Marital Counseling
sakal
Marital Counseling : “विवाहानंतर संवाद तुटला? समुपदेशक देतात मार्गदर्शन आणि मुलांच्या हिताचा उपाय!”
डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न : मी एक सुशिक्षित, नोकरी करणारा पती आहे. माझे लग्न झालेले असून, आम्हाला दोन अल्पवयीन मुले आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी कोणतीही पूर्वसूचना न देता मुलांसह तिच्या माहेरी राहायला गेली. तेव्हापासून ती वेगळीच राहते. मी संवाद साधण्याचा व मुलांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. मात्र जेव्हा मी सासरच्या घरी मुलांना भेटण्यासाठी जातो, तेव्हा मला भेटू दिले जात नाही. अनेकदा वादविवाद होतो. संघर्ष टाळण्यासाठी मी स्वतःहून तिथे जाणे कमी केले. वडील म्हणून मुलांच्या संगोपनासाठी आवश्यक सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची माझी तयारी आहे. पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी विमा प्रक्रियेतही मी पूर्ण सहकार्य केले आहे. पत्नीचा आध्यात्मिक मार्गदर्शनावर व काही बाबतींत बाह्य सल्ल्यांवर मोठा विश्वास आहे. तिच्या श्रद्धेचा मी आदर करतो; मात्र त्या प्रभावांमुळे कुटुंबातील संवाद व मुलांशी असलेला माझा संपर्क अधिक कठीण होत आहे, असे मला वाटते. मी कोणताही वाद किंवा जबरदस्ती करू इच्छित नाही. माझी एकच चिंता आहे, की या सर्व परिस्थितीत मुलांशी नातेसंबंध तुटू नयेत. अशा वेळी भावनिक समतोल राखत आणि मुलांच्या हिताला प्राधान्य देत, पती आणि वडील म्हणून योग्य मार्ग कोणता असू शकतो?
उत्तर : तुमची परिस्थिती भावनिकदृष्ट्या कठीण आणि संवेदनशील आहे. पत्नी मुलांसह वेगळी राहू लागल्याने वडील म्हणून तुम्हाला मुलांपासून अंतर जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनिक समतोल राखणे आणि मुलांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणे. मुलांशी संपर्क कमी झाला असेल तरी मुलांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आर्थिक, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षिततेबाबत तुमचा सहभाग सातत्यपूर्ण ठेवा. त्यामुळे मुलांना तुमची उपस्थिती जाणवते. दुसरी गोष्ट म्हणजे पत्नीचे माहेरी जाणे आणि संवाद बंद होणे यामागे तिच्या दृष्टीने काही कारणे असू शकतात- जी कदाचित तुमच्या लक्षात आलेली नसतील. तिचा राग किंवा मनातली खदखद नेमकी कशामुळे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही आत्मपरीक्षण करावे लागेल. ‘मला नक्की काय हवे आहे?'' याबाबत तुमचे मत स्पष्ट असायला हवे. तुम्हाला पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तिच्या गुणावगुणांसह तिला स्वीकारावे लागेल. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी, विचार वेगळे असतात. तुमच्या पत्नीचा आध्यात्मिक मार्गदर्शनावर व बाह्य सल्ल्यांवर विश्वास आहे, ही तिची निवड आहे. परंतु त्या प्रभावांमुळे तुमचे नाते धोक्यात येत असेल, तर या टप्प्यावर समुपदेशनाची गरज आहे. कारण समुपदेशनात ‘दोष कुणाचा’ यापेक्षा परिस्थिती समजून घेणे आणि उपाय शोधणे समाविष्ट असते. लक्षात घ्या, की वाद, जबरदस्ती किंवा कायदेशीर दडपण यांमुळे नाती अधिक ताणली जातात. संवाद, सातत्य आणि व्यावसायिक मार्गदर्शन यांमुळे नात्यातील दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता वाढते.

