esakal | लिंगाचा आकार खूप लहान असल्याचा भवितव्यात काही त्रास होईल का?
sakal

बोलून बातमी शोधा

लिंगाचा आकार खूप लहान असल्याचा भवितव्यात काही त्रास होईल का?

शरीर संबंध हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असूनही त्याकडे केवळ लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. यातून चुकीची माहिती मिळणं आणि या विषयाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता असते.

लिंगाचा आकार खूप लहान असल्याचा भवितव्यात काही त्रास होईल का?

sakal_logo
By
डॉ. अविनाश भोंडवे

स्त्री-पुरुष शारीरिक संबंधानंतर माणसाचा जन्म होतो. शरीर संबंध हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असूनही त्याकडे केवळ लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. यातून चुकीची माहिती मिळणं आणि या विषयाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता असते. यालाही अनेक कारणे आहेत. तरुण वयात या विषयाबद्दल वेगवेगळे प्रश्न, शंका मनात निर्माण होतात. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही असते पण योग्य त्या मार्गदर्शनाअभावी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती 'सकाळ डिजिटल'च्या माध्यमातून देणार आहेत.

१. पुरुष आणि स्त्रिया यांच्या लिंगावरील केसात फरक असतो काय? असल्यास काय असतो.

उत्तर - केसांच्या अंतर्गत रचनेत फरक नसतो. परंतु त्यांच्या व्याप्तीमध्ये फरक असतो. पुरुषांचे केस गुप्तेंद्रियांच्या आजूबाजूस तर असतातच, पण वृषणावरदेखील असतात.स्त्रियांमध्ये मात्र फक्त योनीच्या आजूबाजूसच ते असतात.

पुरुषांमध्ये त्याची व्याप्ती गुप्तेंद्रियांपासून बेंबीच्या दिशेने निमुळती होत त्रिकोणी होते. तर स्त्रियांच्या शरीरावर ते वरील बाजूस आडवे आणि योनीच्या दिशेने निमुळते, अशा उलट्या त्रिकोणासारखे व्यापलेले असतात.

अपवाद सोडता, बहुसंख्य व्यक्तींमध्ये गुप्तेंद्रियांवरचे केस कुरळे किंवा वक्राकार असतात. पुरुषांचे केस शरीरावर सुरु होऊन बेंबीच्या दिशेने वर जाऊन खाली वळतात; तर स्त्रियांमध्ये ते शरीरावर सुरु होऊन पायांच्या दिशेने खाली जाऊन वर वळतात.

बलात्काराच्या वैद्यकीय तपासणीमध्ये पुरावा म्हणून हे फार महत्वाचे असते. परंतु आजकाल स्त्री पुरुषांमध्ये हे केस काढून टाकण्याची प्रथा आली आहे.

२. सकाळी लघवीच्या वेळी खूप वीर्यपतन होते, हा आजार आहे काय?

उत्तर - वीर्य तयार होणे ही पुरुषांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वीर्याची पिशवी भरली, की ती रिकामी होतेच. लैंगिक समागमामध्ये वीर्यापतनाचेवेळी ती रिकामी होते. त्यामुळे अविवाहित आणि लैंगिकदृष्ट्या कुठलीही क्रिया न झाल्यास, नैसर्गिकरित्या ती मूत्रमार्गात रिकामी होते. त्यामुळे लघवीच्या वेळी मूत्रातून हा घट्ट पांढरा द्राव जाताना दिसतो.

नैसर्गिक क्रिया असल्याने हा कुठलाही आजार नाही व यात घाबरण्यासारखे काहीच नसते. परंतु बरेच युवक हा काही तरी दोष आहे असे समजून, बर्‍याचदा यासासाठी औषधोपचार करतात, डॉक्टर या गोष्टींवर योग्य सल्ला देतातच, पण भोंदू वैद्य अनेक तरुणांना यासाठी औषधोपचाराच्या नावाने लुटत असतात. रेल्वेमार्गांवर, विशेषतः उत्तर भारतात बर्‍याच ठिकाणी, अशा भोंदू वैद्यांच्या जाहिराती दुतर्फा दिसतात. त्यांच्यापासून सावधान राहावे.

हेही वाचा: Dating App ने भारतीयांचे रहस्य केलं उघड, जाणून घ्या

३. लिंगाचा आकार खूप छोटा आहे. भवितव्यात काही त्रास होऊ शकेल काय?

उत्तर - लिंगाचा आकार आणि लैंगिक समागमासाठी लागणारी क्षमता, यात काही संगती नसते. लैंगिक क्षमता ही लैंगिक संप्रेरकांच्या शरीरातील पातळीवर अवलंबून असते. तर लिंगाचा आकार ही शरीराच्या वाढीशी आधारित असलेल्या संप्रेराकांशी निगडीत आहे.

छोट्या आकाराचे शिश्न हे लैंगिक समाधान मिळवून देऊ शकत नाही असं मानणंदेखील चुकीचे आहे. कारण योनिमार्ग हा प्रसरणशील असतो आणि लिंगाच्या लांबीशी जुळवून घेतो. लैंगिक समाधान हे शरीररचनेपेक्षा त्यावेळेच्या भावनिक उद्दीपनावर आणि त्यानंतर मिळणार्‍या दोघांच्या शारीरिक प्रतिसादावर आणि समागमप्रसंगी होणार्‍या शारीरिक हालचालींवर जास्त अवलंबून असते.

छोट्या लिंगाच्या व्यक्तीला मुले होण्यातदेखील काही अडचण नसते. कारण मुले होणे हे शुक्रजंतूंच्या निर्मितीवर आणि त्यांच्या स्त्रीबीजाशी होणार्‍या फलानावर अवलंबून असते.

loading image
go to top