
Hug day : ‘हग डे’ धड..धड..वाढते ठोक्यात..संपते अंतर झोक्यात..!
नागपूर - प्रेम प्रकट करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्यावेळी एक मिठी सुद्धा जादुई ठरते अन् एका काळजाच्या ठोक्याचे गुपित अलगद दुसऱ्याच्या काळजाला कळते. समोरच्या व्यक्तिबाबत असलेल्या भावना मिठीतून सहज व्यक्त करण्याचा क्षण प्रेमी युगलांसाठी जेवढा महत्त्वाचा, तेवढाच मित्र, मैत्रीण, पत्नी, आई, बाबा, मुलगा, मुलीसाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हॅलेंटाइन वीकमधील उद्या ‘हग-डे’निमित्त अनेकांना ‘न सांगताच मिठीतून, जीव तुझ्यामध्ये गुंतला’ हे सांगण्याची संधी आहे.
मूक संवादाचे शास्त्र
अनेक अभ्यासकांच्या मते मिठी मारणे हा मूक संवादाचा उत्तम प्रकार आहे. एखाद्याला मिठी मारणे हे हृदयापासून ‘शेक-हॅन्ड’ करण्यासारखे आहे. वैज्ञानिकांच्या मते एखाद्या प्रिय व्यक्तीने मिठी मारल्यास, स्पर्श केल्यास किंवा जवळ बसल्यास शरीरात ऑक्सिटोसिन नावाच्या संप्रेरकाची पातळी वाढते.
त्यालाच ‘कडल हार्मोन’, असे म्हणतात. त्यामुळे आनंदाची भावना तयार होऊन तणाव कमी होतो. तज्ज्ञांच्या मते महिलांमध्ये या हार्मोन्सचे प्रमाण कमी असते आणि हग केल्याने त्याची पातळी राखली जाऊ शकते.
हग करण्याच्या विविध पद्धतींचे अर्थ
बियर हग - (समोरून मिठी मारणे) पार्टनरवर अमाप विश्वास ठेवता हे सुचविण्यासाठी बियर हग करावे.
फ्रेंडली हग - समोरचा व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगण्यासाठी फ्रेंडली हग करावे.
साईड हग - तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी नाते घट्ट करायचे आहे हा संकेत दर्शविण्यासाठी साइड हग करावे.
बॅक हग - या पद्धतीने मिठी मारून तुम्ही तुमच्या साथीदारावर फार प्रेम करता हे सांगू शकता.
कसा साजरा कराल हग डे ?
आपल्या प्रियजनांना आपण किती प्रिय आहोत हे सांगायला आपण विसरतो. त्यांना स्पर्शाने हे पटवून देण्यासाठी ‘हग-डे’ ही चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांना मिठी मारून दिवसाची सुरुवात करू शकता. इच्छा असल्यास तुमचा जोडीदार, मित्र किंवा कुटुंबीयांना मिठी मारून एक छोटीशी भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड देऊ शकता.