

- फारूक काझी
प्रसंग १ :
‘‘सर मला नाही भाग घ्यायचा डान्समध्ये,’’ छोटा कपिल रडवेला होऊन बोलत होता. ‘‘का नाही घ्यायचा भाग?’’ सरांनी त्याला प्रेमाने विचारलं.
तो काही बोलेना. सरांनी पुन्हा पुन्हा विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझी मम्मी म्हणते, मला नाचता येत नाही. तू भाग घेऊ नकोस.’’ एवढं बोलून तो तिथून निघून गेला.
प्रसंग २ :
‘‘बाबा मला नाही जमणार. मला नाही येत हे...’’ घाबरलेला अंकित बोलत होता. गणिताची परीक्षा होती आणि अंकित घाबरत होता. ‘‘हे बघ, तुला येतंय की नाही हे तू भाग घेतल्याशिवाय कळेल का? आधीच कशाला घाबरतोस? करून बघ. जमलं तर जमलं. नाही जमलं तरी ही कुठं शेवटची परीक्षा आहे?’’ हसत हसत बाबांनी समजावून सांगितलं. अंकित हसला. तयार झाला.
दोन भिन्न प्रसंग. आपल्या आसपास सतत अनुभवाला येणारे. बरेचदा पालक अनवधानाने का होईना, मुलांचं खच्चीकरण करत असतात. ‘‘तुला काहीच येत नाही. तू मठ्ठ आहेस,’’ हा डायलॉग मुलांच्या मनावर किती वाईट परिणाम करतो याचं मोजमाप नाही करता येत. याचे दूरगामी परिणाम भावी आयुष्यात पाहायला मिळतात. डान्समध्ये भाग घेण्याआधीच त्यानं ठरवून टाकलं, की मला नाचता येत नाही. का तर ‘मम्मी म्हणाली!’
याउलट दुसरा अनुभव. परिणाम काहीही होऊ दे, पण तुला जमेल हा विश्वास मुलांमध्ये निर्माण करणं हे मुलांचं चांगलं व्यक्तिमत्त्वाला घडवण्यात मदत करणारी गोष्ट आहे. तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही असं सतत नकारात्मक बोलत राहिलात तर मुलं कधीच स्वत:विषयी सकारात्मक विचार करू शकणार नाहीत.
कल्पना करा, कुणी जर तुम्हाला सतत ‘तुला काहीच जमत नाही.’ असं सुनावत असेल तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? राग येईल? चिडचिड होईल? तुम्ही एकदम गप्पगप्प व्हाल? यातलं काहीही घडू शकतं. व्यक्तिपरत्वे हे बदलत जातं.
काही मुलं बंडखोर होतात, तर काही मुलं कायमची अबोल होऊन जातात. अशा मुलांच्या जीवनातला आनंद आपण हिरावून घेतलेला असतो. हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे ‘‘तुला काहीच येत नाही, काहीच जमत नाही’’ अशा संवादांच्या ऐवजी ‘‘तुला जमेल.
तू करून बघ...’’, ‘‘आम्ही आहोत सोबत. तू प्रयत्न कर. जमणार तुला!’’, ‘‘तू हे करू शकतोस/शकतेस. तेव्हा भीती बाजूला ठेव आणि प्रयत्न कर,’’ असे संवाद मुलांच्या जगण्यात नूर आणतात. तेव्हा मुलांना नुसतं नाउमेद न करता स्वत:ला स्वत: पारखण्याची नजर आपण द्यायला हवी. वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहायला हवं. कारण मुलांसाठी तुम्हीच खरीखुरी प्रेरणा असता.
आपली मुलं एक व्यक्ती म्हणून वाढताना त्यांना आत्मविश्वासाची ताकद आपण पुरवायला हवी. त्यांच्या पंखांत आपणच तर बळ भरायला हवं. त्यात चूक होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. नाउमेद करण्यापेक्षा आकाशात भरारी मारण्याचं बळ आपण पुरवलं पाहिजे. पालक म्हणून ही आपली मोठी जबाबदारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.