
- डॉ. नमिता कोहोक
‘आई म्हणजे आपली पहिली गुरू आणि आईपासूनच आपलं पहिलं अस्तित्व सुरू,’ या ओळींचा अर्थ खऱ्या अर्थानं कळाला तो मी आई होणार असल्याच्या अनुभूतीमुळेच. माझ्यात एक जीव वाढत असल्याच्या भावना खूप सुखावणाऱ्या होत्या.
तेव्हा मी एमबीएच्या पहिल्या वर्षाला होते, एक पूर्वप्राथमिक शाळाही चालवत होते. त्यामुळे सतत माझ्यासमोर असलेल्या लहान मुलांना पाहून आता माझ्यात असलेला जीव कधी माझ्या कुशीत येणार याची खूप उत्सुकता होती. तो क्षण आला, त्याचा आनंद मी घेतला; परंतु काही वर्षांनी झालेल्या कर्करोगानं या आनंदाला ग्रहण लागेल असं वाटलं. त्यातूनही मी आणि मुलगा तावूनसुलाखून बाहेर पडलो.
स्त्री आई होते तेव्हा तिच्या आयुष्यात प्रचंड बदल होतात, तसं माझ्यातही झालं. केवळ माझ्या विचारात असणारं माझं आयुष्य आता मुलाभोवती फिरू लागलं. त्याचं उठणं, जेवणं, जागणं या सगळ्याशी मिळतंजुळतं घेत मी माझं जगणं शिस्तबद्ध केलं. त्याच्या वाढीच्या टप्प्यांनुसार मीही त्याप्रमाणेच एकेक टप्पा जगत होते.
घरात मुलाला सांभाळायला अनेकजण असल्यानं त्याच्या बालपणीच्या काळातही मी करिअर करू शकले. त्याला वेळ देण्यासाठी मी त्याच्या दिनचर्येप्रमाणे माझी दिनचर्या आखत गेले. मुलाच्या शिक्षणाबरोबरच माझंही शिक्षण सुरू होतं. एमबीएनंतर मी पोस्टग्रॅज्युएशन केलं.
सर्वसामान्यांप्रमाणेच माझं आयुष्य सुरू होतं; परंतु मला कर्करोगाचं निदान झालं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त मुलाची काळजी भेडसावत होती. सुरुवातीला उपचारासाठी मुंबईला जायचं आहे एवढंच माहिती होतं. तिथं शस्त्रक्रिया करावी लागेल, असं सांगण्यात आलं. त्यानंतर आठवडाभरात तुम्ही घरी जाऊ शकता असं कळाल्यावर मी थोडी निश्चिंत झाले,
की किमान आठ दिवसांनंतर तरी मुलाला भेटता येणार आहे. अवघ्या सात-आठ वर्षांच्या अवानला बाजूला ठेवून मी लढाई लढत होते. या सगळ्याला बळ मिळालं ते अवानमुळेच. त्याचा चेहरा समोर यायचा आणि मला त्याच्यासाठी जगायचं आहे हीच भावना मनात यायची. शस्त्रक्रियेचा काळ मोठा होता. मी शुद्धीवर आले,
तेव्हा माझे पती अवानला घेऊन आले होते. त्याला पाहिल्यावर माझा धीर सुटला, समोर असूनही त्याला जवळ घेता येत नव्हतं. शस्त्रक्रियेनंतर आलेल्या रिपोर्टमधून कर्करोगाचं निदान झाल्याचं कळालं. मी हादरून गेले. मुलाचं कसं होणार हा प्रश्न सतावत होता. त्याच्या विचारातूनच माझ्यामध्ये सकारात्मकता निर्माण झाली. त्याच सकारात्मकतेनं केमोथेरपीला मी सामोरी जात होते. १३ केमोथेरपी, ३३ रेडिएशन्स आणि ११ तासांची शस्त्रक्रिया हे पार पडलं.
उपचारादरम्यान केस जात होते, तेव्हा अवानला काय सांगायचं असा प्रश्न पडला. त्याला शाळेत सोडायला जाताना माझी चालण्याची गतीही कमी झाली होती. तेव्हा मी त्याला समजावायचे, की माझं खाण्याकडे लक्ष नाही आणि व्यायाम करत नाही म्हणून आजारी पडते. या काळात त्याच्यामध्येही खूप बदल होत गेले. तो माझी छोटीछोटी कामं करायचा. मला केमोथेरपीला मुंबईला जायला लागायचं, तेव्हा अवानला मनामध्ये त्रास होऊ नये म्हणून मी छान तयार होऊन जायचे. मी कर्करोगग्रस्त लहान मुलांना मदत करते, तेव्हा आता तो मला त्यात मदत करतो.
मी एका शैक्षणिक संस्थेत काम करत होते. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर ही नोकरी सोडावी लागली. उपचार घेतानाच मी स्वतःची कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणापासून कामाला सुरुवात केली. आजारपण, मुलगा आणि कंपनीचं काम या साऱ्या आघाड्या मी सांभाळू लागले. कामानिमित्त माझा उत्तराखंड, मसुरी या ठिकाणी प्रवास होऊ लागला. मी मुलाच्या सुट्ट्या आणि त्याच्या वेळापत्रकानुसार बाहेर जायचे.
हळूहळू कंपनी मोठी झाली. आज माझ्यासोबत ४४ जण काम करतात. त्यातील आठ टक्के लोक कर्करोगातून बरे झालेले आहेत. त्यांच्यासाठी मी काही जागा राखून ठेवल्या आहेत. नऊ वर्षांच्या कालावधीत आज माझ्याकडे १३३ शाळांचं काम आहे. आत्तापर्यंत मी ६५ पारितोषिकं पटकावली आहेत. त्यामध्ये माझ्या मुलाचं श्रेय मोठं आहे.
२०१५ मध्ये मी नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत फोटोजनिक विभागात यश प्राप्त केलं.
हाँगकॉंगमध्ये २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत ‘मिसेस इंटरनॅशनल वर्ल्डवाईड क्वीन’ किताब पटकावला. या स्पर्धेत भाग घेणारी मी पहिली भारतीय आहे.
कॅन्सरशी झुंज देणाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेचा ‘मिसेस ग्लोबल युनायटेड एलिड लाईफटाईम क्वीन’ हा किताब २०१७ मध्ये पटकावला. सध्या मी या युनायटेडच्या संचालकपदी कार्यरत आहे.
गरोदरपणातच नाही, तर इतर वेळेलाही आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
गरोदरपणाच्या काळात करिअर करताना मनामध्ये किंतु परंतु ठेवू नका.
बाळात होणाऱ्या बदलाचा आनंद घेत जगण्याचा प्रयत्न करा.
नवनवीन बदल स्वीकारा, सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. कुटुंबाकडून मदत घ्या.
मातृत्व अनुभवताना स्वत:साठी वेळ काढा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा.
(शब्दांकन : तनिष्का डोंगरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.