डास चावल्यामुळे होऊ शकतात 'हे' आजार

संसर्गित डास चावल्यामुळे होतात 'हे' आजार
 mosquitos
mosquitos esakal

डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार होतात हे आपल्या साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे हे आजार टाळायचे असतील तर घरात स्वच्छता राखणं, जास्त काळ पाणी साठवून न ठेवणं या काही मुलभूत गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, तरीदेखील आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, अनेकदा मोठ्या प्रमाणावर डासांची पैदास होते. विशेष म्हणजे बऱ्याचदा संसर्गित डास चावल्यामुळे झिका विषाणूसारख्या गंभीर आजाराचाही सामना करावा लागतो. म्हणूनच, डास चावल्यावर कोणते आजार होतात हे पाहुयात. (mosquito bites can lead 4 serious diseases know symptoms and remedies)

१. मलेरिया -

अनोफेलेस डासाची मादी चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे मलेरिया. बऱ्याचदा हा आजार जीवावरही बेतू शकतो. मलेरियाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला प्रचंड ताप येणे, थंडी वाजून अंग थरथरणे, थोडक्यात फ्ल्यू झाल्यासारखी लक्षणे दिसून येतात. परंतु, योग्य काळजी घेतली तर या समस्येवर मात करता येऊ शकते. विशेष म्हणजे मलेरिया झाल्यावर काही गंभीर समस्याही उद्भवू शकतात. त्या पुढील प्रमाणे -

१. सेरेब्रल मलेरिया - रुग्णाच्या वर्तनात विचित्रपणा येतो, त्याला नीट शुद्ध नसते, आकडी येते, रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा इतर न्यूरोलॉजिकल विकृती होऊ शकतात.

२. हेमोलिसिसमुळे (लाल रक्तपेशींचा नाश) गंभीर स्वरूपाचा ऍनिमिया (अशक्तपणा) होऊ शकतो.

३. हिमोग्लोबिनूरिया- हेमोलायसिसमुळे लघवीमध्ये रक्त येते.

४. अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (एआरडीएस) म्हणजेच श्वसनाला तीव्र त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये दाह उत्पन्न होतो, ज्यामुळे ऑक्सिजनच्या देवाणघेवाणीत अडथळे येतात.

५. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत विकृती निर्माण होतात.

६.हृदय व रक्तवाहिन्या यंत्रणेत बाधा निर्माण झाल्यामुळे रक्तदाब कमी होतो.

७.मूत्रपिंडाला तीव्र इजा होते.

८. हायपरपेरासिटीमिया - यामध्ये 5% पेक्षा जास्त लाल रक्तपेशी मलेरियाच्या परजीवींमुळे संक्रमित होतात.

९.मेटाबोलिक एसिडोसिस (रक्तात आणि ऊतकांच्या द्रव्यांमध्ये आम्लाचे प्रमाण वाढते), बहुतेकदा हायपोग्लाइसीमियासोबत

१०. हायपोग्लाइसीमिया (रक्तातील शर्करा कमी होते) ज्यांना मलेरियाची गुंतागुंत नाही अशा गर्भवती स्त्रियांना हायपोग्लाइसीमिया होऊ शकतो, किंवा क्विनिनच्या उपचारानंतर देखील होऊ शकतो.

२. झिका विषाणू -

झिका हा आजार बहुतांश प्रमाणात एडीस जातीच्या संसर्गित डासाच्या चावण्याने पसरतो. हा आजार गर्भवती मातेकडून तिच्या गर्भाला होऊ शकतो. गर्भारपणामध्ये हा आजार झाल्याने बाळामध्ये जन्मापासून काही विकृती येण्याची शक्यता असते. अजूनपर्यंत झिका या आजारावर काही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. झिका विषाणूने संसर्गित अनेक लोकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत किंवा खूपच सौम्य लक्षणे आढळतात.

३. चिकनगुनिया -

संसर्गित डास चावल्याने चिकनगुनियाचा विषाणू पसरतो. ताप आणि सांधेदुखी ही या आजाराची सर्वसामान्यतः दिसून येणारी लक्षणे आहेत. त्याबरोबरीनेच डोकेदुखी, स्नायू दुखणे, सांध्यांमध्ये सूज येणे किंवा पुरळ येणे अशी लक्षणे देखील उत्पन्न होऊ शकतात. संसर्गित डास चावल्यानंतर साधारणपणे ३ ते ७ दिवसांत लक्षणांची सुरुवात होते. चिकनगुनिया हा काही जीवघेणा आजार नाही पण लक्षणे मात्र खूपच त्रासदायक ठरू शकतात. बहुतांश रुग्णांना आठवडाभरात बरे वाटू लागते. पण काही व्यक्तींच्या बाबतीत सांधेदुखी बरेच महिने कायम राहू शकते.

चिकनगुनियाचा संसर्ग झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या लक्षणांवरील उपचारांसाठी -

१.भरपूर आराम करावा.

२. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन ते कोरडे पडू नये यासाठी द्रव पदार्थांचे सेवन भरपूर प्रमाणात करावे.

३.ताप आणि अंगदुखी कमी व्हावी यासाठी पॅरासिटामॉलसारखी औषधे घ्यावीत.

४. डेंग्यूची शक्यता जोवर पूर्णपणे पुसली जात नाही तोवर ऍस्पिरिन आणि इतर नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांचे सेवन करू नये, त्यामुळे ब्लीडींगचा धोका कमी होईल.

५. जर तुम्ही इतर कोणत्या आजारासाठी औषधे घेत असाल तर त्यासोबत अजून औषधे घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

४ डेंग्यू ताप -

एडीस जातीचा डास चावल्याने डेंग्यूचे विषाणू पसरतात. जगभरात १०० पेक्षा जास्त देशांमध्ये डेंग्यू हा आजार आढळून येतो. डेंग्यूचा संसर्ग झालेल्या चार जणांपैकी एक व्यक्ती आजारी पडते. डेंग्यूने आजारी असलेल्या काही व्यक्तींमध्ये लक्षणे तीव्र असतात तर काहींच्या बाबतीत ती सौम्य असतात. डेंग्यू जर गंभीर स्वरूपाचा असेल तर तो काही तासांत जीवघेणा ठरू शकतो, त्यासाठी रुग्णाला इस्पितळात भरती करून त्यावर उपचार करणे गरजेचे असते. ताप, मळमळ, उलट्या, पुरळ, अंगदुखी (डोळे चुरचुरणे, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, स्नायू, सांधे किंवा हाडे दुखणे) ही डेंग्यूची सर्वसामान्य लक्षणे आहेत.

डेंग्यूची लक्षणे २ ते ७ दिवस टिकतात. बहुतांश व्यक्ती आठवडाभरात बऱ्या होतात पण अधिक काही गुंतागुंत होऊ नये यासाठी त्यांच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवणे खूप आवश्यक असते.

(डॉ. संदीप दोशी हे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये इंटर्नल मेडिसिन अँड एक्झिक्युटिव्ह हेल्थ चेकअप कन्सल्टन्ट आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com