नुकतीच शाळा सुरू झाली असल्याने मुलांचा दंगा सुरूच होता. म्हणजे खेळ कमी आणि दंगा मस्तीच जास्ती. मग मी मुलांसोबत एक खेळ खेळलो आणि गंमत म्हणजे मला त्यांच्या पालकांविषयीच जास्त माहिती मिळाली. हे सारं तुम्हाला आता सांगितलंच पाहिजे..मुलांचा गोंधळ-गुंधळ सुरू होता म्हणून मी त्यांना म्हणालो, ‘चला, आपण शांततेचा एक नवीनच खेळ खेळू.’मुलं तयार झाली. ‘सर्वांनी बरोब्बर अकरा मिनिटं, डोळे बंद करून शांत बसायचं. मी टाळी वाजवली, की सर्वांनी सावकाश डोळे उघडायचे. मग आपल्याला कसं वाटलं? या शांततेत मनात कुठले कुठले विचार आले? काय काय ऐकू आलं? डोळे बंद असूनही काही दिसलं का? हे मला तुम्ही सांगायचं.’.हे ऐकताच सर्व मुलांनी माना डोलावल्या. पण मुलांनी नंतर जे जे सांगितलं ते ते ऐकून मी सुन्न झालो. पालकांनी मुलांशी कसं वागलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि मुलांवर कसा विश्वास टाकला पाहिजे हे मुलांनी अत्यंत मृदूपणे सांगितलं.मजा म्हणजे हा ‘शांततेचा खेळ’ मुलांना आवडू लागला. कधी कधी मुले आपणहून म्हणत, ‘सर चला, अकरा मिनिटं शांततेचा खेळ खेळू. शांततेत ऐकायला पण मजा येते.’.आमच्या पहिल्या खेळानंतर मुलांनी सांगितलेल्या गोष्टींचा थोडक्यात सारांश असा :‘प्लीज तुम्ही कुणी हसू नका हं. मी सकाळपासून क्रिकेट खेळल्यामुळे जाम दमलो होतो. मला काही दिसलं-बिसलं नाही आणि ऐकू पण आलं नाही. बहुधा मी झोपलो असणार. पण आता मला एकदम फ्रेश आणि हलकं वाटतंय.’‘अं.. आमच्या घरात अशी सलग अकरा मिनिटं शांतता कधीच नसते. आजी-आजोबांचा सतत टीव्ही, बाबांचा मोबाइल, स्वयंपाक करताना आईसाठी एफएमवर गाणी, ताईचं गाणी गुणगुणणं. आणि हे जरा वेळ थांबत नाही तोच, मी अभ्यास कसा करावा आणि का करावा याबाबत आई-बाबांच्या सारख्या सूचना सुरू.’ (हे ऐकताच अनेक मुलांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केलं) हा खेळ खेळताना मला मजा आलीच; पण तरी मला एक प्रश्न आहे. हा अकरा मिनिटं शांततेचा खेळ आम्ही घरी खेळू शकतो का? म्हणजे घरातल्या सर्वांनाच यातली मजा कळेल. पण हे माझं म्हणणं आई-बाबा ऐकतील का?.‘डोळे बंद करून झोपाळ्यावर बसलोय असंच वाटलं मला.’‘अं.. आमच्याप्रमाणे घरातील आई, बाबा आणि ताई पण असेच थोडावेळ तरी शांत बसू शकतील का? हाच विचार माझ्या डोक्यात सारखा चालू होता. त्यामुळे मला काही दिसलं नाही आणि ऐकू पण आलं नाही.’‘सर... सर मला दिसलं. मला एक काळी, जांभळी आणि सोनेरी गुहा दिसली. त्या गुहेतून मी नाचत चाललो आहे असं वाटलं. पण मी मला नाचताना पाहिलं नाही हं.’.‘मी जंगलातल्या एका उंच झाडावर बसलोय असं वाटलं मला. मला भीती नाही वाटली; पण मजा म्हणजे तुम्ही टाळी वाजवलीत, तेव्हा मी इतका दचकलो की.. आता मी झाडावरून खाली पडतो की काय असं वाटलं. मजा आली सर.’...नंतर मुलांशी गप्पा मारताना जाणवलं, की आपल्याला आलेला अनुभव आणि आपल्याला मिळालेला आनंद पालकांना ही मिळावा असं मुलांना वाटत होतं. पण आपलं म्हणणं ऐकून घ्यायला पालकांना वेळ तरी आहे का? आपल्या अनुभवाशी एकरूप होण्यात पालकांना रस आहे याची मुलांना खात्री वाटत नव्हती..‘हा शांततेचा खेळ जर आपण पालकांना सांगितला तर पालक आपली खिल्ली उडवतील; म्हणून त्यांना न सांगितलेलंच बरं’ असं अनेक मुलांना वाटलं. खरं म्हणजे मुलाच्या आनंदात आपल्याला ही आनंद आहे हे पालकांनी कृतीतूनच दाखवलं पाहिजे.‘मुलाचा आनंद ओळखणारे पालक अंतर्बाह्य आनंदी असतात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.