अनवट ‘वाट’

आयुष्यात आलेली वेगळी वाट स्वीकारून त्या मार्गावर आव्हानांना सामोरे जाताना केलेला यशाचा प्रवास सक्षम बनविणारा होता.
jai deshpande
jai deshpandesakal

आयुष्यात आलेली वेगळी वाट स्वीकारून त्या मार्गावर आव्हानांना सामोरे जाताना केलेला यशाचा प्रवास सक्षम बनविणारा होता. भाषेची आवड असलेल्या मला प्रोफेसरऐवजी प्रोप्रायटर व्हावे लागले. आज २५ व्यावसायिक वाहनांची जबाबदारी पेलण्याचे काम सुरू आहे. ज्या क्षेत्रात महिला कार्यरत होण्यासाठी धजावत नाहीत, त्याच क्षेत्रात खंबीरपणे उभे राहण्याचे काम मला कुटुंबामुळे करता येत आहे.

माझे शिक्षण एमए मराठी झाले, कदाचित मी शिक्षण क्षेत्रातच गेले असते; पण नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी वेगळे ठरवलेले असते. तसेच काहीसे झाले आणि माझे कार्यक्षेत्रच बदलले. माझ्या लग्नानंतर वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते करत असलेला वाहतुकीचा व्यवसाय धोक्यात होता.

अशावेळी माझ्या आई-वडिलांनी मी हा व्यवसाय पुढे चालवावा हा प्रस्ताव मांडला. त्यांच्या अग्रहाखातर आणि माझ्या सासरच्या पाठिंब्यामुळे या व्यवसायात कार्यरत होण्याचे निश्‍चित केले. सुरुवातीला खूप भीती वाटत होती, कारण या क्षेत्रातील काहीच मला माहिती नव्हती.

मात्र, माझ्या नवऱ्याचा व्यवसायही हाच असल्याने त्यांच्याकडून चांगले मार्गदर्शन आणि आत्मविश्‍वास मिळाल्याने मी स्वत:ला या व्यवसायात झोकून दिले. चोवीस तास बांधिलकी असलेला आणि अनिश्‍चिततेचा हा व्यवसाय असल्याने धाकधूक होतीच; पण अभ्यासांती मनातील भीतीची जागा जिद्दीने घेतली. मग सुरू झाली या क्षेत्रात भक्कमपणे उभे राहण्याची धडपड.

गाडी कोणत्या रस्त्याने जाणार आहे, त्यासाठी लागणारा डिझेलचा खर्च कसा येतो, टोलचा खर्च, जकात, विम्याच्या संदर्भातील माहिती, राज्य परिवहन महामंडळाची कामे, आर्थिक बाबी कशा हाताळायच्या, चालकांशी असलेला संवाद, कंपनीला कशा प्रकारे सेवा द्यायची या गोष्टी मी शिकत होते. हळूहळू ते जमू लागले. या क्षेत्रात महिलांची संख्या नगण्य असल्याने चालकांनाही सुरुवातीला संकोच वाटत होता. तो काढण्यापासून त्यांच्याशी सुसंवाद साधण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता.

वाहतुकीचा व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो चालकाचा सोयीस्करपणा. त्यासाठी मी वाहन खरेदी करताना चालकाच्या बाजूने विचार करते. मी स्वत: टेस्ट घेऊन त्या वाहनाच्या सर्व बाबी तपासून घेते. १८ वर्षे हा व्यवसाय करताना वाहतुकीच्या बाबी लक्षात घेत आता मी पर्यटनासाठी केल्या जाणाऱ्या वाहतुकीमध्येही कार्यरत आहे.

काम करताना कंपनी मालकांशी संवाद, कामानिमित्त केले जाणारे व्यवहार या सगळ्यांचे कौतुक होते तेव्हा नव्या उमेदीने काम करण्याचे बळ मिळते. आत्तापर्यंत मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून दिला जाणारा सावित्रीबाई फुले सन्मान, जळगावच्या राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा उद्योजक पुरस्कार आदी प्राप्त झाले आहेत.

आपला मालक महिला आहे, हे चालकाला समजून घेणे कठीण होते. त्यामुळे काम करताना त्यांना संकोच वाटायचा. त्यामुळे काही वेळेस ‘मॅडम, सरांना फोन द्या. ते अडचण काय आहे हे नक्की समजतील,’ असे संभाषण होत होते. अशा वेळेस मी सामंजस्याने हा प्रश्‍न लवकरात लवकर कसा सुटेल याकडे लक्ष देत होते. कालांतराने चालकांचाही संकोच निघून गेला आणि कोणताही अडथळा न येता संवाद सुरू झाला. हा वाढलेला विश्‍वास खूप महत्त्वाचा होता.

व्यवसाय करताना...

  • मानसिकता बदलणे महत्त्वाचे.

  • संकोच सोडून कामामध्ये झोकून द्या.

  • संवाद साधल्याशिवाय अडचणी दूर होत नाहीत.

  • कसोटीच्या क्षणी माघार घेऊ नका.

नोकरी देत असल्याचा आनंद

एक महिला वडिलांची वारसदार होऊ शकते याचा आनंद मोठा आहे. व्यवसायाला एका उंचीवर नेण्याचे स्वप्न बघण्याची क्षमता असल्याचे समाधान मला आहे. नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे हात आपण होत आहोत ही अनुभूती प्रेरणा देणारी आहे. कोविडचा काळ म्हणजे मोठी परीक्षा होती. परंतु, ती यशस्वी पार करत त्यानंतरही व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरू आहे.

कसोटीचा क्षण

एकदा माल पोचवताना वाहनात अचानक बिघाड झाला. माल वेळेत पोचणे अनिवार्य होते. त्यासाठी पर्याय नव्हता. तेव्हा दुसऱ्या वाहनाची सोय करून तो माल पोचवण्याचे काम करणे जिकिरीचे होते. अशा वेळेस संयमाने पावले उचलली. एकदा माझ्या वाहनावरील चालकाची आई हरविल्याची बातमी त्याला प्रवासादरम्यान कळाली. तेव्हा त्याची मानसिक स्थिती ढळू न देता त्याचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न केले. अशा अनेक समस्या प्रवासादरम्यान येतात. हे आव्हान पेलवताना संयमाबरोबरच संवादाचे महत्त्व आहे आणि ते करण्याची माझी कसब असल्याने कोणतेही आव्हान सहज पार पाडले जाते.

(शब्दांकन : तनिष्का डोंगरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com