priyadarshini indalkar and shreya karve
priyadarshini indalkar and shreya karvesakal

मैत्रीचं दशक

आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती जिची तुमच्याबरोबर केव्हातरी, कुठेतरी योगायोगानं किंवा शाळा, कॉलेज, नोकरी या निमित्तानं भेट होते. हळूहळू ओळख वाढत जाते.
Published on

- प्रियदर्शिनी इंदलकर, श्रेया कर्वे

आपल्या आयुष्यात अशी एक व्यक्ती जिची तुमच्याबरोबर केव्हातरी, कुठेतरी योगायोगानं किंवा शाळा, कॉलेज, नोकरी या निमित्तानं भेट होते. हळूहळू ओळख वाढत जाते. या ओळखीचं कधी मैत्रीत रूपांतर होतं ते समजतदेखील नाही.

असंच काहीसं झालंय अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर आणि श्रेया कर्वे यांच्यासोबत. यांची पहिली भेट ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाली. दोघीही क्लासमेट्स. नोट्स शेअर करण्यापासून झालेली मैत्री आज दहा वर्षं पूर्ण होत आली तरी तेवढीच घट्ट आहे.

याविषयी प्रियदर्शिनी म्हणाली, ‘माझी आणि श्रेयाची पहिली भेट कॉलेजच्या पार्किंगमध्ये झाली. त्यानंतर श्रेयानं मला त्यांच्या फ्रेंडस ग्रुपमध्ये समाविष्ट केलं. एक गंमत अशी आहे, की श्रेयाला मी कधीच तिच्या नावानं हाक नाही मारत. मी नेहमी तिला तिच्या आडनावानं हाक मारते. तिच्या घरी जरी मी गेले, तरी तिच्या आई- बाबांसमोरसुद्धा मी तिला अशीच हाक मारते.

माझ्या मोबाईलमध्येसुद्धा तिचं नाव ‘कर्वे’ म्हणूनच सेव्ह आहे. आम्ही एकाच वर्गात असलो, तरी आम्ही कधीही एकत्र लेक्चर नाही अटेंड केली. कारण मी सारखी नाटकं, एकांकिका यामध्ये जास्त भाग घ्यायची, त्यामुळे माझा जास्त फोकस आर्ट सर्कलमध्येच असायचा. मग मला सगळ्या नोट्स आणि असाइनमेंटविषयी सगळी मदत कर्वेच करायची.

आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये ती खूप हुशार होती; पण यामुळे तिची माझ्याकडे सतत तक्रार असायची, की मी कधीच तिच्यासोबत लेक्चर्सला, असाइनमेंटसाठी नसायचे. यावरून ती मग चिडायची माझ्यावर. मात्र, मी हे नक्की सांगीन, की तिच्यामुळेच मला दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या.’

श्रेया म्हणाली, ‘प्रियदर्शिनीशी माझी मैत्री खूपच घट्ट झाली, कारण आमच्या वाईब्स मॅच झाल्या. मला प्रियदर्शिनी व्यक्ती म्हणून खूप आवडते. ती प्रेमळ आहे, तसंच तिला माणसं जोडायलादेखील आवडतात. तिच्या स्वभावातील मला आवडणारी गोष्ट म्हणजे, तिला तिच्या घरच्यांप्रती असलेला आदर, जो आजकाल तरुणांमध्ये एवढा नाही दिसत.

तिनं प्रचंड मेहनत करून मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे; पण तरीसुद्धा तिच्या मनात माझ्याविषयी तेवढंच प्रेम आहे. मिळालेल्या यशानं हुरळून जाण्याऐवजी ती डाऊन टू अर्थ राहते. तिच्यातला हा गुणच मला प्रचंड आवडतो. म्हणूनच ती सर्वांना हवीहवीशी वाटते.

‘आम्ही कॉलेज पीरियड खूप जास्त एंजॉय केला आहे. प्रियदर्शिनीनं फार कमीवेळा माझ्यासोबत वर्गात बसून लेक्चर अटेंड केली आहेत; पण या व्यतिरिक्त आम्ही खूप मज्जा केली आहे. आमच्या कॉलेजच्या जवळच प्रियदर्शिनीचं घर होतं. त्यामुळे आम्हाला लंच ब्रेक असायचा तेव्हा मी, प्रियदर्शिनी आणि आमची अजून एक कॉमन मैत्रीण ईशा कुलकर्णी, अशा आम्ही तिघीही गाडीवरून तिच्या घरी जायचो आणि काहीतरी बनवून खायचो. तिला माझ्या हातची कॉफी प्रचंड आवडते.

मला आठवतंय, प्रियदर्शिनीला स्वयंपाकातील काहीच यायचं नाही. मी तेव्हा तिला बेसिक कॉफी आणि ब्रेड आम्लेट बनवायला शिकवलं. गंमत म्हणजे, त्यानंतर मी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी दोन दिवस मुंबईत होते. तेव्हा मी एक दिवस प्रियासोबतच घालवला. त्यावेळी तिनं मला स्वतः बटर चिकन आणि पराठे, कोशिंबीर वगैरे बनवून खाऊ घातलं. हे पाहून मला खरंच खूप आनंद झाला. म्हणजे ज्या मुलीला साधी कॉफीही बनवता येत नव्हती, ती आज मला बटर चिकन बनवून खायला घालते.’’

शेवटी प्रियदर्शनी म्हणाली, ‘आमच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे आणि यामुळेच आम्ही गेली कित्येक वर्षं एकमेकांच्या घट्ट मैत्रिणी आहोत. आमच्या नात्याची खास गोष्ट ही आहे, की भलेही आम्ही खूप काळ एकमेकांशी बोललो नाही, तरी जेव्हा आमच्यात बोलणं होईल तेव्हा ते जिथून थांबलं होतं, तिथून सुरू होतं. त्यामुळे आम्हाला रोज रोज कॉलवर किंवा मेसेजवर बोललंच पाहिजे असं काही नाही.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com