झूम : ‘ई-अमृत’वरून इलेक्ट्रिक वाहनांची सफर... | Electric vehicle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electric vehicle
झूम : ‘ई-अमृत’वरून इलेक्ट्रिक वाहनांची सफर...

झूम : ‘ई-अमृत’वरून इलेक्ट्रिक वाहनांची सफर...

इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्याचे धोरण केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे. इलेक्ट्रिक वाहनांबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी ब्रिटिश सरकारसोबत झालेल्या करारानुसार निती आयोगाने ‘ई-अमृत’ हे संकेतस्थळ सुरू केले आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची इत्थंभूत माहिती असलेले हे एकमेव संकेतस्थळ असून, इलेक्ट्रिक वाहनांचे पर्याय, खर्चाचे गणित, वाहनांची खरेदी, इलेक्ट्रिक वाहन व्यवसायातील गुंतवणुकीची संधी अशी माहिती देण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे

वाहतूक ही सध्याच्या आधुनिक युगातील मूलभूत गरज बनली आहे. परंतु यातही पारंपरिक इंधनावर धावणारी वाहने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. प्रदूषणात भर घालणाऱ्या पेट्रोल-डिझेलवरील वाहनांची जागा आगामी काळात इलेक्ट्रिक वाहने घेणार आहेत. शून्य उत्सर्जनामुळे ही वाहने पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहेत. तसेच कमी प्रवास आणि दुरुस्ती खर्च, करामध्ये मिळणारी सवलत आणि अनुदान, चालवण्यास सुलभ, घरी चार्जिंग करणे सोयीचे, कमी खर्चात चार्जिंग, ध्वनी प्रदूषणविरहित आदींची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या वाहनांसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी तत्काळ उपलब्ध झाल्यास वाहनप्रेमींची या वाहनांना पसंती मिळू शकते.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीचे पर्याय

भारतात सध्या दुचाकीवगळता तीन चाकी, चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोजक्याच कंपन्यांचे पर्याय आहेत. अवजड वाहनांचा यामध्ये समावेश नसला, तरी सरकारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत इलेक्ट्रिक बसचा वापर होऊ लागला आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करायचे असल्यास कोणत्या कंपनीचे खरेदी करावे, या प्रश्नाचे उत्तर येथे मिळते. वाहनांचा प्रकार निवडल्यास उपलब्ध कंपन्या, त्यांची वाहने, किंमत, चार्जिंग कालावधी, ड्रायव्हिंग रेंज आदी माहिती तुलनात्मक स्वरूपात कळते.

इलेक्ट्रिक वाहनांतून व्यवसाय संधी

इलेक्ट्रिक वाहन उत्पादने आणि त्याच्याशी संबंधित सेवांची मागणी पूर्ण करणाऱ्या व्यवसायाबद्दल आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेतल्यास त्यातून व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. यामध्ये व्यावसायिक नमुना, उत्पादकता, सेवा पुरवठादार, आदींचा पर्याय असून, इलेक्ट्रिक मोबिलिटीशी संबंधित असलेल्या भारतीय स्टार्टअप्सनी जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये ओला, अँथर, सन मोबिलिटी यासारख्या अनेक आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. यातून व्यवसायाची संधी कशी मिळू शकते, याची माहिती संकेतस्थळात देण्यात आली आहे.

चार्जिंग स्टेशन्सची उपलब्धता

भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारणीचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. सध्या त्याचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. भारतात सद्यःस्थितीत सार्वजनिक असे केवळ ९३४ सक्रिय चार्जिंग स्टेशन्सचे जाळे आहे. त्यात काही खासगी कंपन्याही (उदा. टाटा - महाराष्ट्र, चार्जर - कर्नाटक) विविध राज्यांमध्ये चार्जिंगची सेवा पुरवत आहेत. या संकेतस्थळावर केवळ आपल्या ठिकाणाचे पोस्टल पिन क्रमांक आणि किती अंतरात ते स्टेशन पाहिजे हे निवडल्यास गुगल मॅपद्वारे याची माहिती मिळते.

चार्जिंग आणि प्रवास खर्च

घरगुती, सार्वजनिक ठिकाणी वाहन चार्ज करून २५० किलोमीटरचा टप्पा गाठला तरी प्रतिकिलोमीटर प्रवास खर्च हा १ ते २ रुपयांच्या घरात जातो. हाच प्रवास खर्च पेट्रोल-डिझेलवरील वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर ८-१० रुपये (वाहनानुसार) इतका असतो. ई-अमृत संकेतस्थळावर या सर्वांच्या मोजणीचा पर्याय दिला असून त्याद्वारे प्रवास खर्चाची खातरजमा करता येऊ शकते.

loading image
go to top