

- फारूक काझी
सर्वच नात्यांच्या मुळाशी दोन गोष्टी असायलाच हव्यात. अन्यथा ते नातं मग नातं उरत नाही. एक म्हणजे नात्याचा आदर आणि दुसरं नात्यातलं प्रेम. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग नातं कोणतंही असू द्या.
पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आदर राखलाच पाहिजे. तसंच या नात्यात प्रेम असणं ही या नात्याची नैसर्गिक गरज आहे. तुम्ही मुलांवर प्रेम आणि प्रेमच करू शकता. कारण हे नातं जीवनातील सर्वांगसुंदर नातं आहे.
खरंच आपलं प्रेम मुलांसाठी इतकं आवश्यक असतं? खरंच मुलांच्या जीवनात पालकांच्या प्रेमाचं असणं इतकं गरजेचं असतं? तर याचं उत्तर ‘हो!’ असंच आहे. आपलं प्रेम आपल्या मुलांसाठी ताकद असतं आणि आत्मभान पण. थोडी चर्चा यावर करुया. पुढे काही मुद्दे मांडतोय. यात तुम्ही स्वत:ही भर घालू शकता.
पालकांच्या आणि मुलांच्या नात्यात प्रेम असेल, तर हे नातं एक सुंदर नातं बनतं. अशा नात्यात एकमेकांचा आदर करा, प्रेमानं वागा हे सांगावं लागत नाही. नात्याची ओढ सगळ्यांना लागून राहते. काळ बदलताना नात्यांची वीणही कमजोर पडत चालली आहे का, असा प्रश्न मनात येतोच. मात्र, तरीही आपण आपल्या मुलांवर प्रेम करत राहू. जेणेकरून नात्यांमधील ओढ टिकून राहील आणि नातं सदैव बहरत राहील.
ज्या मुलांच्या वाट्याला आई-बाबांचं प्रेम येतं, ती मुलं आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि समजा जीवनात संकटं आली तरी त्यांना भिडण्याची ताकद हे प्रेमच त्यांना देत असतं. कारण संघर्षात आपल्या पाठीशी आपले आई-बाबा आहेत ही भावनाच त्यांना लढण्याचं बळ पुरवत असते. अशा वेळी आई-बाबांचं प्रेम मुलांचं आत्मबल बनतं. आणि सोबत त्यांना आत्मभानही देतं.
मूल लहान असताना मुलाला आई-बाबांचं प्रेम मिळालं, तर त्याच्या एकंदरीत मेंदूच्या वाढ आणि विकासासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरतं. मुलं स्वत:ला सुरक्षित समजतात, त्यामुळे न्यूनगंड, ताण-तणाव अशा गोष्टींचा त्यांच्या वाढीत व्यत्यय येत नाही. तेव्हा मुलांच्या मानसिक विकासात आई-वडिलांचं प्रेम किती गरजेचं आहे, याची जाणीव आपणाला झालीच असेल.
मुलांच्या जीवनात आई-वडिलांचं प्रेम असेल तर मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना प्रबळ असते. त्यामुळे मुलं स्वत:ला एकटं समजत नाहीत आणि तणावांना बळी पडत नाहीत. पालक आणि मुलांतील मुक्त संवाद खूप समस्या सोडवू शकतो. आजच्या सर्वच वयोगटातील मुलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपलं प्रेम मुलांना सुरक्षिततेची हमी देतं. मग मुलं अडचणींवर मात करत पुढं जाऊ लागतात. काहींना अपयश जरी आलं तरी आपलं प्रेम हेच त्यांची ताकद बनायला हवं.
पालकांचं प्रेम मुलांच्या यशाला कारणीभूत ठरू शकतं? आणि अपयशाला? तर या दोन्ही प्रश्नांचं उत्तर हो असंच आहे. पालकांचं प्रेम मुलांना ताकद ही देतं आणि ते जर नसेल तर मुलांचा आत्मविश्वास ढासळून जातो. मुलांच्या यशाची गुरुकिल्ली त्यांचे प्रयत्न तर आहेतच; परंतु पालकांचं प्रेम ही मोठी ताकद त्यांच्यासोबत असते तेव्हा यश त्यांना साद घालत असतं.
मानवी जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अत्यंत आवश्यक असतं. मुलांच्या वाढीच्या काळात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पालकांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं. मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल तर मुलं कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात. परंतु त्यांचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी पालकांचं प्रेम खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असतं. पालकांचं प्रेम हा मुलांसाठी मानसिक आधार असतो.
पालकांचं प्रेम मुलांच्या जीवनात किती महत्त्वाचं असतं, हे वरील काही मुद्द्यांवरून आपल्या लक्षात आलंच असेल. तेव्हा आपल्या मुलांवर प्रेम करण्याची संधी अजिबात दवडू नका. आणि तुमचं प्रेम व्यक्त करायलाही विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.