करणारा व्यक्ती का आपला बेस्ट फ्रेंड होऊ शकत नाही. सुंदर चेहऱ्याशी मैत्री करण्यापेक्षा सुंदर विचारांशी मैत्री करा. आपल्या वयाच्या व्यक्तीसोबत मैत्री करण्यापेक्षा आपल्या आयुष्याला बदलविण्याची कुवत असलेल्या एखाद्या सत्तर-ऐंशी वर्षांच्या व्यक्तीसोबत मैत्री करून बघा. मग आयुष्य कसे हिऱ्यासारखे चमकून निघेल, ते बघा.

माझ्या मते ती प्रत्येक व्यक्ती आपला बेस्ट फ्रेंड्स आहे जे आपल्या सुख-दुःखात नेहमी आपल्यासोबत आहे. आपल्याला जमेल त्या बाजूने मदत करत आहे. आपल्या भविष्यासाठी योग्य मार्गदर्शन करत आहे. आपल्याला चांगल्या-वाईट गोष्टीची समज करून देत आहे. स्वतःपेक्षा आपल्याला मोठे करण्यात ते गुंतले आहेत. मग अशाच व्यक्तींना खरे मित्र म्हणून मैत्री दिवसाच्या शुभेच्छा द्यायला हव्या. शेवटी मैत्री दिवसाच्या निमित्ताने का होईना आपले बेस्ट फ्रेंड कोण होते, आहेत आणि भविष्यात कोण होऊ शकतील यावर एकदा नक्की विचार करा...

- मो. ८६९८६१५८४८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com