सुखकारक आणि आनंददायी

आईपणाची चाहूल लागली तेव्हा मी ‘झी टीव्ही’वरील ‘जावई विकत घेणे आहे’ ही मालिका करत होते. प्रेग्नंट असताना ती मालिका मला मिळाली होती आणि मी तसं प्रॉडक्शन हाऊसलाही सांगितलं होतं.
madhavi nimkar over her motherhood career tips to girls
madhavi nimkar over her motherhood career tips to girls Sakal
Updated on

- माधवी निमकर

आईपणाची चाहूल लागली तेव्हा मी ‘झी टीव्ही’वरील ‘जावई विकत घेणे आहे’ ही मालिका करत होते. प्रेग्नंट असताना ती मालिका मला मिळाली होती आणि मी तसं प्रॉडक्शन हाऊसलाही सांगितलं होतं. त्यावेळी ते म्हणाले, ‘ठीक आहे. आपण या सर्व गोष्टी मॅनेज करू.’ विशेष म्हणजे शेवटपर्यंत मी त्या मालिकेचं चित्रीकरण केलं आणि प्रेग्नंटपणाचा त्यामध्ये काहीही फरक पडला नाही.

तो काळ माझ्यासाठी खूप सुखकर होता. कारण, मला अगदी आरामात चित्रीकरणासाठी बोलवत असत.

चित्रीकरण लवकर सुरू करून मला लवकर सोडत. मी शेवटपर्यंत काम केलं. डिलिव्हरी होण्याअगोदर काही दिवसच मी सुट्टी घेतली. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील शालिनीच्या भूमिकेमुळे मी घराघरांत पोहोचले.

मला आई व्हायचं आहे, ही गोष्ट मी स्वतःच निवडली होती. मला आईपणाचे सगळे अनुभव घ्यायचे होते. दोन वर्षे अगोदरच मला आई होण्याची इच्छा निर्माण झाली होती; पण काही प्रोजेक्ट सुरू होते. त्यामुळे मी एक-दोन वर्षानंतर चान्स घेऊ, असं ठरवलं होतं. आई होण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर होता. हा निर्णय माझ्यासाठी आयुष्याला वळण देणाराच होता.

आई होण्याबाबत मी निर्णय घेतला, त्यावेळी मानसिकदृष्ट्या तयार होते. तो वेळ सगळा माझ्या पोटातल्या बाळासोबत घालवायचा होता. मी पूर्णपणे माझ्यासह बाळाकडे लक्ष केंद्रित केलं होतं. शंभर टक्के वेळ बाळाला द्यायचा होता. मला आईपणाची प्रत्येक स्टेप अनुभवायची होती आणि मी ती अनुभवली.

आई झाल्यानंतर आपली खरी परीक्षा सुरू होते. कारण, सगळ्याच गोष्टींमध्ये खूप बदल होतात. तुमचं हार्मोन्स असंतुलन होतं, चिडचिड होते; पण माझी अशी चिडचिड कधीच झाली नाही. मी खूप शांत राहिले. बाळासाठी रात्रीचं जागणं, हीसुद्धा फार छान गोष्ट होती. विशेष म्हणजे माझ्या मुलाने मला कसलाही त्रास दिला नाही.

त्याच्यामुळेच करिअरकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. करिअरची सुरुवात ए टू झेड अशी करायची ठरवलं अन मी पूर्ण तयार होते. माझा स्वतः वर विश्वास होता. आपण पुन्हा फिट व्हायचं आणि पुन्हा पूर्वीसारखं दिसायचं, हे मी ठरवलं होतं.

आता आई झाले, झेपत नाही, या सबबी मला सांगायच्याच नव्हत्या, हे मी स्वतःशीच ठरवलं होतं. त्यासाठी घरचेही खूप पाठिंबा देत होते. माझा मुलगा रूबेन साधारण ४-५ महिन्यांचा झाल्यानंतर मला जाहिराती करता येऊ लागल्या. एक दिवसाचं चित्रीकरणही मी करत होते.

आई झाल्यानंतर करिअरमध्ये पुन्हा जॉईन होताना काळजी असायची. कारण रूबेनला बघण्यासाठी घरी मुली होत्या. तरीही मुलानं खाल्लं असेल का, तो झोपला असेल का, तो जास्त चिडचिड करत नसेल ना, रडत नसेल ना, असे प्रश्न पडायचे. मला त्याला वेळ देण्याची जाणीव होती; पण तेवढंच लक्ष मी कामातही दिलं.

