झूम : इम्प्रेसिव्ह ‘कॅरेन्स’

भारतीय बाजारात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सात आसनी कारचे मोजके पर्याय आहेत. किआची ‘कॅरेन्स’ या सर्वांमध्ये सर्वच बाबतीत आकर्षक वाटते.
carens car
carens carsakal
Updated on
Summary

भारतीय बाजारात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सात आसनी कारचे मोजके पर्याय आहेत. किआची ‘कॅरेन्स’ या सर्वांमध्ये सर्वच बाबतीत आकर्षक वाटते.

भारतीय बाजारात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सात आसनी कारचे मोजके पर्याय आहेत. किआची ‘कॅरेन्स’ या सर्वांमध्ये सर्वच बाबतीत आकर्षक वाटते. एका कौटुंबिक कारमध्ये अपेक्षित आणि आवश्यक असणारे फीचर्स, प्रशस्त आणि प्रवासातील आरामदायीपणा, ताकदवान इंजिन आदी बाबी कॅरेन्समध्ये येतात. कॅरेन्सची यापूर्वी १.४ टी-जीडीआय पेट्रोल इंजिन असलेली ऑटोमेटिक ट्रान्समिशन (७ डीसीटी) कारची राइड केली होती. आता सारख्याच इंजिन प्रकारात मॅन्युअल ट्रान्समिशन कारची राइड केली. राइडच्या बाबतीत दोन्हींची तुलना करायची झाल्यास मॅन्युअलमध्ये इंजिनमधून ताकद, हवा तसा वेग पकडण्याची मुभा मिळते, तशी मुभा ऑटोमेटिक ट्रान्समिशनमध्ये मिळत नाही. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास कॅरेन्स नक्कीच ‘इम्प्रेसिव्ह’ आहे.

एखाद्या सहा-सात आसनी एसयूव्ही श्रेणीतील कारमध्ये तिचे मायलेज, आरामदायीपणा, आधुनिक फीचर्स, चालकासाठी पूर्ण प्रवासी बसल्यानंतरही कारच्या कामगिरीत न होणारा बदल, ब्रेकिंग, सुरक्षात्मक बाबी प्रकर्षाने पाहिल्या जातात. कॅरेन्समध्ये या सर्व बाबींचा अंतर्भाव केल्याने बाजारात उपलब्ध इतर कारच्या तुलनेत ही कार उजवी ठरते. शिवाय एवढे भरगच्च फीचर्सचे पॅकेज असलेली कार किमतीच्या तुलनेतही परवडणारी आहे. किमतीकडे नजर टाकण्यापूर्वी कॅरेन्सचे व्हेरिएंट पाहू. प्रीमियम, प्रेस्टिज आणि लक्झरी या तीनसह प्रेस्टिज प्लस आणि लक्झरी प्लस या अतिरिक्त दोन व्हेरिएंटमध्ये कॅरेन्स येते.

कॅरेन्समध्ये १.५ पेट्रोल, १.४ टी-जीडीआय पेट्रोल आणि १.५ लिटर सीआरडी आय व्हीजिटी डिझेल असे तीन इंजिन पर्याय आहेत. शिवाय प्रीमियम ते लक्झरी व्हेरिएंटमध्ये ७ आसन, तर लक्झरी प्लस व्हेरिएंटमध्ये ६ आणि ७ आसनांचा पर्याय येतो. एकूण १९ प्रकारांत ही कार मिळते. कॅरेन्सच्या ‘प्रीमिअम’ पेट्रोल या बेस मॉडेलची किंमत (एक्स शोरूम) ९.६० लाख रुपये इतकी आहे. तर ‘लक्झरी प्लस’ डिझेल ऑटोमेटिक हे तिचे टॉप व्हेरिएंट असून या व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत १७.७० लाख इतकी आहे.

