- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
आजकालच्या धकाधकीच्या आणि गतिमान जीवनशैलीत महिलांकडून अनेक भूमिका निभावल्या जात आहेत. कामाच्या जबाबदाऱ्या आणि घरगुती कर्तव्यं यामुळे स्त्रियांची अनेकदा मोठी कसरत होते. कामाच्या ठिकाणी असलेला वेळेचा दबाव, डेडलाईनमध्ये काम पूर्ण करण्याचं प्रेशर, सतत काम योग्य करण्याची अपेक्षा, कामाची अस्थिरता, मानसिक थकवा आणि बरेचदा जोडीदार, कुटुंब किंवा सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे, स्त्रियांना बरेचदा मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं आणि या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे मैत्रिणींनो आपण स्वतःसाठी वेळ काढणं, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणं याला अनेक वेळेला कमी प्राधान्य देतो. त्यामुळेच आपला ‘वर्क लाइफ बॅलन्स’ म्हणजेच काम आणि खासगी आयुष्य यामधील समतोल बिघडतो.