
भीतीचे प्रकार चालले बदलत; फोबियाच्या नव्या प्रकारांचा शोध
नागपूर : प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती वाटत असते. कोणी एकटं राहायला घाबरतो तर कोणाला अंधाराची भीती वाटते तर कोणाला उंचीवरून खाली पाहण्याची भीती वाटते. काहीजण विमानात बसायला घाबरतात. पाली, झुरळ यांना घाबरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. याच भीतीला फोबिया असे म्हणतात.
प्रत्येकाला भीती वाटण्याचे वेगवेगळे कारण असू शकतात. काहींमध्ये या भीतीचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. म्हणजे ते भीतीपोटी काहीही करू शकत नाही. या भीतीचा त्यांच्या आयुष्यावरही परिणाम होते. विविध प्रकारचे फोबिया नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता फोबियाचे प्रकारही बदलत चालले आहेत.
जुन्या फोबियासोबत काहींना नवीन फोबियांनीही ग्रासले आहे. फोबियाच्या नव्या प्रकारांचामुळे त्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. या फोबियामुळे ते सतत चिंतेत असतात. चला तर जाणून घेऊया अशा काही नवीन फोबियांविषयी...
इको-एंक्झायटी
इको-एंक्झायटी हा प्रकार सध्याच्या काळात नवा आहे. पर्यावरणाच्या हानीबद्दलच्या बातम्या सतत येत असतात. पृथ्वीचे वाढते तापमान, वितळणारा बर्फ, जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली आहे, असा अनेकांचा समज होतो. अनेकांच्या मनात हवामानबदलाच्या दुष्परिणामांची भीती बसली आहे. त्यातही तरुणांना भविष्याची खूप काळजी वाटते. हवामानबदलाचा विचार समोर आला की अनेकजण घाबरू लागतात. यालाच इको-एंक्झायटी असे म्हटले जाते.
नोमोफोबिया
सध्याच्या काळात स्मार्टफोनशिवाय जगणे अशक्य झाले आहे. प्रत्येकाला स्मार्टफोन लागतो. स्मार्टफोनपासून दूर राहणे अनेकांना सहन होत नाही. याला नोमोफोबिया असे म्हटले जाते. यात फोन जवळ नसला की अस्वस्थता जाणवते. सतत मोबाईल फोनचा विचार करणे, फोन घरी विसरल्यावर आलेले मेसेज तसेच मिस्ड कॉलबद्दल विचार करत राहणे म्हणजे नोमोफोबिया.
फूड नओफोबिया
फूड नओफोबियाचे प्रमाणही वाढत चालले आहे. या प्रकारच्या फोबियामध्ये एखादा नवा पदार्थ खाऊन बघण्याबाबत प्रचंड अस्वस्थता जाणवते. लहान मुलांमध्ये हा फोबिया आढळतो.
काबरेफोबिया
सध्या फॅड डाएट्सचे प्रमाण वाढले आहे. बारीक राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. कबरेदकांच्या सेवनामुळे वजन वाढते, असेही बोलले जाते. कबरेदकांमुळे वजन वाढण्याची भीती काबरेफोबियाला जन्म देते.