नातीगोती : नात्यांमध्ये हवी ओढ अन् विश्वास

मी मुळात खूप माणसं आवडणारी आणि माणसांवर प्रेम करणारी मुलगी आहे. मला असं वाटतं की, कुठलंही नातं जोडून राहण्यासाठी किंवा कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी किंवा जोडून राहण्यासाठी केवळ प्रेम पुरत नाही.
Relations
RelationsSakal
Summary

मी मुळात खूप माणसं आवडणारी आणि माणसांवर प्रेम करणारी मुलगी आहे. मला असं वाटतं की, कुठलंही नातं जोडून राहण्यासाठी किंवा कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी किंवा जोडून राहण्यासाठी केवळ प्रेम पुरत नाही.

मी मुळात खूप माणसं आवडणारी आणि माणसांवर प्रेम करणारी मुलगी आहे. मला असं वाटतं की, कुठलंही नातं जोडून राहण्यासाठी किंवा कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी किंवा जोडून राहण्यासाठी केवळ प्रेम पुरत नाही. म्हणजे प्रेम हवंच; पण त्या प्रेमासोबतच त्या नात्यांमध्ये ओढ हवी, विश्वास हवा, एकमेकांप्रती आदर हवा, समजूतदारपणा हवा. मोकळेपणाही हवा. ती नाती लादलेली वाटू नयेत. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आल्या, की आपोआप नातं टिकलं जातं.

माझं माझ्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम आहे आणि मी सगळ्यांच्याच खूप जवळ आहे. माझे सगळे भाऊ, भाचे, काका, आत्या, मामा, मामेभाऊ असे सगळे माझे लाडके आणि जवळ आहेत. लग्नाआधी मी वडील आणि भाऊ यांच्या विशेष जवळ होते. भावाच्या तर अगदी विशेष जवळ. आताही आहे. लग्नानंतर माझा नवरा रजत ढाळे हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे.

तो माझा खूप चांगला मित्र आहे आता. आम्ही खूप गोष्टींबद्दल बोलू शकतो आणि मी नाती टिकवण्यासाठी किंवा कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत असं मी सांगितलं, त्या आमच्या नात्यामध्ये असल्यामुळे नातं निभावणं खूप सोपं आहे. त्यासाठी फार प्रयत्न करावे लागत नाहीत. रजत खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे‌. माझ्या कामाबद्दल त्याला विशेष आदर आहे. आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले असलो, तरी माझ्या कामाचं वेगळं असलेलं स्वरूप त्याने खूप छान स्वीकारलंय आणि त्याला माझ्या कामाचं खूप कौतुक आहे. मी काम करावं यासाठी तो खूप छान सपोर्ट करतो. खाणं, फिरणं आमच्या बऱ्याचशा आवडी सारख्याच आहेत. मला आनंदी ठेवण्यासाठी तो विशेष प्रयत्न करतो आणि ती गोष्ट मला फार आवडते.

मला मुलगी झाली, त्या आधीचा माझ्या गरोदरपणातला काळ माझ्या नवऱ्यामुळे खूप छान गेला. त्यानं माझे लाड केले. डॉक्टरांकडे असू देत किंवा कुठेही जायचं असू देत; तो सतत माझ्या सोबत होता. त्यानं माझी मन:स्थितीही छान समजून घेतली. मी जे म्हणते की स्वीकार हवा नात्यांमधला, तर माझ्या त्या मानसिक परिस्थितीचा त्याने त्या वेळेला खूप छान स्वीकार केला आणि मला आनंदी ठेवलं त्या काळात. त्या नऊ महिन्यांत त्यानं जे-जे काही माझ्यासाठी केलं, ते फार माझ्याजवळ आहे. 

आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला एकत्र यायला कारण लागत नाही. आम्ही ठरवून सतत भेटत असतो. मज्जा करत असतो. गप्पा मारायला भेटतो. जेवायला भेटतो. काही झालं तरी आपल्यासाठी सगळे लोक आहेत, हे आपलं कुटुंब आहे, ही भावना खूप सुखावणारी असते आणि ती सतत माझ्यासोबत आहे. माझी मुलगी लहान असताना मुंबईत ‘फू बाई फू’ करत होते. शूटिंगसाठी मी, माझा नवरा, माझं बाळ आणि माझी आई असे दर आठवड्याला प्रवास करत होतो. त्यावेळी माझी आई फार छान, भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. ती असल्यामुळे मी हे शूटिंग करू शकले. मी नसताना माझी आई आणि नवरा खूप छान माझ्या मुलीला सांभाळतात. त्यामुळे मी खूप बिनधास्त कामं करू शकते.

कुटुंबसंस्था ही मोठी गोष्ट आहे. फक्त तुमची रक्ताची नाती म्हणजेच कुटुंब असं मला कधीच वाटत नाही. महाराष्ट्रभर अनेक कुटुंबं आहेत, जी माझी आहेत. जी माझ्यावर प्रेम करतात. जी माझ्या सतत संपर्कात असतात. ती माझ्या कुटुंबाइतकीच मला महत्त्वाची आहेत. माझ्या वडिलांनी मला आधी माणसं शिकवली. बाकीच्या गोष्टी फार उशिरा कळल्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला. नातेसंबंधांच्याबाबतीत.

नाती दृढ होण्यासाठी टिप्स

१) नातेसंबंध चांगले राहण्यासाठी मला कायम असं वाटतं की, जी गोष्ट खूप सहज असते, ती खूप सुंदर असते. म्हणजे मला असे वेगळे विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत.

२) मला कुटुंबातील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटायला आवडतं. त्यामुळे मला फार वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत नातेसंबंध छान राहण्यासाठी.

३) एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करा; पण ते करत असताना आत्मसन्मानही जपा.

४) नात्यांमध्ये मोकळेपणा ठेवा. संपर्कात राहा.

५) एखादं नातं वर्कआउट होत नसेल किंवा छान नसेल, तर कुठलीही कटुता न ठेवता बाहेर पडा आणि पुढे जा.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com