

- युवराज माने
‘स्टँड-अप कॉमेडी’ हा प्रकार आपल्याकडे फार पूर्वीपासून अस्तित्वात होता. अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांत घटकाभर करमणूक म्हणून विनोदाचे सादरीकरण व्हायचं. तसेच काही दिग्गज मराठी साहित्यिकही त्यांच्या विनोदी संहितेच्या सादरीकरणाचे प्रयोग करायचे. परंतु त्याला ‘स्टँड-अप कॉमेडी’ म्हणता येईल का, हा संशोधनाचा विषय आहे.
हल्ली मात्र या प्रकाराला सुगीचे दिवस आले आहेत. सोशल मीडियाच्या प्रसारामुळे अनेक विनोदवीर रातोरात प्रसिद्ध झाले. परंतु त्यातले बरेच काळाच्या ओघात विसरले गेले, तर निवडक काहीजण उपजत प्रतिभेमुळे तग धरू शकले.
‘टीव्हीएफ’ या निर्मिती संस्थेने २०१६ साली विपुल गोयल या विनोदवीराच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असलेली ‘ह्युमरसली युवर्स’ ही सिरीज प्रदर्शित केली होती. या सिरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. नुकताच या सिरीजचा तिसरा सीजन ‘झी ५’ वर प्रदर्शित झाला आहे.
पहिल्या दोन सीजनमध्ये विपुलच्या ‘स्टँड-अप कॉमेडी’च्या कारकिर्दीची सुरुवात दाखवल्यानंतर तिसऱ्या सीझनचं कथानक त्याच्या परदेशवारीभोवती रचण्यात आलं आहे. विपुल आणि काव्या (रसिका दुग्गल) आता मुंबईला स्थायिक झाले आहेत आणि प्रचंड महागड्या गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी दोघेही प्रयत्नशील आहेत.
यासाठी विपुलचा मॅनेजर लांबा (साहिल वर्मा) आणि मित्र भुशी (अभिषेक बॅनर्जी) त्याला अमेरिकेत शोज करण्याचा सल्ला देतात. सुरुवातीला साशंक असणारा विपुल पत्नीच्या आणि मित्रांच्या पाठिंब्याने जोमाने तयारी सुरू करतो.
परंतु आपल्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी काय करावं हे मात्र विपुलला अजूनही समजत नसतं. इतर कलाकार ज्या सहजतेने प्रेक्षकांना आपल्या कार्यक्रमात सामील करून घेतात ते पाहून विपुलचं दडपण वाढतच जातं.
आपल्या या भीतीवर मात करण्यासाठी विपुल काय क्लृप्ती योजतो आणि तो त्यात यशस्वी होतो का हे ‘ह्युमरसली युवर्स’च्या तिसऱ्या सीझनच्या पाच भागांत दाखवलं गेलं आहे. कथा आनंदेश्वर द्विवेदी यांची आहे, तर पटकथा आणि संवाद जसमीतसिंग भाटीया आणि पीयूष शर्मा यांनी लिहिले आहेत.
याशिवाय लिखाणात स्वतः विपुल गोयल आणि दिग्दर्शक अनंतसिंग भाटू यांचंही योगदान आहे. बरेचसे प्रसंग प्रत्यक्ष आयुष्यातील असल्याने विपुलचा अभिनय प्रेक्षणीय झाला आहे. जुन्या मित्रांत सामील होतानाचा संकोच, स्वतःच्या क्षमतेवरील साशंकता, स्टेजवर कला सादर करतानाचा सहजपणा, परदेशवारीतील शोजच्या प्रतिसादाचं दडपण विपुलनं लीलया सादर केलं आहे.
काव्याच्या भूमिकेत रसिका दुग्गलनं त्याला समर्थपणे साथ दिली आहे. भुशीच्या अतरंगी भूमिकेत अभिषेक बॅनर्जीने धमाल आणली आहे. याशिवाय अनुभव बस्सी, राकेश बेदी, हर्ष गुजराल यांनी पाहुण्या भूमिकेत हजेरी लावली आहे. जॉनी लिव्हर यांनी अगदी लहानशा भूमिकेतही नेहमीप्रमाणे आपली छाप पाडली आहे.
कथेचा पसारा फारसा नसल्याने पटकथा आणि संवाद यावरच सिरीजची संपूर्ण मदार आहे. या सीझनमध्येही विपुलच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांचे व्हिडिओ वापरण्यात आले आहेत. भाटू यांनी प्रभावी दिग्दर्शनाने विपुलच्या आयुष्यातील घडामोडी हलक्याफुलक्या विनोदी ढंगाने पडद्यावर आणल्या आहेत.
खासकरून लहान भूमिकेतही राकेश बेदी आणि जॉनी लिवर यांच्यासारख्या अनुभवी अभिनेत्यांचा कथानकात कुशलतेने वापर केला गेला आहे. आजकाल कोणीही स्टँड-अप कॉमेडीयन बनू शकतो, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो; परंतु यामागे असणारी मेहनत, प्रयत्न, संघर्ष आणि स्पर्धा याबद्दल लोक अनभिज्ञ असतात.
लोकांना हसवण्याचं काम करणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात अनेक आव्हानं असतात आणि त्यावर मात करत सतत विनोदनिर्मिती करत राहणं यासाठी धैर्य आणि संयमाची गरज असते. ‘ह्युमरसली युवर्स’ एका विनोदवीराच्या आव्हानात्मक आयुष्याचं असंच एक चित्रण प्रेक्षकांसमोर सादर करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.