सुन्न करणारं जळजळीत सत्य!

एक सत्य घटना. १३ जून १९९७ या दिवशी घडलेली
Mahesh Bardapurkar writes trial by fire border cinema 59 death more than 100 injured
Mahesh Bardapurkar writes trial by fire border cinema 59 death more than 100 injuredsakal

एक सत्य घटना. १३ जून १९९७ या दिवशी घडलेली. दिल्लीतील ‘उपहार’ या चित्रपटगृहात ‘बॉर्डर’ या सिनेमाचा खेळ हाऊसफुल असताना आग लागली. ५९ लोकांचा मृत्यू झाला आणि शंभरावर जखमी झाले.

ही घटना, तिच्या मागील कारणं, चित्रपटगृह मालकांची निगरगट्ट वृत्ती, प्रशासकीय बाबूंचा अडेलतट्टूपणा, वकिलांपासून पोलिसांपर्यंत सर्वांचेच लागेबांधे आणि त्यात आपल्या मृत मुलांना न्याय मिळावा यासाठी निकरानं लढा देणारं दांपत्य, असा मोठा कॅनव्हास ‘ट्रायल बाय फायर’ ही ‘नेटफ्लिक्स’वरील वेबसिरीज उभा करते.

‘ट्रायल बाय फायर’ ही एका आगीच्या घटनेवर आधारित असली, तर ती एका दांपत्यांचा अथक लढा उभा करते. ही घटना नेमकी काय होती, हे मागील पिढीला ज्ञात आहे. एकपडदा चित्रपटगृहे, तेथील असुविधा यांबद्दल आजच्या पिढीला फारशी माहिती नसणार.

मात्र, स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला ‘बॉर्डर’ हा सिनेमा आणि भावनेच्या लाटेवर तुफान चाललेल्या या सिनमाद्वारे अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी दिल्लीतील ‘उपहार’ या चित्रपटगृहाच्या मालकानं मोठा तांत्रिक प्रश्न निर्माण झालेला असूनही, तात्पुरती दुरुस्ती करून कोंबलेले प्रेक्षक,

व्हीआयपी गेस्टच्या सोयीसाठी कुलूप लावून बंद केलेली बाल्कनी, मोठी आग लागल्यास ती विझवण्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा नसणं आणि मॅनेजरनं प्रेक्षकांना मदत करण्याऐवजी कॅश घेऊन काढलेला पळ असा संतापजनक मामला उपहारमध्ये घडला.

मारल्या गेलेल्या ५९ प्रेक्षकांमध्ये नीलम आणि शेखर कृष्णमूर्ती (राजश्री देशपांडे आणि अभय देओल) यांच्या १७ वर्षांची मुलगी आणि १३ वर्षाच्या मुलाचा समावेश होता. या कुटुंबानं, विशेषतः नीलम यांनी चित्रपटगृह मालक अन्सल बंधूंना धडा शिकवण्याचा आणि मृतांना न्याय मिळवून देण्याचा निश्‍चय केला आणि तब्बल २५ वर्षं लढा दिला.

या लढ्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला, मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांच्या नातेवाइकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले, छोटे छोटे पुरावे गोळा करण्यासाठी जीव धोक्यात घालवा लागला, प्रशासनापासून राजकारण्यांपर्यंत सर्वांशीच शत्रुत्व पत्करावं लागलं, सीबीआयसारख्या संस्थेनंही दगा दिला.

मात्र, तरीही हे दांपत्य लढतच राहिलं व शेवटी त्यांच्यासाठी न्यायाचं दार किलकिलं का होईना, उघडलं. आज सर्व सिनेमगृहांत, मॉलमध्ये असलेल्या आगप्रबंधक सुरक्षा या खटल्याच्या निकालाचं फलित! या वेबसिरीजचा शेवटचा भाग तुम्हाला विचार करायला, खूप खोलवर विचार करायला भाग पाडतो आणि हेच या सिरीजचं यश ठरावं.

दिग्दर्शक प्रशांत नायर, रणदीप झा आणि अवनी देशपांडे यांनी खटल्याची सुनावणी आणि प्रत्यक्ष काय घडलं होतं याचा फ्लॅशबॅक या पद्धतीनं कथेची मांडणी केली आहे. हा सर्व प्रवास प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा, अत्यंत थकवणारा आहे. तुम्ही स्वतः पालक असल्यास, हा घटनाक्रम तुम्हाला अधिकच अस्वस्थ करतो.

अत्यंत परिणामकारक दृश्यं, कमीत कमी, मात्र टोकदार संवाद, प्रत्येक पात्राची मानसिकता उभी करण्यासाठी दिलेला वेळ यामुळं कथा थेट भिडते. सिरीजचा पाचवा आणि सहावा भाग मात्र ताणल्यासारखे वाटतात. अभिनयाच्या आघाडीवर सर्वच कलाकारांची कामगिरी भन्नाट आहे. राजश्री देशपांडे यांनी अत्यंत जिद्दी, कणखर नीलम ताकदीनं साकारली आहे.

अभय देओल हा कलाकार गुणी आहेच आणि अशी आव्हानात्मक भूमिका मिळाल्यावर तिचं चीज कसं करायचं याचा वस्तुपाठ तो उभा करतो. वेगळ्या भूमिकेत आशिष विद्यार्थी लक्षात राहतो. एकंदरीतच, हे सुन्न करणारं जळजळीत सत्य सर्व व्यवस्थांना अस्वस्थ करणारे प्रश्‍न विचारत राहतं. त्याची उत्तरं मात्र सातत्यानं शोधत राहावी लागणार आहेत...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com