
फ्रान्सच्या ‘सिट्रॉन’ कंपनीने भारतीय बाजारात ‘सी-५ एअरक्रॉस’ या लक्झुरियस एसयूव्हीनंतर ‘सी-३’ ही हॅचबॅक श्रेणीतील कार दाखल केली.
फ्रान्सच्या ‘सिट्रॉन’ कंपनीने भारतीय बाजारात ‘सी-५ एअरक्रॉस’ या लक्झुरियस एसयूव्हीनंतर ‘सी-३’ ही हॅचबॅक श्रेणीतील कार दाखल केली. स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत गुणवत्ता आणि कामगिरीच्या बाबतीत ही कार नक्कीच उजवी असल्याचे ती चालवल्यानंतर समजते. पारंपरिक भारतीय कारपेक्षा वेगळा लुक, आतमधील ऐसपैस जागा, त्यामुळे होणारा आरामदायी प्रवास, तत्काळ थंड होणारी वातानुकूलन यंत्रणा, ताकदवान इंजिन आदी सी-३च्या जमेच्या बाजू आहेत.
भारतात सिट्रॉन कारची निर्मिती तमिळनाडूमधील तिरुवल्लूर येथे होते. ‘डिझाईन लँग्वेज’ ही सिट्रॉनची खासियत आहे. त्यामुळेच ''सी-५ एअरक्रॉस''प्रमाणेच सी-३ची बांधणी, डिझाईन भारतातील पारंपरिक कार्सच्या तुलनेत वेगळी ठेवण्याचा प्रयत्न सिट्रॉनने केला आहे. यामध्ये क्रोम इफेक्टसह सिट्रॉनचे टिपिकल सिग्नेचर ग्रील दिले असून, डिआरएल, स्पिल्ट एलईडी हेटलँप, ड्युअल टोन पेंट स्कीमचा पर्याय दिला आहे. सी-३ ''लाइव्ह'' आणि ''फील'' या दोन व्हेरिएंटमध्ये १० विविध रंग, ५६ कस्टमायझेशन पर्यायात उपलब्ध आहे. सिट्रॉन सी-३ दिसायला ''सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही'' वाटत असली तरी कंपनीने तिला ‘हॅचबॅक’ कार म्हणूनच बाजारात आणली आहे. हॅचबॅक श्रेणीत भारतीय बाजारामध्ये आधीच अनेक पर्याय असताना सिट्रॉन ''सी-३''मध्ये असे काय वेगळे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ''सी-३''च्या १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन व्हेरिएंटची राईड केली.
फ्रेंच कारचा फिल
सिट्रॉनच्या ''सी-५''प्रमाणेच आणि विशेष म्हणजे पेट्रोल टर्बोचार्ज्ड इंजिनमुळे कार एक्सलेरेट केल्यावर पहिल्या क्षणात फ्रेंच कार चालवत असल्याचा फील येतो. ही कार ० ते १००चा वेग १० सेकंदात घेते. यावरून इंजिन पॉवरफूल असल्याचा अंदाज येतो. आरपीएम अर्थात एक्सलेरेशन अधिक दिल्यानंतर इंजिन आवाज करणे साहजिक आहे, ते सी-३मध्येही जाणवते. एक हजार ते दोन हजार ''आरपीएम''ला ही समस्या येत नाही. कारचे क्लच आणि पहिल्या गिअरची शिफ्टिंग सुरुवातीला हार्ड वाटत असली, तरी ठराविक वेळ चालवल्यानंतर त्याची सवय होऊन जाते.
रिव्हर्स गिअर शिफ्टिंगही सोयीस्कर आहे. स्टेअरिंगची ठेवण आकर्षक असून, तिची हाताळणीही सुलभ आहे. कमी वेगात सुलभता जाणवत असली तरी ८०+ वेगात ती सुरक्षित राईडच्या दृष्टीने स्टिअरिंग आपोआप जड होते. छोट्या आकारमानामुळे ही कार शहरी रस्त्यांवर आरामात राईड करता येते. अधिक वेगात असल्यावर सॉफ्ट सस्पेन्शनमुळे ''बॉडी रोल'' जाणवते; परंतु याचा कारच्या कामगिरीवर काही परिणाम जाणवत नाही. अवघड वळणावर कार स्थिर राहते. सिट्रॉन सी-३साठी साधारण १९.४ ते १९.८ किलोमीटर/लिटर दरम्यान मायलेज कंपनीने दिले असले, तरी प्रत्यक्षात १५ ते १६च्या आसपास मायलेज मिळते.
एसयूव्हीचा फिल
सिट्रॉन सी-३ची आसनव्यवस्था आरामदायी आहे. विशेषत: पाठीमागील सीटवर बसल्यानंतर पायांची ठेवण, ज्याला ''अंडर थाय सपोर्ट'' म्हणतो तो राखण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी ६ फूट उंच व्यक्तीलाही पाठीमागे बसण्यास पुरेपूर जागा उपलब्ध होते. पुढील ड्रायव्हर सिटला उंची कमी-जास्त; शिवाय स्टिअरिंगला ''टिल्ट'', अर्थात खाली-वर करण्याचा पर्याय दिला आहे. चांगली दृष्यमानता आणि कार चालवताना बोनेटच्या दोन्ही कडा दिसत असल्याने एसयूव्ही चालवत असल्याचा फील येतो.
दोन इंजिन पर्याय
सिट्रॉन ''सी-३''मध्ये १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल (८१ बीएच पॉवर, ११५ एनएम टॉर्क) आणि १.२ लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल (१०९ बीएच पॉवर, १९० एनएम टॉर्क) असे दोन इंजिनचे पर्याय दिले आहेत. यामध्ये गिअर बॉक्सचेही दोन पर्याय येतात. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये ५ स्पीड; तर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्ये ६-स्पीड मॅन्युअल असे दोन पर्याय आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत ५.७० लाख रुपयांपासून सुरू होऊन ८.०५ लाखांपर्यंत जाते.
सी-३मधील वैशिष्ट्ये
दोन एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेंसर, रिअर डोअर चाईल्ड लॉक, इंजिन इमोबिलायझर, स्पीड-सेंसिटिव्ह डोअर लॉक, एलईडी डीआरएल, सीट्रॉन कनेक्ट १०-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, वन-टच डाऊन विंडो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.