esakal | झूम : हाताळण्यास सुलभ ‘ज्युपिटर १२५’ | Jupiter 125
sakal

बोलून बातमी शोधा

Jupiter 125
झूम : हाताळण्यास सुलभ ‘ज्युपिटर १२५’

झूम : हाताळण्यास सुलभ ‘ज्युपिटर १२५’

sakal_logo
By
प्रणीत पवार

भारतात सध्या १२५ सीसी स्कूटर्सची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. यात होंडा ॲक्टिव्हा, सुझुकी ॲसेस यासारखे १२५ सीसी इंजिन क्षमतेतील पर्याय असताना ‘टीव्हीएस मोटर’ने आपल्या सर्वाधिक लोकप्रिय ‘ज्युपिटर’ या ११० सीसी स्कूटरला अद्ययावत करून १२५ सीसी इंजिनमध्ये गेल्या आठवड्यात दाखल केली.

सप्टेंबर २०१३मध्ये बाजारात आलेली टीव्हीएस ज्युपिटर अनेक वर्षांपासून भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरमध्ये अग्रेसर ठरत आहे. ‘ॲसेस १२५’, ॲक्टिव्हा १२५’बरोबर ज्युपिटरची नेहमीच स्पर्धा राहिली. ज्युपिटरला टीव्हीएसने नव्या रूपात १२५ सीसी इंजिनमध्ये दाखल केली. स्कूटरमध्ये कुशनखालील जागेत दोन हेल्मेट राहू शकतील इतकी मोठी जागा दिली आहे. ज्युपिटरची ५ लिटर क्षमतेची इंधन टाकी कुशनखालील जागेत न देता पाय ठेवतो त्या जागेत सुरक्षित धातूच्या आवरणाने बसवण्यात आली आहे. स्कूटर प्रकारात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. शिवाय पेट्रोल भरताना स्कूटरवरून उतरण्याची गरजही त्यामुळे पडणार नाही. हँडलच्या खालील जागेतूनच ज्युपिटरमध्ये पेट्रोल भरण्याची सोय देण्यात आली आहे. ‘ज्युपिटर १२५’ समोरून ॲक्टिव्हाशी थोडीफार मिळती जुळती दिसत असली तरी त्यात मोठ्या क्रोम ईफेक्टसह टर्न इंडिकेटरमध्येच ‘डीआरएल’ (डेटाईम रनिंग लाइट) देऊन वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

आरामदायी प्रवास, वाढीव ताकद

‘ज्युपिटर १२५’मध्ये सर्वात लांब आणि ७६५ मिलिमीटर उंचीवर कुशन दिल्याने कमी उंचीच्या किंवा उंच व्यक्तीलाही बसण्यात आणि स्कूटर चालवण्यात अडचण येत नाही. १०९ किलोग्रॅम वजनाची ही स्कूटर हाताळण्यास अगदी सोपी आहे. अतिवेगातही वळणाचे रस्ते आरामात पार होतात. १२५सीसी इंजिन दिल्याने ज्युपिटर सुरू केल्यावर पूर्ण एक्सलिरेशन दिल्यानंतर तिच्या ताकदीचा अंदाज येतो. ज्युपिटरची ब्रेकिंगही उत्तम आहे. दोन्ही चाके १२ इंचाची देण्यात आली आहेत. पुढे टेलिस्कोपिक आणि मागील ३ प्रकारे ॲडजस्ट होणाऱ्या सस्पेंशनमुळे खडबडीत रस्त्यांवरही धक्केविरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो.

दमदार इंजिन अन् बरंच काही...

सिंगल सिलिंडर, ४-स्ट्रोक, एअर कूल्ड १२५ सीसी क्षमतेची ज्युपिटर ६५०० आरपीएमला ६ किलोवॅट ताकद आणि ४५०० आरपीएमला १०.५ एनएम टॉर्क निर्माण करते.

एकूण तीन प्रकारात (ड्रम, ड्रम अँलॉय आणि डिस्क ब्रेक) असलेल्या ‘ज्युपिटर १२५ची सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत ७३ हजार ४०० ते ८१ हजार ३०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

डॉन ऑरेंज, इंडीब्ल्यू, प्रिस्टाईन व्हाइट, टिटॅनियम ग्रे आदी रंगांचे पर्याय, तसेच साइड स्टँड इंडिकेटर, ऑल इन वन लॉक, फ्रंट ग्लोव्ह बॉक्स, मोबाईल चार्जर आदी फीचर्स दिले नवीन ज्युपिटरमध्ये दिले आहेत.

टीव्हीएसच्या ‘इंटेली-गो’ तंत्रज्ञानामुळे ही ज्युपिटर अधिक आरामदायी पद्धतीने चालवता येते. तसेच हँडलवर उजव्या बाजूला दिलेल्या बटणाद्वारे सिग्नल किंवा ट्रॅफिकमध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने इंजिन चालू-बंद करते.

इको थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन (ईटीएफ-आय) तंत्रज्ञानामुळे ज्युपिटर इतर स्कूटरच्या तुलनेत अधिक मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तरी ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगात ही ज्युपिटर ४५-५५ किलोमीटर प्रतिलिटर इतका मायलेज देऊ शकते.

loading image
go to top