परवा अचानक प्रगती एक्स्प्रेसनं कर्जतहून मुंबईला जाण्याचा योग आला. हल्ली प्रगती पनवेलमार्गे जाते. त्यामुळे डोंगरांच्या कुशीतून बाहेर पडत पुन्हा हिरव्यागार गवताच्या शालीवरून चालत राहते. आजूबाजूला सुंदर, हिरवेगार डोंगर असतातच. मी मोरबेचा बोगदा पार केला आणि समोर दिसलं ते उंच, देखण्या ढगांच्या शालीत लपलेलं ईर्शाळ... मन चार वर्षं मागे गेलं- जेव्हा मी माझ्या सवंगड्यांसह थेट ईर्शाळचं ‘नेढं’ गाठलं होतं!!