झूम : ड्रायव्हिंग, कला अन् कौशल्य...!

ड्रायव्हिंग करताना योग्य ‘जजमेंट’ अर्थात अंदाजबांधणी करता येणे आवश्यक आहे. यात गडबड अपेक्षित नसते, अन्यथा अपघात होतात. म्हणूनच ड्रायव्हिंग ही एक कला आहे.
Driving
DrivingSakal

ड्रायव्हिंग करताना योग्य ‘जजमेंट’ अर्थात अंदाजबांधणी करता येणे आवश्यक आहे. यात गडबड अपेक्षित नसते, अन्यथा अपघात होतात. म्हणूनच ड्रायव्हिंग ही एक कला आहे. काही जण त्यात निपुण असतात; तर काही जण त्यातील कौशल्ये आत्मसात करतात. ॲक्सिलरेटर, क्लच, गिअर, स्टिअरिंग कसे हाताळावे यापासून ते एसीचा वापर का करावा, इथपर्यंत काही मूलभूत गोष्टी ड्रायव्हिंग करताना ध्यानात ठेवाव्या लागतात. याबाबत सविस्तर...

स्टिअरिंग : स्टिअरिंग आपण कसे पकडतो, यावर वाहनाची सुलभ हाताळणी अवलंबून असते. स्टिअरिंग एका हाताने पकडून, त्यावर तळहात ठेवून ड्राईव्ह करू नये. आपल्या उंचीनुसार आसनव्यवस्था सेट केल्यानंतर आपले दोन्ही हात कोपऱ्यात १६०-१७० अंशात वाकतील या पद्धतीने ठेवून स्टिअरिंगला समांतर ठिकाणी पकडावे.

म्हणजे तीव्र वळण, अतितातडीच्या वेळेत त्याची हाताळणी करणे सोपे जाते. स्टिअरिंग चुकीच्या पद्धतीने पकडल्यास वाहनावरील नियंत्रण गमवण्याची शक्यता जास्त असते. शिवाय हातालाही झटके बसू शकतात.

गिअर : हल्ली वाहनांमध्ये ऑटोमेटिक; तसेच मॅन्युअल गिअरचे पर्याय असतात. स्वयंचलित असले, तरी ड्राईव्ह, पार्क, न्यूट्रल, रिव्हर्सवर गिअर लिव्हर हाताळावा लागतो; तर मॅन्युअलमध्ये बहुतांश वाहनांची गिअर रचना सारखीच असते. काही वाहनांचा रिव्हर्स गिअर ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला वर असतो; तर काही वाहनांचा उजव्या बाजूला खाली असतो.

ही रचना ध्यानात ठेवून गिअर बदलणे आवश्यक असते. काही शिकाऊ चालक खाली बघून गिअर बदलतात, अशा वेळी नियंत्रण गमावण्याची किंवा अपघाताची शक्यता असते, शिवाय गोंधळही उडतो.

आसनव्यवस्था : बहुतांश कारमध्ये चालकाच्या उंचीनुसार कमी-जास्त, मागे-पुढे होणारी (हाईट ॲडजस्टेबल) आसनव्यवस्था असते. त्यामुळे समोरील-मागील दृश्यमानता, स्टिअरिंगपासूनचे अंतर राखूनच आसन व्यवस्थित सेट करावे. पाठीमागील टेकूही अगदीच ९० अंशात न ठेवता १००-११० च्या मध्ये ठेवल्यास पाठदुखी होत नाही, तसेच वाहन चालवताना थकवा जाणवत नाही.

उंची कमी असलेले काही वाहनचालक किंवा महिला मागे टेकू न घेता स्टिअरिंगला खेटूनच ड्रायव्हिंग करतात; परंतु अपघाताच्या वेळी अशी स्थिती धोकादायक ठरते.

ओआरव्हीएम्स/आरसे : वाहन चालवण्यापूर्वी दोन्ही बाजूचे आऊटसायडर रिअरसाईड व्ह्यू मिरर अर्थात ‘ओआरव्हीएम्स’ व्यवस्थित सेट करणे आवश्यक आहे. या आरशांमध्ये ‘ब्लाइंड स्पॉट’ राहतो, ज्यामुळे पाठीमागे असलेले वाहन दिसत नाही. अशा वेळी आरसे कारचा मागील दरवाजा किंवा शेवटचा भाग दिसेल असे सेट करावेत.

गाडीच्या आतील आरसाही मध्यभागी सेट करावा. काही जण मागच्या काचेचा अर्धा भाग दिसेल इतकाच तो ॲडजस्ट करतात; परंतु यामुळे पाठीमागील वाहनांचा अंदाज येत नाही. वळण घेताना, थांबताना, ओव्हरटेक करताना इतर वाहनांना आपले वाहन धडकण्याची शक्यता असते.

वातानुकूलन यंत्रणा : वातानुकूलन यंत्रणा (एसी) सुरू ठेवून वाहन चालवल्यास ते मायलेज कमी देते, असा अनेकांचा समज असतो. कमी वेगात असताना किंवा घाट रस्त्यांत हा प्रकार काही अंशी चालून जातो; परंतु महामार्गावर एसी बंद करून काचा उघड्या ठेवून प्रवास केल्याने कारचे एअरोडायनामिक्स (Aerodynamics) बिघडतात.

म्हणजेच एखादे वाहन हवा कापत मार्गक्रमण करत असते. त्यात काचा उघड्या ठेवल्याने हवा आत शिरून अधिक ताकदीचा वापर होतो, त्यामुळे वाहनाचे मायलेज कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com