पुन्हा लग्न करावं का? दुसऱ्या लग्नापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा Remarriage Importance | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

पुन्हा लग्न करावं का? दुसऱ्या लग्नापूर्वी या 8 गोष्टी लक्षात ठेवा

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना. जोडीदाराबद्दल आपले काही विचार असतात. तसेच विचार करणारा किंवा त्या विचारांशी जुळवून घेऊ पाहणारा जोडीदार मिळाला की बात बन जाती है. मात्र काही काळ एकत्र घालवल्यानंतर एकमेकांबरोबर एडजस्ट करणं कठीण वाटायला लागतं. टोकाचे वाद व्हायला लागतात अशावेळी वेगळं होण्याचा अर्थात घटस्फोटाचा पर्याय आता अनेक जोडपी स्विकारतात. तर काही ठिकाणी सगळं आलबेल सुरू असताना अचानक अपघात, आजारपण, बाळंतपणामुळे पार्टनरचे निधन होते. अशावेळी पुढे काय हा मोठा प्रश्न पडायला लागतो. घटस्फोटानंतर जसं मन उध्वस्त झालेले असते. तसेच पार्टनरचे निधन झाल्यामुळे होते. मात्र काही काळानंतर या व्यक्तींना कुटूंबातील लोकांकडून पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही खरचं दुसऱ्या लग्नाचा विचार करत असाल तर 8 गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

मनाला विचारा - मला आयुष्यभर एकटं राहणं शक्य आहे? मी किती काळ एकटे जगू शकेन? मला कधीतरी पार्टनरची गरज लागेल का? आई-वडील आहेत तोपर्यंत त्यांचा आधार आहेच. पण, उद्या आपली मुलं मोठी झाल्यावर, त्यांच्या कामात बिझी झाल्यावर आपल्याला कोणी सहचारी नको का? किती काळ आणि का एकटं राहायचं ? शारीरिक गरजा का मारायच्या, असे प्रश्न स्वतःला विचारून प्रत्येक बाबीचा सखोल विचार करा.

डोळसपणे विचार करा - असे प्रश्न पडायला लागतात. हे प्रश्न पडले की आयुष्यभर एकटं राहणं कठीण आहे, या निर्णयाप्रत काही लोकं येऊन पोहोचतात. त्यानंतर आपल्या कोणत्या गरजा नव्या पार्टनरकडून आपल्याला आपेक्षित आहेत त्याचा विचार करायला सुरुवात होते. पण जुन्या अनुभवांची खपली हृदयावर असल्याने समोरच्या माणसांकडून नेमक्या कश्या अपेक्षा ठेवायच्या याचा गोंधळ उडतो. त्यामुळे जुन्या गोष्टींना फाटा देऊन नव्याने सुरूवात करायची आहे. पण ती अधिक डोळसपणे हा विचार मात्र करायला हवा.

मानसिक गरज- आपण आनंदी, अस्वस्थ, दु:खी अशा वेगवेगळ्या भावनांमधून जात असतो. अशावेळी आपल्याला समजून घेणारी, जिच्याशी मनमोकळा आणि मनात कुठलाही किंतू- परंतु न येऊ देता स्पष्ट आणि उत्तम संवाद साधला जाईल असा सुसंवाद साधू शकणारा पार्टनर हवा या मतापर्यंत आपण पोहोचतो. त्यामुळे आपली मानसिक भूक भागणार असते. एक उत्तम आणि हक्काचा माणूस म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो.

सामाजिक गरज- आपल्या आनंदाच्या कल्पना काय आहेत? समोरची व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत, मित्र-मैत्रीणींसोबत एडजस्ट होऊ शकेल का? फिरायला जायला, नाटक संगीतात तिला रस असणारी, थोडक्यात आपल्याला घराबाहेरही तितकीच साथ देणारी व्यक्ती असावी का, याबाबतही नेमका विचार करावा.

हेही वाचा: ऑनलाइन डेटिंग प्रोफाईलसाठी फोटो निवडताना, फॉलो करा 'या' टिप्स

मुलांचा स्विकार- जर तुम्हाला अपत्य असेल तर समोरची व्यक्ती त्याला स्विकारेल का, हाही प्रश्न महत्वाचा असतो. त्यामुळे मुलांसह तुम्हाला स्विकारणारी व्यक्ती हवी, त्या पार्टनरने आई किंवा वडिलांचे प्रेम, संस्कार दिले पाहिजेत, त्याला आपलं मूल आहे समजून वाढवलं पाहिजे या रास्त अपेक्षा आहेत. दत्तक घेतलेले चालणार असेल तर तसेही स्पष्ट मत असावे.

आर्थिक बाबतीत सहाय्य - तुम्ही स्वत: कमवणारे असता. त्यामुळे पार्टनर तुमच्यासारखा कमावणारा किंवा जास्त कमावणारा असावा, अशी रास्त अपेक्षा ठेवावी. भविष्यात पार्टनरकडून तुमचे आर्थिक संबंध कसे असावेत,याचे ठोकताळे तुम्ही तयार करावेत. काही स्त्रिया आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण स्वत: करावा या विचाराच्या असतात. त्यादृष्टीने तुमचे विचार पक्के करावे. तुम्ही पार्टनरकडून आर्थिक सहाय्य द्याल का याबाबत विचार करावा.

शारीरिक गरज- स्त्री असो वा पुरूष दोघांनाही शारिरिक गरजा असतात, या शारीरिक गरजा पूर्ण होण्या बाबत तुमचे विचार ठाम असायला हवेत. जर तुम्हाला ती गरज वाटत नसेल तर ती का वाटत नाही याबाबतीत विचार करा.

परफेक्ट कोणीच नसतं- आपल्या सगळ्या अपेक्षांशी 100 टक्के जुळणारी व्यक्ती मिळेलच असे नाही. त्यामुळे या अपेक्षांमध्ये थोडे उन्नीस- बीस होणार, काही बाबतीत एडजस्ट करायचेच आहे. याची स्पष्ट कल्पना असू द्या. एकदा का तुम्ही तुम्हाला नेमकं काय हवय या बाबतीत क्लीयर झालात की तसा पार्टनर मिळण्यासाठी प्रयत्न सुरू करा.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top