कथा यशाची; तिच्या जिद्दीची

मे-जूनचा काळ हा निकालांच्या धूमधडाक्याचा काळ होता. दहावी- बारावीचे निकाल आणि त्यानंतर बहुचर्चित असा लोकसभा निवडणुकांचा निकाल.
Pragati Rani
Pragati Ranisakal

- डॉ. समीरा गुजर-जोशी

मे-जूनचा काळ हा निकालांच्या धूमधडाक्याचा काळ होता. दहावी- बारावीचे निकाल आणि त्यानंतर बहुचर्चित असा लोकसभा निवडणुकांचा निकाल. या सगळ्या निकालांमध्ये मुलींनी मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे ही ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट. दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये मात्र मुलींनी घवघवीत यश संपादन केलं आहे.

वस्तुतः गेल्या दशकभरात हे प्रमाण असंच सतत वाढत राहिलं आहे. ही गोष्ट अभिनंदनीय आहे यात शंका नाही; पण मैत्रिणी, याच्या कारणांचा कधी विचार केला आहेस का? इतक्यात यावर आलेले काही लेख मी वाचले आणि आजूबाजूच्या काही मंडळींशी चर्चा केली, तर मला वेगवेगळी कारणं सांगितलेली दिसली. सगळ्यात कॉमन कारण काय होतं, ठाऊक आहे? मुली स्वभावतः शांत आणि समजूतदार असतात ना!

त्याही पुढे जाऊन काहींचं असंही म्हणणं होतं, की मुली आज्ञाधारक असतात. सांगितलेलं काम करण्याकडे त्यांचा कल असतो, त्यामुळे गृहपाठ वगैरे वेळेवर पूर्ण करतात. एका शिक्षकानं तर असंही म्हटलेलं मी वाचलं, की ‘मुलांचा कल अभ्यास, वाचन- लेखन यांच्याकडे कमी असतो. आपली आत्ताची परीक्षा पद्धती मुलांना नीट आजमावू शकत नाही. मुली उत्तम पाठांतर करतात म्हणून अधिक यश मिळवतात.’

मला हे वाचताना कळेचना, की मुलींचं कौतुक चाललं आहे, की त्यांच्या मनात त्यांना अपेक्षित असलेली मुलीची प्रतिमा ते सांगत आहेत? आपली परीक्षा पद्धती अनेकदा पाठांतरावर भर देते हे खरं असलं, तरी गेल्या काही वर्षांत यात अनेक बदल झाले आहेत आणि जणू काही मुली या व्यवस्थेच्या उणिवेचा फायदा घेतात, असं काही आहे का? त्यातून पाठांतर उत्तम आहे म्हणजे रट्टा मारण्यात एक्स्पर्ट. त्या स्वतंत्र विचार करू शकत नाहीत, हे सूचित करण्याचा हा प्रयत्न नाही का?

मैत्रिणी, मला एक गोष्ट आधी सांगावीशी वाटते, की मुळात मुलं विरुद्ध मुली असा हा मुद्दाच नाही. तशी स्पर्धाही नाही. अभ्यास करताना असंख्य अडचणी सगळ्यांनाच आहेत. आर्थिक अडचणी तर खूप आव्हानात्मक आहेत. आपल्याकडे अनेकदा अभ्यास करायला सोयीस्कर जागाही नसते घरांत. घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात.

या अडचणी काही मुलगा किंवा मुलगी म्हणून बदलत नाहीत; पण तुलना केली जाते तेव्हा काय मजेशीर विचार मांडतात लोक! एक तर फारच गंमतीदार कारण वाचलं मी. मला लिहितानाही हसू येतं आहे. त्या महाभागांचं म्हणणं असं होतं, की मुलांवर करिअर करण्याचं प्रेशर असते, त्यामानानं मुलींवर करिअर कर याचा दबाव कमी असतो. त्यामुळे त्या टेंशन न घेता अभ्यास करतात, म्हणून अधिक यशस्वी होतात. मला यावर काय म्हणावं हेच कळत नाही.

मला वाटतं, की गेल्या काही वर्षांत महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध केलं आहे. आज शाळकरी मुलींना त्यांच्या कुटुंबाला, आजूबाजूला, बातम्यांमधून, अगदी अनेक चित्रपटांतून अशा महिला दिसत आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या मानसिकतेवर नक्कीच होतो. मुलींच्याच नव्हे तर पालकांच्या, समाजाच्या मानसिकतेवर होतो आहे. मुलीला काय शिकवायचं, हा विचार बऱ्याच अंशी मागे पडला आहे.

आज केवळ दहावी, बारावीच्या नाही, तर यूपीएससी परीक्षेमध्येही मुलींच्या यशाचा आलेख उंचावताना दिसतो आहे. इथं तर केवळ शांत, समजूतदार स्वभाव आणि पाठांतर पुरेसं नाही! किंबहुना एकंदर उच्चशिक्षणात महिलांचा आकडा लक्षणीयरीत्या वाढला आहे, कारण महिलांच्या क्षमतांवरचा कुटुंबाचा विश्वास वाढला आहे. सगळ्यात सकारात्मक बदल म्हणजे महिलांच्या यशामध्ये त्यांच्या जोडीदारापासून सासर- माहेरच्या मंडळींचा वाढता सहभाग.

यूपीएससी परीक्षेमध्ये लहान मुलांच्या आयांनी मिळवलेलं यश बघा. महिला आई असताना आता आयएएस अधिकारी झाल्या आहेत, या प्रकारची कितीतरी उदाहरणं आहेत. आई असणं, त्यात नोकरी सांभाळून अभ्यास करून यश मिळवणं हे सोपं नक्कीच नाही.

अशीच एक आहे हरियानाची प्रगती राणी. तिचं मूल केवळ तीन वर्षांचं होतं, तेव्हा तिनं ही परीक्षा दिली. तिच्या नवऱ्याला त्याच काळात उच्चशिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे तोही घराबाहेर होता; पण आई आणि सासूबाई तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या. ती सांगते, की ‘मी रात्री साडेनऊ वाजता माझ्या मुलाला झोपवायचे.

त्याच्याच जवळ बसून तीन- चार तास सलग अभ्यास करायचे. दिवसभरात इतका एकाग्रपणे अभ्यास करणं शक्यच नसायचं.’ मातृत्व आणि स्त्रीचं कर्तृत्व यांची अशी सांगड घालता येणं शक्य आहे; पण त्यासाठी कुटुंबानं साथ देणं गरजेचं आहे.

मैत्रिणी, पाहा ना, आपण सुरुवात केली दहावी- बारावीच्या परीक्षांपासून आणि पोचलो यूपीएससी परीक्षांपर्यंत. मला असं वाटतं, की या प्रकारची उदाहरणं मुलींसमोर आली पाहिजेत. आज या निकालाच्या निमित्तानं अनेक यशस्वी मुलींचे फोटो वृत्तपत्रात छापून आले, सोशल मीडियावर झळकले. त्यांच्या डोळ्यांतली चमक पुढेही अशीच राहायला हवी. कौतुक व्हायला हवं ते त्यांच्या बुद्धिमत्तेचं, जिद्दीचं. ती मुलगी आहे म्हणून .... हे तिच्या यशाचं कारण असावं, सबब नसावी. तुला काय वाटतं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com