esakal | धारावी ते कुलाबा कॉझवे ! खरेदीसाठी मुंबईतील ५ फेमस मार्केट
sakal

बोलून बातमी शोधा

धारावी ते कुलाबा कॉझवे ! खरेदीसाठी मुंबईतील ५ फेमस मार्केट

आता कमी बजेटमध्येही करता येईल खरेदी!

धारावी ते कुलाबा कॉझवे ! खरेदीसाठी मुंबईतील ५ फेमस मार्केट

sakal_logo
By
शर्वरी जोशी

मुंबई...स्वप्नांची दुनिया..असं वर्णन अनेकदा या शहराविषयी ऐकायला मिळतं. ऐतिहासिक वास्तूंपासून ते पाश्चात्य संस्कृतीपर्यंत अनेक गोष्टींचं दर्शन या शहरामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे या शहरातील अनेक ठिकाणं, वास्तू याविषयी पर्यटक, नागरिक यांच्यात उत्सुकता पाहायला मिळते. त्यातच मुंबईतील खाऊगल्ली आणि स्ट्रीट मार्केट हे तुफान लोकप्रिय आहेत. म्हणूनच, खास या दोन गोष्टी अनुभवण्यासाठी अनेक जण पुणे, नाशिक या सारख्या शहरातून मुंबईत येतात. त्यामुळेच जर तुम्ही मुंबईमध्ये खास खरेदीसाठी येत असाल तर येथील कोणते स्ट्रीट मार्केट फेमस आहेत?, कमी बजेटमधील मार्केट कोणतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या मार्केटमध्ये कोणत्या वस्तू आवर्जुन घेतल्या पाहिजेत हे आज जाणून घेऊयात.

१. क्रॉफर्ड मार्केट- 

मुंबईत खरेदी करायचं म्हटलं की या मार्केटचं नाव ओघाओघाने ओठावर येतंच येतं. गृहपयोगी वस्तूंपासून सौंदर्य प्रसाधनांपर्यंत प्रत्येक लहानातली लहान वस्तूदेखील या मार्केटमध्ये सहज मिळते. विशेष म्हणजे येथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारपेठा आहेत. त्यामुळे येथे कायमच खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळते. खासकरुन सणावाराच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

कसे पोहोचाल - सीएसएमटी स्थानकावरुन टॅक्सीने, किंवा चालतदेखील हे मार्केट जवळच आहे.

स्पेशालिटी - गृहपयोगी वस्तू आणि कपडे, फॅशनेबल ज्वेलरीस कॉस्मेटिक्स

२. कुलाबा कॉझवे -

बाजारात येणारा प्रत्येक नवा ट्रेण्ड फॉलो करायचा असेल तर या मार्केटला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये वेस्टर्न आऊटफिट मोठ्या प्रमाणावर मिळतात. विशेष म्हणजे थोडासा भाव केला की येथे वस्तू स्वस्त दरातही मिळते.

कसे पोहोचाल - सीएसएमटी किंवा चर्चगेट स्थानकावरुन टॅक्सीने

स्पेशालिटी - सर्व प्रकारचे वेस्टर्न आऊटफिट्स, बॅग्स, चप्पल, ट्रेंडी ज्वेलरी

३. धारावी मार्केट -

खरं तर धारावी म्हटलं की अनेकांना सर्वात मोठी झोपडपट्टी हे इतकंच माहित आहे. परंतु, धारावीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे येथील मार्केट. हे मार्केट खासकरुन लेदरचे जॅकेट्स,बॅग्ससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे जर तुम्हाला लेदरच्या वस्तूंची आवड असेल तर येथे एकदा तरी नक्की भेट द्या. तसंच येथे दिवाळीमध्ये लागणाऱ्या अनेक वस्तूही तयार केल्या जातात. 

कसं पोहोचाल - सायन स्टेशनवरुन चालत किंवा शेअर टॅक्सीने

स्पेशालिटी - लेदरपासून तयार केलेल्या वस्तू.

४. हिंदमाता मार्केट -

दादरमध्ये गेल्यावर साड्यांची खरेदी कुठून करायची हा प्रश्न पडला तर लगेच हिंदमाता गाठा. दादरमधील हिंदमाता हा परिसर खासकरुन साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे साड्यांची अनेक दुकानं असून येथे लग्नाचे बस्तेदेखील बांधले जातात. काठापदरापासून ते वर्क केलेल्या साड्यांपर्यंत येथे अनेक नव्या पॅटर्न आणि ट्रेंडी साड्या पाहायला मिळतात. तसंच येथे ड्रेस मटेरिअलही सहज मिळतात.

कसं पोहोचाल - दादरला उतरून पूर्वेला चालत जा.

स्पेशालिटी - साडी आणि ड्रेस मटेरिअल.

५. भुलेश्वर मार्केट -

दक्षिण मुंबईतील सर्वात जुनं आणि प्रसिद्ध मार्केट म्हणजे भुलेश्वर मार्केट. गृहपयोगी वस्तूंपासून इमिटेशन ज्वेलरीपर्यंत येथे सारं काही मिळतं. खासकरुन येथे लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहक येतात. 

कसं पोहोचाल - चर्नी रोड स्टेशनवरुन टॅक्सी किंवा दादरवरुन

स्पेशालिटी - लग्नसराईची खरेदी, दागदागिने