Bhide Wada : बापाने गोणीत घालून शाळेत नेलं आणि सावित्रीच्या लेकीने इतिहास घडवला

गंज पेठेत वास्तव्यास असणारी अवघ्या दहा-अकरा वर्षांची मुक्ताबाई जोती-सावित्रीच्या शाळेत दाखल झाली, ही घटनाच ऐतिहासिक ठरली.
Bhide Wada
Bhide Wadagoogle

मुंबई : १९ व्या शतकात ‘विद्येविना मति गेली’ हे सत्य प्रतिपादन करून स्त्री-शुद्रादिशूद्रांसाठी पहिली शाळा विद्यादात्री सावित्रीबाई फुले आणि म. जोतिराव फुले यांनी सुरू केली. ज्ञानावर असणारी उच्चजातीय व पुरुषांच्या मक्तेदारीला यातून आव्हान मिळले.

ज्ञान बहुजनांसाठी, समस्त स्त्रियांसाठी खुले झाले तर त्यांच्या जाणीवांचा विकास होतो, त्यांचे आत्मभान जागे होऊ लागते, ते विषमतेविरुद्ध उभे ठाकतात याची अनुभूती येऊ लागली. या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे उदाहरण म्हणजे मुक्ताबाई मांग(साळवे). मुक्ताबाई ही सावित्रीबाई व जोतिबा फुले यांची विद्यार्थिनी. (mukta salve first student of savitribai phule bhide wada)

गंज पेठेत वास्तव्यास असणारी अवघ्या दहा-अकरा वर्षांची मुक्ताबाई जोती-सावित्रीच्या शाळेत दाखल झाली, ही घटनाच ऐतिहासिक ठरली. कारण मुक्ताबाईचा जन्म मातंग जातीत झाला होता. हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या जातीतील एक मुलगी ज्ञान संपादनासाठी सत्यशोधकांच्या शाळेत प्रवेश करते आणि नुसती मुळाक्षरे गिरवून, आकडेमोड करून न थांबता आपल्या डोळय़ात झणझणीत अंजन घालणारा पहिला सत्यशोधक निबंध लिहून उगवत्या बुद्धिजीवी वर्गाची भागीदार बनते ही ऐतिहासिक व क्रांतिकारी गोष्ट आहे.

Bhide Wada
Live in Relationshipमध्ये राहणाऱ्या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळते का ?

मातंग समाजातील "वस्ताद लहूजी साळवे" यांची नात मुक्ता साळवे ही सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनी. तिला तिचा बाप शाळेत घालायला घेवुन येतो तेच एका गोणीत घालून... का तर कोणी पाहिले तर दगडं पडतील... हीच मुक्ताबाई पुढे भारतातील पहिली स्त्रीवादी, महार-मांगांची वेदना मांडणारी भाष्यकार बनली...

मुक्ताबाईच्या निबंधाचे शीर्षक ‘मांग-महार-चाभाराच्या दुःखाविषयी’ हे आहे. सत्यशोधक संस्कारात आत्मभान जागृत झालेली मुक्ता आपला पहिला शब्द, पहिला विचार निबंधातून मांडते तो आपल्याला समाजव्यवस्थेत लादलेल्या स्थानाबद्दल, जातीव्यवस्थेने, लादलेल्या दुःखाबद्दल. सत्यशोधक संस्कारांमुळे तिला इतिहास, धर्म, संस्कृती याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला.

१८५५ मध्ये ‘ज्ञानोदय’च्या अंकात १५ फेब्रुवारी आणि १ मार्चच्या अंकात तिचा निबंध प्रसिद्ध झाला. म. फुले गौरव ग्रंथाच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीमध्ये परिशिष्ट-७ मध्ये हा निबंध, ‘म. जोतीराव फुले यांच्या शाळेतील मुक्ता नावाच्या ११ वर्षाच्या मातंग मुलीचा १ मार्च १८५५ च्या ‘ज्ञानोदय’मध्ये (व १४ अ. ५) प्रकाशित झालेला निबंध’ अशा तळ टीपेसह १९९१ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या निबंधातून मुक्ताची सत्यशोधक लेखनशैली व विचारपद्धती प्रतित होते.

भारतामध्ये जात आणि पुरुषसत्ता वर्चस्वशाली असल्यामुळे येथील सामाजिक संघर्ष मुख्यतः जातीसंघर्षच होता. या जातीसंघर्षात कनिष्ठ जातीच्या ‘कॉमनसेन्स’मधील स्वायत्त घटकाने वारंवार उसळी घेतली.

