%20-%202024-08-05T141213.803.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पृथा वीर
Shravan Health Tips: श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा. या काळात उपवासाचे महत्त्व आहे. उपवास मनाच्या दृढनिश्चयाची भावना वाढवतो. तसे केवळ सकारात्मकता वाढवतो; म्हणूनच उपवासाला अध्यात्माची जोड आहे. उपवास म्हणजे पूर्ण उपाशी राहून शरीर कमकुवत करणे असा नाही, तर अन्न ग्रहण करण्याचे प्रमाण कमी करून शरीराला काही काळ विश्रांती देणे असा आहे.
श्रावण सोमवार, नागपंचमी, मंगळागौरी अशा श्रावण सणांमध्ये उपवास ठरलेले. विशेषतः महिला या काळात आवर्जून उपवास करतात. घरची सर्व कामे, नोकरी आणि व्रतवैकल्ये सांभाळून उपवास करणे महिलांना जरा जड जाते. अर्थात महिला तरीही व्रत पूर्ण करतात. पण, जरा काळजी घेतली तर उपवासही हसतखेळत होतो आणि शरीर हलके वाटते. श्रावणात सर्वदूर पाऊस असतो. या काळात आपली पचनक्रिया मंदावते.
उपवास केल्याने आपल्या पचनसंस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये हा काळ म्हणजे जरा निवांत काळ. पेरण्या उरकल्या असतात. त्यामुळे शेतात फारसे काम नसायचे. यामुळे शारीरिक क्रिया ‘स्लो डाउन’ व्हायची.
शेतातही भाज्या नसायच्या, अशावेळी घरातील प्रोटीन इन्टेक म्हणजे डाळी आणि सर्व प्रकारचे भोपळे, दोडके या भाज्या या काळात उत्तम आहार असायच्या, असे आहारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘उपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा, शेंगदाणे, भगर, बटाटे यांना पर्याय आहेत. भगर, साबुदाणा उसळ जास्त खाल्ली की ॲसिडिटी होते. त्यामुळे साबुदाणा उसळ आणि भगर अगदी प्रमाणात खावी.
शेंगदाणे भिजवून मिठाच्या पाण्यातून उकडून खाल्ले की पचायला सोपे जातात. या दिवसांत भुईमुगाच्या शेंगा मिळतात. या शेंगा भाजून किंवा मिठाच्या पाण्यात उकडून खाल्या तर त्याचे पचन होते. चहा-कॉफीला पर्याय म्हणून लाल भोपळ्याचे सूप उपवासासाठी करता येते. साबुदाण्यात खूप स्टार्च असतो. शरीराला फायबरची गरज असते. या दिवसांत ताजी केळी, पेरू, पपई, सफरचंद, नाशपती मिळतात.
केळी तर उत्तमच. फक्त सर्दी-खोकला असेल तर पेरू सांभाळून खावे; तसेच बटाट्याला पर्याय म्हणून रताळी उत्तम. रताळ्याचे सूपसुद्धा छान लागते आणि उपवासाला चालते. उपवासात सुकामेवासुद्धा खायला हवा. काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, काळे मनुके उत्तम. फक्त यात काजूचे प्रमाण कमी ठेवावे. काजू वगळता उर्वरित चारही सुकेमेवे थेट न खाता रात्री कोमट पाणी किंवा साध्या पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ले तर ती पचायला सोपी जातात, असेही डॉ. प्रज्ञा तल्हार यांनी सांगितले.
लाल भोपळा पोट पण साफ ठेवतो आणि उपवासालाही चालतो. यासाठी भोपळा उकडून घ्यायचा. त्यात १ उकडलेला बटाटा टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. बटर गरम करून त्यात अद्रक पेस्ट, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची, मीठ आणि उकडलेली पेस्ट टाकून पाणी उकळी आली की सूप तयार.
यासाठी बटाटे आणि शेंगदाणे उकडून घ्यायचे. त्यावर मीठ टाका. हिरवी चटणी, खजूर चटणी, आमचूर, काळी मिरी टाकून भेळ एकजीव करा. नंतर फराळी चिवडा, डाळिंबाचे दाणे टाकावी.
श्रावण महिन्यात उपवास करायलाच हवे. या काळात पचनसंस्थेला विश्रांती देणे उत्तम. रताळी, लाल भोपळा, सुकामेवा, फळांच्या माध्यमातून उपवासाला आधार देतात आणि शरीर हलके ठेवतात. या काळात पाणी शक्यतो उकळून थंड करून प्यावे. पोषणमूल्य सांभाळूनही हसतखेळत उपवास शक्य आहे.
— डॉ. प्रज्ञा तल्हार, आहारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.