कुठलाही सण जवळ आला, की हमखास कुठे ना कुठेतरी एक्झिबिशन किंवा ऑनलाइन सेल्स लागलेले असतात. जवळपास लागलेल्या प्रदर्शनांना भेट देण्याची संधी मी सहसा सोडत नाही. या अशा सेलसाठी किंवा प्रदर्शनांसाठी मी बराच काळ शॉपिंग करण्यापासून स्वतःला रोखून धरलेलं असतं..कुठंही न मिळणारी गोष्ट प्रदर्शनांमधून घ्यायला आणि अर्ध्या किमतीत सेलमध्ये मिळणाऱ्या वस्तूंची खरेदी करायला मला खूप आवडतं. आपल्या भारतीय परंपरेमध्ये असंख्य सणवार आहेत. या सणवारांचा मान राखून आपली परंपरा हेतूपूर्वक पुढे घेऊन जाण्यासाठी हे सण साजरे करायला हवेत या मताची मी आहे. या सणांच्या निमित्ताने घरातलं वातावरण प्रसन्न होतं..धूप, अगरबत्ती यांचे सुगंध दरवळतात रोजच्या दिवसापेक्षा तो दिवस खूप उत्साही वाटतो. खरंतर या सकारात्मकतेसाठी मी सणांची आतुरतेने वाट बघत असते. मग त्या दिवशी काय घालायचं, स्वतःची तयारी कशी करायची यासाठीसुद्धा मी सतर्क असते आणि उत्साहाने जोरदार तयारीही करते. सध्या कुठलीही टीव्ही मालिका करत नसल्यामुळे आणि पुण्यात राहत असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मनमुराद आनंद लुटता येतो आहे..पुण्यामध्ये अशा प्रकारची प्रदर्शनं कुठे ना कुठेतरी लागलेलीच असतात. दोन-चार दिवसांपूर्वी अशाच एका प्रदर्शनाला भेट दिली. तिथल्या एका स्टॉलवर साधारण नववी-दहावीत असलेली एक मुलगी तिच्या ताईला मदत करायला म्हणून आली होती. ती साड्या आणि ड्रेसबद्दल अतिशय उत्साहानं न थकता प्रत्येक ग्राहकाला संपूर्ण माहिती देत होती.तिचा आत्मविश्वास आणि नम्र चेहरा अतिशय लोभस वाटत होता. काही वेळ गेल्यानंतर मी तिच्याशी जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात, ते कुठल्या शाळेत आहे इथपर्यंत गप्पा झाल्या. तिच्या विक्रीकौशल्यामुळे मी बरीचशी खरेदीसुद्धा केली. तिच्या या चतुराईचं मी कौतुक केलं, त्यावर ती उत्स्फूर्तपणे ‘धन्यवाद’ असं म्हणाली. मला तिचं अजूनच कौतुक वाटलं..त्या क्षणी मला जाणवलं, की प्रशंसा स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या मेहनतीला मान देणं आहे आणि ती मुलगी हे अवघड कौशल्य सहजपणे पाळत होती. तिला तिच्या मेहनतीचा आणि प्रयत्नांचा आदर असल्याचं जाणवलं. बऱ्याच जणांना प्रशंसा स्वीकारताना संकोच होतो किंवा ते नकार देतात- कारण प्रशंसेची सवयच नसते. माझंही यापेक्षा काही वेगळं नव्हतं.कोणी कौतुक केलं, तर यात काय विशेष किंवा काही नाही हो हे तर कोणीही केलं असतं असं साधारणपणे आपण उत्तर देतो. ‘छान आहे तुझं जॅकेट किंवा ड्रेस’ असं म्हटल्यानंतर ‘अगं खूप जुनं आहे.’ किंवा छान दिसतेस’ अशी साधी कॉम्प्लिमेंट आली, तरी अविश्वासानं ‘खरंतर मी आज छान रेडी नाही झाले माझे केसच खूप खराब आहेत’ अशा पद्धतीने नकारात्मक बाजू दाखवून त्या प्रशंसेला मान देत नाही..खरंतर प्रशंसा स्वीकारणं म्हणजे तुम्ही तुमच्या यशाचं आणि प्रयत्नांचं स्वतः कौतुक करत असता. ही केवळ एक चांगुलपणाची प्रतिक्रिया नाही, तर ते स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्याचा मार्ग आहे. ‘या सणासुदीला शॉपिंग करताना स्मार्ट व्हा; पण त्याचबरोबर इतरांनी दिलेली प्रशंसा ही खुल्या मनानं आणि स्मितहास्यानं स्वीकारा!.काही कानमंत्रवेळ मिळेल तशी खरेदीची यादी तयार ठेवणं : ‘सेलमध्ये गेल्यावर आकर्षक गोष्टी पाहून मन विचलित होऊ शकतं. यादी तुम्हाला सांभाळून ठेवेल.ब्रँड आणि किमतीची तुलना करा : आजकाल ऑनलाइन शॉपिंगमुळे किमतींची तुलना करणं सोपं झालं आहे. एकाच वस्तूची किंमत वेगवेगळ्या वेबसाईटवर किंवा शॉपमध्ये काय आहे हे तपासू शकता.प्रदर्शनांमध्ये खरेदी करताना : प्रदर्शनांमध्ये काही अँटिक गोष्टी मिळण्याची शक्यता असते. कोणाकडेही नाही अशा वस्तू आपल्याला इथे मिळतात, तेव्हा भविष्यात लागणाऱ्या वस्तू खरेदी करून ठेवायला हरकत नाही.वस्तूंची गुणवत्ता तपासा : कधी कधी सेलमध्ये जुना स्टॉक डॅमेज झालेल्या वस्तू किंवा एक्सपायर होण्याच्या जवळ आलेल्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे आवर्जून या वस्तू नीट तपासा. कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट जरूर बघा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.