rasika chavan and shweta vedpathak
rasika chavan and shweta vedpathaksakal

जिवाभावाच्या सख्या

आपल्या जीवन प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. त्यापैकी काही आपल्यासोबत राहतात, तर काही फक्त आठवणीत.

- रसिका चव्हाण / श्वेता वेदपाठक

आपल्या जीवन प्रवासात आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. त्यापैकी काही आपल्यासोबत राहतात, तर काही फक्त आठवणीत. गंमत तेव्हा येते, जेव्हा तीच फक्त आठवणीत राहणारी माणसं आयुष्याच्या एक टप्प्यावर अचानक आपल्यासमोर येतात, आणि त्यांच्यासोबत त्या क्षणी होणारी मैत्री अतूट होऊन जाते. असं काहीसं झालंय रसिका चव्हाण आणि श्वेता वेदपाठक यांच्यासोबत.

याबद्दल रसिका म्हणाली, ‘श्वेतासोबत माझी खऱ्या अर्थानं मैत्री झाली ती एमबीएला असताना. त्यावेळी आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. याआधीही आम्ही एकाच शाळेत होतो; पण त्यावेळी आमच्यात तितकी मैत्री झाली नव्हती.’ श्वेता म्हणाली, ‘आम्ही शाळेपासूनच एकमेकींना ओळखत होतो; पण आमच्यात त्यावेळी घट्ट मैत्री म्हणता येईल असं काही नव्हतं. त्यावेळी रसिका फारच वेगळी होती.

म्हणजे अभ्यासू; केसांत चपचपीत तेल घालून दोन वेण्या घालणारी, म्हणजे पुस्तकांमध्ये वर्णन करतात तशी टिपिकल विद्यार्थिनी. त्या काळात आमची फक्त हाय- बाय करण्याइतपतच ओळख होती. त्यांनंतर एमबीएसाठी आम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, तेव्हा आम्हा दोघींनाही माहीत नव्हतं, की आम्ही एकाच कॉलेजमध्ये, एकाच कोर्ससाठी ॲडमिशन घेत आहोत.

मला अजूनही तो दिवस आठवतोय, मी वर्गात एकटीच बसलेले. क्लासमध्ये सगळीच मुलं अनोळखी होती; पण मला मनातून सतत वाटत होतं, की मला कोणीतरी एखादं ओळखीचं भेटेल. हे थोडं फिल्मी वाटेल; पण हे खरंच झालंय माझ्यासोबत. मी असा विचार करतच होते, तेवढ्यातच माझ्या समोरून रसिका चालत आली. तेव्हापासून आम्ही खऱ्या अर्थानं मैत्रिणी झालो आणि आमच्यातलं हे मैत्रीचं नातं अधिकच खुलत गेलं.’’

स्वभावाविषयी बोलताना रसिका सांगत होती, ‘आमच्यात अनेक गोष्टी कॉमन आहेत. त्यामुळे मला कधीच ती वेगळी आहे असं नाही वाटलं. तिच्यातील मला आवडणारी गोष्ट म्हणजे ती फार फनी आहे. तिच्या प्रत्येक वाक्याला एक जोक असतो. मुख्य म्हणजे निखळ आनंद स्वतःसोबत इतरांनाही द्यायचं कौशल्य तिच्यात आहे. ही गोष्ट मला प्रचंड आवडते. ती अतिशय हजारजबाबी आहे.

समोरच्याचा एकही शब्द खाली न पडू देता त्याला कसं उचलून धरायचं हे तिला फार चांगल जमतं. तिच्या या दोन्ही गोष्टी मला फार आवडतात. तिच्यातील न आवडणारी गोष्ट अशी कोणतीच नाहीये; पण सांगायचं झालंच तर मी सांगेन की, तिचं आता लग्न झालंय.

आपण सुरुवातीपासूनच ऐकत आलोय, की लग्न झल्यावर मैत्रिणी-मैत्रिणींना जास्त वेळ सोबत घालवता येत नाही आणि ही गोष्ट आता मला पटायला लागली आहे. त्यामुळे तिच्याबद्दल आवडत नसलेली गोष्ट एवढीच, की आमच्यात आता ते आधीसारखं भेटणं नाही होत.’

ती पुढे म्हणाली, ‘आम्ही पूर्वी सारख्या एकमेकींच्या घरी पडीक असायचो. कधी आमच्या घरच्यांना आमचे कॉल्स नाही लागले, तर तिची आई मला आणि माझी आई तिला कॉल करून आमची चौकशी करायची. इतपत आमची मैत्री घट्ट आहे. खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे आमच्यात.’

श्वेता म्हणाली, ‘आमच्यातील समान धागा म्हणजे ‘आमचे विचार’. आमच्या वाईब्स एकमेकांसोबत खूपच मॅच होतात. आम्ही एखाद्या गोष्टीबद्दल सेम विचार करतो आणि ते प्रत्येक वेळी आम्हाला बोलून दाखवायची गरज नाही पडत. मुख्य म्हणजे तिच्याशी बोलताना मला कधीच विचार करावा लागत नाहीओ, की ही मला जज करेल का?. याबद्दलचा विश्वास आम्हा दोघींमध्येही आहे.

‘तिच्या स्वभावातील मला आवडणारा आणि कधी कधी न आवडणारादेखील गुण म्हणजे तिचा ‘पेशन्स’. ती प्रचंड संयमी आहे आणि याचं मला खूप कौतुक आहे आणि आदरही आहे. अर्थात तिच्या याच गुणामुळे बऱ्याचदा लोक तिचा गैरफायदा घेतात. ज्यामुळे मला वाटतं, की तिनं ते थोडं कमी करून प्रॅक्टिकल वागावं.’

पुढे रसिका म्हणाली, ‘माझी मैत्रीण प्रचंड आळशीपण आहे. तिला कधी म्हटलं, की चल आपण फिरायला जाऊ, तर तिच्या कपाळावर मोठ्या आठ्या येतात. अर्थात ती अनेक छंद जोपासते. तिला चित्रं काढायला आवडतात. ती खूप सुंदर चित्रं काढते. तिला नृत्याचीसुद्धा आवड आहे. ती भरतनाट्यम् नृत्यकलाकार आहे आणि फक्त भारतनाट्यमच नाही, तर अगदी गणपतीच्या मिरवणुकीतल्या डान्सपासून ते शास्त्रीय नृत्यापर्यंत सगळी नृत्यं करते.’

(शब्दांकन - मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com