‘कॉमनसेन्स’ ही अंतोनिओ ग्रामसी व नवमार्क्सवाद्याने मांडलेली संकल्पना आहे. त्याच्या मते, ‘कॉमनसेन्स’चा एक घटक हा स्वायत्त असतो. स्वतःच्या श्रमातून परिवर्तन घडवण्यासाठीची व्यावहारिक कृती करण्यामध्ये व्यग्र असलेल्या शोषित जन-समूहातील सदस्याचे सर्वसाधारण आकलन हा घटक व्यक्ती करीत असतो. मुक्ता साळवेने व्यक्त केलेले ज्ञान, तिचे आकलन आपल्याला या प्रकारचे दिसते.

मुक्ताने निबंधातून व्यक्त केलेले दलित स्त्रियांचे दुःख, दलितांच्या होणाऱ्या कत्तली याबद्दलचे विवेचन त्याची साक्ष देतात. तिने आपल्या निबंधाची सुरुवात संघटित धर्माच्या चर्चेसंदर्भात केलेली दिसते. एक प्रेषित, समान आचारसंहिता, कर्मकांड एक संहिता (धर्मपुस्तक) ही संघटित धर्माची वैशिष्टय़े मानली गेली.

Bhide Wada
Bahulicha Houd : ९ वर्षांच्या या बाहुलीला लोकांनी काचा खायला घालून मारले

मुक्ता साळवे म्हणते...

जसे ख्रिस्ती धर्मियांसाठी बायबल, इस्लाम मानणाऱयांसाठी कुराण हे धर्म पुस्तक आहे, तसे ब्राह्मणी धर्माबाबत दिसत नाही. ब्राह्मणी धर्मानुसार वेद ही एक संहिता आहे. परंतु वेद वाचण्याचा तर सोडाच ते पाहण्याचेही स्वातंत्र्य ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही नाही.

मुक्ता साळवे निबंधात लिहिते, ‘… वेद तर आमचीच (ब्राह्मणांची) मक्ता आहे. आम्हीच याचे अवलोकन करावे. तर यावरून उघड दिसते की, आम्हाला धर्मपुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणांसाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणांचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते की नाही बरे?’

म्हणजे देव हे ब्राह्मणी ग्रंथ आहेत. त्यावर ब्राह्मणांची मक्तेदारी आहे. हे स्पष्ट करत सांस्कृतिक मक्तेदारीला ती यथाशक्ती विरोध करताना दिसते आणि पुढे जाऊन आम्ही ब्राह्मर्णी धर्मविरहित लोक आहोत अशी भूमिका घेऊन ब्राह्मणी धर्म विरुद्ध अब्राह्मणी धर्म असे द्वैत अधारेखित करते.

धर्मातील नीति कल्पनांचा अनुभव एकाने घ्यावा व इतरांनी ‘खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पहावे’ त्यापासून दूर रहावे या अमानवी, भेदयुक्त विभाजनाला तिने विरोध दर्शविला आहे. भेदाभेद करणाऱया ‘धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो’ अशी कामना केली आहे. तिने धर्म, संस्कृती, रूढी, परंपरांच्या नावाखाली घडवल्या जाणाऱया हिंसाचाराच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

समकालिन प्रश्नावर भाष्य करताना ती आपल्या सत्यशोधक निबंधात जातीय हिंसाचाराच्या विरोधात भाष्य करते. दलित जातींवर हजारो वर्षे हिंसा लादली जात आहे. त्यांना साधे ‘माणूस’ हीन मानणाऱया परंपरांचा तिने धिक्कार केला आहे.

इतिहासात वाडे-महाल, वेस, किल्ले, गढी बांधताना चाभार-मांग-महारांना बळी दिले जात होते. मुक्ता या संदर्भात लिहिते, ‘इमारतीच्या पायात आम्हास तेल शेंदूर पाजून पुरण्याचा’ उपक्रम चालविला होता असे शब्द ती लिहिते. तिला हा उपक्रम म्हणजे ‘आमचा निर्वंश’ करण्याचा भाग वाटतो.

श्री.म.माटे यांच्या अनेक कथा महार-मांग पती-पत्नीला वेशीला वेशीत जिवंत गाडण्याच्या प्रथेवर प्रकाश टाकणाऱया आहेत. त्या श्री.म.माटेंच्या कथांची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

सत्यशोधक चळवळीने स्त्री प्रश्नाची अत्यंत महत्त्वपूर्ण मांडणी केली. सर्व स्त्रिया शोषित असतात या विधानातील फोलपणा दाखवत भारतासारख्या देशात स्त्रियांचे शोषण जातिव्यवस्था करते. म्हणूनच विषमतेने बद्ध असणाऱया जात श्रेण्यांनुसार स्त्रियांचे शोषण होते हा विचार प्रथम सत्यशोधक चळवळीने मांडला.

निबंधातील आशय-

मुक्ता साळवेने लिहीलेल्या निबंधातील मुद्दे व भाषा आजही विचार करायला लावणारी आहे. ब्राम्हणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना ती म्हणते, 'ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग..

शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञातिबांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे. ती म्हणते..

'अहो दारिद्र्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हाजर्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा.

दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते. तिने मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दलही लिहिले आहे.. मांग-महार स्त्रिंयाच्या वाटयाला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना 'त्या स्त्रियांना कसे उघडयावर बाळंत व्हावे लागते, त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात' याचे वर्णन तिने केले आहे..

म.फुल्यांनी ‘कुळंबीण’ या अखंडात कुळंबीण म्हणजे ‘शेतकरी स्त्रिया आणि भटीण’ म्हणजे ब्राह्मण स्त्रियांच्या दुःखात, शोषणात जमीन-अस्मानाचे अंतर असल्याचे म्हटले आहे. ब्राह्मणेत्तर स्त्रियांना गृहश्रमासोबत इतरही उत्पादक श्रम करावे लागतात, ब्राह्मण कुटुंबातील स्त्रियांना फक्त गृहश्रमाचेच ओझे आहे ही वस्तुस्थिती पुढे म. फुल्यांनी पुढे आणली आहे.

मुक्ता साळवेवर स्त्रीमुक्तीचा सत्यशोधकी संस्कार झाला होता. स्त्रियांच्या शोषणाबद्दल आपल्या निबंधात तिने म.फुल्यांप्रमाणेच जात आणि स्त्रीशोषणाची दखल घेतलेली दिसते. मुक्ता साळवे लिहिते, ‘ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात त्या वेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते.

म्हणून ऊन पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे!… जर एखाद्या वेळेस त्यास बाळंतरोग झाला तर त्यास औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार?’ म्हणजे मुक्ता स्पष्टपणे नोंदवते की आमच्या स्त्रिया म्हणजे दलित-कष्टकरी स्त्रिया आणि उच्चजातीय स्त्रिया असा भेद स्त्रियांमध्ये आहे. दलित स्त्रियांना कोणत्याच प्रकारची साधी सुरक्षितता ही जातिव्यवस्था देत नाही या सत्याकडे ती लक्ष वेधते.

अवघ्या दीड पानाच्या लेखात तिने जात-पुरुषसत्ताक समाजातील शोषणाचे धागेदोरे उकलून दाखवले. तिने प्रबोधनासाठी लेखनाचे निबंधात्मक प्रारूप स्वीकारले. तिच्या निबंधात तिच्या वयाला अनुरूप भाषा येते. उदा- ‘ज्यांची बुद्धी सैतान घेऊन गेला आहे’, ‘ज्ञानरूपी गुटी’ असे शब्द येतात. सत्यशोधकी बाणा हे तिच्या निबंधाचे वैशिष्टय़ आहे.

ज्ञानाचे सार्वत्रिकरण झाल्याशिवाय खरे खुरे समाजपरिवर्तन होऊ शकणार नाही हा सत्यशोधक चळवळीचा नारा होता. मुक्ता साळवे हाच वैचारिक धागा आपल्या निबंधात मांडते आपल्या समाजाला आजार झाला आहे, म्हणून ‘ज्ञानरूपी गुटी’ दिली पाहिजे, असा सत्यशोधकी उपायही मुक्ताने सुचवला आहे.

मुक्ता साळवे या विद्यार्थिनीने "आम्ही धर्म नसलेली माणसे, धर्मरहितच राहायचे का?' असा प्रश्न केला होता. तेरा वर्षे वयाच्या मातंग समाजातील या विद्यार्थिनीने निबंध लिहिला होता व सदर निबंध तत्कालीन वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाला होता. इंग्रज सरकारमधील मेजर कॅन्डी यांनी सन १८५५ मध्ये मुक्ताचा पुण्यात सत्कार केला होता.

या निबंधास इंग्रज अधिकारी मेजर कॅन्डी यांनी महागडे चॉकलेट आणले होते. मुक्ताने नम्रपणे चॉकलेटस स्वीकारण्यास नकार दिला व म्हणाली, "सर, प्लीज गिव्ह अस गुड बुक्स एंड नॉट चॉकलेटस!"

सन १८५५ मध्ये सावित्रीबाईची विद्यार्थींनी पारितोषिक व सत्कारात पुस्तकांची मागणी करते आणि आम्ही आजही २०१५ साली मोठमोठ्या समारंभात, सत्कारात महागड्या शाली, स्मृतीचिन्हे, फुलांचे गुच्छ, हार देतो चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकमेकांस भेट म्हणून फक्त उत्तम पुस्तकेच द्यावीत.

याच मुक्ता साळवेनी डायरेक्ट परमेश्वरालाच प्रश्न विचारला आहे की, "हे परमेश्वरा, ब्राम्हणांचा व आमचा धर्म एक नाही, तेव्हा आम्ही कोणता धर्म पाळावा अथवा स्वीकारावा?" याचाच अर्थ या चिमुरडीने सन १८५५ मध्ये शोषणवादी व विषमतावादी हिंदू धर्म त्याग करण्याची घोषणा आपल्या निबंधातून केल्याचे स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com