esakal | गप्पा ‘पोष्टी’ : तुम्ही नियमितपणे ‘वारी’ करता का?
sakal

बोलून बातमी शोधा

Wari

गप्पा ‘पोष्टी’ : तुम्ही नियमितपणे ‘वारी’ करता का?

sakal_logo
By
प्रसाद शिरगावकर

अगदी खरं सांगायचं, तर मी आयुष्यातली पहिली ‘वारी’ चार-सहा वर्षांपूर्वी पाहिली आणि ती पाहण्याचं कारण चांगले किंवा काहीतरी वेगळे ‘फोटो काढणं’ हे होतं. गेली शेकडो वर्षे वारी सुरू आहे. ती पुण्यातून जाते. मी पुण्यात जन्मलो आणि मी गेली चाळीसेक वर्षं पुण्यात राहातो. पण इतकी वर्षं, ‘एक-दोन दिवसाचं ट्रॅफिक जॅम’ ह्या पलीकडं मी वारीचा विचार नव्हता केला कधी. फोटोग्राफीचा छंद लागल्यावर ‘स्ट्रीट फोटोग्राफी’ प्रकारातले फोटो काढायला वारीत जावंसं वाटलं आणि गेलो. आणि तेव्हापासून दरवर्षी जातोच आहे!

माझी फोटो-वारी ही शिवाजीनगरमधल्या शेतकी महाविद्यालयापासून सुरू होते. तिथून जुना बाँबे-पुना रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, संचेती हॉस्पिटल, पुणे वेधशाळा, फर्ग्युसन रोड वगैरे परिसर भटकून पुन्हा शेतकी महाविद्यालयापाशी येऊन संपते. ह्या चार-पाच किलोमीटरच्या परिघात मी वारी अनुभवतो, तेव्हा मला अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राचं तीन-चार तासांत दर्शन होतं! पार लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूरपासून संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले वारकरी भेटतात. शेतकरी, कामकरी, धंदेवाले, व्यावसायिक, शहरी, गावाकडचे. सगळे सगळे. त्यांचं स्वागत करणारे स्थानिक राजकारणी, सुरक्षा आणि शिस्तीसाठी आटोकाट प्रयत्न करणारे पोलिस, त्यांना पाणी-स्नॅक्स-औषधं देणारे स्वयंसेवक हे सारे दरवर्षी दिसतात. ह्यामध्ये भक्तिरसात ओलेचिंब न्हाऊन निघणारे खरेखुरे वारकरीही दिसतात आणि वारकऱ्यांचं सोंग घेतलेले काही लोकही दिसतात. वारकऱ्यांची खरीखुरी सेवा करणारे सेवाकरीही दिसतात आणि सेवेच्या नावानं नफेखोरी करणारे व्यापारीही दिसतात. आपल्या आख्ख्या समाजाचं आणि त्याच्या सद्यस्थितीचं दर्शन केवळ दोन-चार तासांत होतं वारीला आलं की!

माझ्यासारख्या शहरात जन्मलेल्या, शहरातच वाढलेल्या आणि भक्तीमार्गापासून नेहमीच शेकडो कोस दूर राहिलेल्या माणसाला वारी हे कधीच न सुटलेलं विलक्षण कोडं आहे! दर वर्षी लाखो माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी पंढरीला जातात. जाताना प्रवासभर टाळ मृदुंग वाजवत, भजनं म्हणत आणि नाचत नाचतही जातात. वाटेत अनेक ठिकाणी कोणत्याही सुखसोयी सोडा, अगदी बेसिक गरजा पूर्ण करणारी साधनंही नसतात, तरीही जातात. ‘हे काय गौडबंगाल आहे?’ हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे! पण मलाच काय, बहुदा कोणालाच ‘हे का’ याचं कोडं आजवर सुटलेलं नाहीये! पण ही गोष्ट चारेकशे वर्षं लाखो लोक करत आले आहेत, अजूनही करत आहेत. मी ह्यानं अफाट अचंबित होतो!

दरवर्षीच्या वारीच्या दोन-चार तासांच्या दर्शनातच नवं काहीतरी गवसत राहातं. वारीच्या निमित्तानं मला माझ्या आतला आणि बाहेरचा विठ्ठल दरवर्षी सापडतो, सापडत राहातो. तुम्ही तुमच्या आतला विठ्ठल शोधता का? तुम्ही नियमितपणे ‘वारी'' करता का?

गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पायी जाणारी वारी झाली नाही. मात्र, आपल्या आतला विठ्ठल शोधण्याची वारी सदैव सुरू ठेवू शकतोच आपण. अन् ठेवायला हवी.

loading image