कामामध्ये तुम्ही मग्न असता, करिअर करत असता, त्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिकल विचार करावा लागतो. तिथे तुम्ही खूप भावनिक झाला, तर तुम्ही दोन्ही कामं चांगल्या पद्धतीनं करू शकत नाही.

त्यामुळे एकतर मला माझं आईपण खूप चांगल्या प्रकारे जगता आलं असतं किंवा करिअर चांगलं करता आलं असतं; पण ती तारांबळ न समजता, मला ते बॅलन्स करता येतं का, याचा विचार मी जास्त करायचे. त्याच्यामुळे बाहेर थांबावं लागलं तरी मी थांबायचे. मी फार भावनिक होत नव्हते. कारण त्याचा त्रास आणि कामावरही परिणाम झाला असता.

ज्यावेळी मी घरी असायचे, त्यावेळी मात्र पूर्ण वेळ मी त्याला द्यायचे. हा सगळा ताळमेळ साधता आला पाहिजे. आई झाल्यानंतर थोडंसं डिप्रेशन असतं की, आता माझ्या करिअरच पुढे काय होणार? पण या गोष्टींचा विचार न करता आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. मग सगळं सुरळीत होतं.

आईपणासाठी मी जो सुंदर प्रवास केलाय दीड-दोन वर्षे, तो खूपच छान होता. अभिनयात या काळात ब्रेक घेतला असला तरी त्याचा कुठलाही परिणाम माझ्या कामावर होऊ देणार नव्हते. मी स्वतःला इतकं छान ठेवलं की फरक जाणवू दिला नाही. त्यानंतर मी पुन्हा सकारात्मकरित्या या क्षेत्रात उतरले. छान पद्धतीने काम करत असून आगामी काळातही करणार आहे.

तुम्हाला आतून आवाज येत असेल, की मला आई व्हायचंय, तरच तुम्ही चान्स घ्या. कोणी दबाव आणत आहे, म्हणून चान्स घेऊ नका. कारण आईच बाळाला पोटामध्ये वाढवत असते. त्यामुळे तिची मानसिकता कशी आहे, ती पॉझिटिव्ह आहे का, ही गोष्ट महत्त्वाची असते. पूर्ण विचार करून आई होण्याचा निर्णय घ्या. तो निश्चितच तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायी असेल.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स...

  • आई होणं म्हणजे तुमचा पुनर्जन्म होणार आहे. आता तुम्ही जसा विचार करत आहात, तसा विचार तुम्ही बाळ जन्मल्यानंतर करणार नाही. दुसऱ्या सेकंदानंतर तुमचे विचार बदलणार आहेत आणि ते पॉझिटिव्ह असणार आहेत. फक्त त्या विचारांची फ्रिक्वेन्सी थोडी कमी-जास्त होणार आहे किंवा तुम्ही थोडा वेगळ्या प्रकारे विचार करणार आहात.

  • मनामध्ये कुठेही नकारात्मक विचार आणू नका. मी आई झाले म्हटल्यावर आता माझं सगळंच काम बंद होईल का, असे विचार मनामध्ये आणू नका. तुम्ही जितके सकारात्मक आणि आनंदी राहाल, तितकं तुमच्या बाळासाठी छान राहणार आहे.

  • ज्यावेळी तुम्ही निर्णय घ्याल की मला आता आई व्हायचं आहे, त्या क्षणापासून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. डॉक्टर किंवा योगा प्रशिक्षकांचा सल्ला घेऊन व्यायाम करण्यास सुरुवात करा.

  • आई होण्याचा निर्णय आपण आपल्या पतीबरोबर विचार करून घेत असतो. यात आपण आपल्या दोघांच्याही आई-वडिलांना कल्पना द्यायला हवी. कारण हा आनंदाचा क्षण तुमच्या घरच्यांच्यासोबत सेलिब्रेट केला पाहिजे.

  • आई होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते अगदी बाळ दीड-दोन वर्षांच होईपर्यंत स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठलाही बारीक-सारीक शारीरिक त्रास होत असेल तर चिडचिड होते आणि ती चिडचिड तुमच्या बाळावर किंवा नवऱ्यावर निघू शकते. या काळात तुम्हाला काय वाटते, हे महत्त्वाचं असून बाळाचं योग्य संगोपन करा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com