
माझ्या आयुष्यात माझे पती आणि मुलगा सर्वांत जवळचे व्यक्ती आहेत. आपले दोन्ही डोळे महत्त्वाचे असतात, तसे हे दोघे माझे आयुष्य आहेत. त्यांच्याशिवाय मी कल्पनाच करू शकत नाही.
नातीगोती : नात्यांमध्ये नको अहंकार
- प्रीती सहाय
माझ्या अनुभवाप्रमाणे एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांना चांगल्या-वाईट क्षणी साथ देणे हे खूप महत्त्वाचे आहे, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्वास हा कुटुंबव्यवस्थेचा पाया आहे.
माझ्या आयुष्यात माझे पती आणि मुलगा सर्वांत जवळचे व्यक्ती आहेत. आपले दोन्ही डोळे महत्त्वाचे असतात, तसे हे दोघे माझे आयुष्य आहेत. त्यांच्याशिवाय मी कल्पनाच करू शकत नाही. माझे पती आणि मुलगा दोघेही मला खूप समजून घेतात. जसे वडील, तसाच मुलगा. दोघेही समजूतदार असून दोघांना माहिती आहे, की कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे.
मी सात महिन्यांपासून जयपूरमध्ये चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘ॲण्ड टीव्ही’वरील ‘दुसरी माँ’ या मालिकेत ‘कामिनी’ची भूमिका साकारत आहे. अशा वेळी माझे पती आणि मुलगा दोघेही माझ्या पाठीशी ठामपणे उभे असतात, त्यांच्या अफाट समजूतदारपणामुळे मला हे शक्य होते आहे, असे मला वाटते. एकमेकांचे करिअर सांभाळण्यासाठी एकमेकांना समजून घेत आयुष्य आनंदाने जगणे, हे माझ्या कुटुंबाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे असे मी अभिमानाने म्हणू शकते.
मला स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असल्यावर मी स्वतः वेगवेगळे पदार्थ करते आणि ते दोघेही आवडीने खातात, ही गोष्ट मला खूप आनंद देते. आम्ही हा प्रयत्न करतो की, जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवू. वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकत्र येण्याचा कसोशीने प्रयत्न करतो.
आपण कुटुंबापासून दूर असतो, तेव्हा कुटुंबाचे महत्त्व लक्षात येते आणि ही गोष्ट मला सतत जाणवते. दूर असल्याने नात्यांची जाणीव होते. चित्रीकरणामुळे सुट्टी मिळत नाही; पण जेव्हा केव्हा मला दोन-तीन दिवसांची सुटी मिळते, तेव्हा असे वाटते, की ‘जाओ प्रीती जाओ, जी लो अपनी जिंदगी’सारखे माझे फीलिंग असते.
नातेसंबंध चांगले होण्यासाठी नात्यांमध्ये छोटे-छोटे क्षण सांभाळणे फार महत्वाचे असते. कधीकधी असे होते, की समोरच्याची एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही; पण आपल्याला ती मान्य करावी लागते, नंतर त्या व्यक्तीला आपोआप समजते, की आपली इच्छा नसतानाही आपण त्याची गोष्ट मानली. समोरच्याचे ऐकून घेणे, त्यामागचे कारण समजून घेणे व संयम दाखवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे नातेसंबंध मजबूत होतात, असे माझे ठाम मत आहे.
नाती दृढ होण्यासाठी...
नात्यांमध्ये अहंकार असू नये, ‘मी’पणा असू नये.
नात्यांमध्ये प्रेमाचे रेशीम धागे असावेत.
एकमेकांबद्दल ममत्व असावे, काळजी असावी.
संयम राखणे ही फार महत्त्वाची गोष्ट नाते जपण्यास उपयुक्त ठरते.
एकमेकांच्या भावना समजण्यासाठी अतोनात प्रगल्भता असावी.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)