

Home Gardening: Creating a Green Paradise at Home
esakal
लीलावती आढाव
माझं ‘स्वतःचं घर’ हे मनापासून जपलेलं स्वप्न सत्यात साकार झालं. परिश्रम व जिद्दीने साकारलेल्या स्वतःच्या घराचा आनंद वेगळाच असतो. माहेरी वडिलांची शेती असल्यानं लहानपणापासूनच काळ्या मातीशी नातं जोडलं गेलं. म्हणूनच लहानपणापासून झाडांची फुलांची खूप आवड होती. हिरवाईने सजलेलं समृद्ध घर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून फ्लॅट सिस्टिमचं घर खालच्या मजल्यावर घेतलं. पाठीमागच्या बाजूचा सगळा परिसर मोकळा पाहून आनंद वाटला. मग स्वतः माती आणून कडेकडेनं पसरवून झाडे लावण्यास छान जागा तयार केली. काही कुंड्या आणल्या. सर्वप्रथम स्थानापन्न झालं ते तुळशी वृंदावन. मग झाडं लावण्यास सुरुवात केली ती तुळशीच्या रोपापासून. जास्वंदीची लाल, पिवळी, गुलाबी, केशरी, पांढरी अशी पाच रंगाच्या फुलांची झाडे कुंड्यांमध्ये लावली. चांदणी, सोनचाफा, अनंत, रातराणी ही झाडे उंच वाटतात म्हणून जमिनीत लावली. लहान मुलांची जशी काळजी घेतो, तशी रोज एक तास तरी मी या झाडांशी संवाद साधत असायची.