किआने भारतात एन्ट्री केल्यापासून कारमध्ये लुक, फीचर्स आणि प्रीमिअमनेस देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅरेन्सही त्याला अपवाद नाही. अगदी कॅरेन्सचे रंगांचे पर्याय, तिचा हटके लुक, त्याला साजेसी रचना, तेवढेच लक्झरियस इंटेरिअर आदी बाबी आकर्षित करतात. कारमध्ये एन्ट्री केल्यानंतर अंतर्गत रंगसंगतीमुळे प्रसन्न वाटते. त्यात आरामदायी आसने, डॅशबोर्डची रचना, स्टिअरिंगची डिझाईन, आकर्षक डोअर हँडल्स, लक्ष वेधून घेणारी १०.२५ इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम, इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, वनटच सनरूफ आदी बाबींकडे किआने प्रकर्षाने लक्ष दिले आहे.

कशी आहे कॅरेन्स?

  • कॅरेन्सच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर आपल्या शरीराची जी ठेवण राहते ती लांबच्या प्रवासासाठी अगदी आरामदायी वाटते. म्हणजे अगदी ५ ते ६ फूट उंचीची व्यक्तीही कोणत्याही अडचणीविना ही कार आरामात चालवू शकतो, उंचीनुसार नीट करता येणारे सीट्स, स्टेअरिंगमुळे हे शक्य होते.

  • कॅरेन्सची स्टिअरिंग हाताळणीसाठी अगदीच सुलभ आहे. अती वेगात जड होते, परंतु वेगातही रस्त्यात मध्येच एखादा खड्डा वा अडथळा आला तरी नियंत्रण गमावत नाही. कॅरेन्सच्या आकारमानानुसार ब्रेकिंग ठीक वाटली. पूर्ण प्रवासी क्षमतेत वेगात असल्यानंतर तत्काळ ब्रेक घेत नाही हे कार चालवताना जाणवते.

  • कॅरेन्समध्ये पुढे चालकासह सहप्रवाशाला व्हेंटिलेटेड सीट्स दिले आहेत. वातानुकूलन यंत्रणाही दमदार आहे. तिन्ही रांगांसाठी एसी व्हेंट्स दिल्याने आतील वातावरण तत्काळ थंड होते. त्या जोडीला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर प्युरिफायर फीचर दिले आहेच, ज्यामुळे कारमधील तापमान स्थिर राहण्यास मदत होते.

  • कॅरेन्सला १६ इंची टायर दिले आहेत. परंतु कारच्या आकारमानानुसार ते छोटे वाटतात. कॅरेन्समध्ये सीट्सच्या तीन रांगा असल्या तरी पुरेसा २१६ लिटरचा बुटस्पेस दिला आहे. त्यामुळे इतर कारच्या तुलनेत पुरेसे सामान नेता येते. ७०-९० किमी ताशी वेगात चालवल्यास १८ पर्यंत मायलेज मिळतो, ही कॅरेन्सची जमेची बाजू.

  • कॅरेन्समध्ये २७८० मिलिमिटरचा व्हील बेस दिला आहे. याचा फायदा तिसऱ्या रांगेतील प्रवाशाला होतो. या रांगेत मध्यम उंचीच्या प्रवाशाला पाय मोकळे करण्यास आटोपशीर जागा उपलब्ध होते. शिवाय कॉईल स्प्रिंग सस्पेंशन्समुळे कारमधून धक्केविरहित प्रवास होतो. कारमध्ये सुरक्षेचीही पुरेपूर काळजी घेतली आहे.

  • टर्बो पेट्रोल इंजिन आणि जोडीला मॅन्युअल गिअर बॉक्स असल्यास सामान्यत: कार हवी तशी, हव्या त्या वेगात पळवता येते. परंतु यातही एखादी सात आसनी कार असेल तर असा दमदार अनुभव येत नाही. कॅरेन्सने मात्र यात नाराज केले नाही. ७ डीसीटी गिअर बॉक्सच्या तुलनेत मॅन्युअल गिअरबॉक्सच्या राइडचा आनंद घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com