नुकतंच आम्ही ‘नील अँड मोमो’चं युट्यूब चॅनेल सुरू केलं. स्वप्नील त्यामध्ये पॉडकास्ट होस्ट करतो आहे. ‘रूट कॅाज’ हे पॉडकास्टचं नाव. विषय - अर्थातच निसर्गामध्ये काम करणारी, त्याचं जतन, संवर्धन करणारी वेडी माणसं. त्यानिमित्ताने अनेक विलक्षण माणसांची भेट झाली.
मला असं वाटतं, की आयुष्यामध्ये वेळोवेळी तुमच्या नशिबी येणारी संधी जितकं तुमचं आयुष्य ठरवते, तितकीच वेळोवेळी तुम्हाला भेटत राहणारी माणसं ही तुमच्या विचारांची बैठक पक्की करतात.. तुमची तत्त्वं आणि तुमचं ध्येय गाठण्याचे मार्ग ठरवतात. कारण ध्येयं चांगलीच असतात; पण शॉर्टकट का लॉंग कट हाही मुद्दा असतोच ना!
कॉप्ससारख्या ठिकाणी भारताचे प्रतिनिधित्व करणारे आणि इकॉलॉजी आणि इकॉनॉमी यांचा समन्वय कसा साधता येईल हे शिकवणारे गुरुदास नूलकर. चाळीस वर्षांपूर्वी मुंबई सोडून पनवेलजवळ पूर्णपणे पडीक जमिनीवर जंगल तयार करणारे - राजेंद्र भट! ‘ऑयकॉस’ या संस्थेमार्फत पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं, जंगलं जपणाऱ्या किंवा त्या त्या जागेतल्या वनस्पतींना, झाडांना पुनरुज्जीवित करणाऱ्या केतकी- मानसी, किंवा केपीआयटी या पब्लिक लिस्टेड कंपनीचे मालक रवी पंडित.
या सगळ्या अत्यंत हुशार लोकांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती, त्यांचा साधेपणा. जवळपास सगळेच मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आणि आता स्वतःच्या क्षेत्रात साम्राज्य उभं केलेले. कित्येकदा असं होतं, की व्यक्ती जेव्हा मोठी होते तेव्हा त्यांची घरं मोठी होतात, दारामध्ये ब्रँडेड गाड्यांची रेलचेल असते. (यामध्ये चूक काहीच नाही, ज्यांना ते सहज शक्य आहे त्यांनी जरूर करावं; पण मग खूपदा सामान्य लोकांसाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षा या फक्त त्या भौतिक गोष्टींपाशीच येऊन थांबतात. त्यांना फक्त ‘गाडी’ विकत घ्यायची असते. काही ‘बनायचं’ नसतं.
आणि तिथं प्रॉब्लेमला सुरुवात होते. परवडत नसताना फक्त ‘दिसण्यापुरतं’ सुख विकत घ्यायला लागतो आणि मग सगळीच गणितं चुकायला सुरुवात होते. रवी पंडित यांना भेटण्याच्या आधी थोडं दडपण होत. ‘केपीआयटी’सारख्या पब्लिक लिस्टेड कंपनीचे सर्वेसर्वा. मी आणि स्वप्नील थोडं दबकतच त्यांच्या घरी पोहोचलो. अर्थात स्वप्नील आणि त्यांच्यामध्ये एक दुवा होता. स्वप्नील पुण्याच्या ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा पासआऊट आणि रवी पंडित हे त्याचे बॅचमेट!
घरी गेल्यानंतर आमचं स्वागत करायला दारामध्ये ते स्वतः उभे. आत गेल्या गेल्या दारामध्ये जेवढ्या त्यांना लागतील तेवढ्याच गाड्या दिसल्या. संख्या दोन - त्यातली एक छोटी इलेक्ट्रिक गाडी! हायड्रोजन फ्युएलबद्दल त्यांच्याशी गप्पा होत होत्या! (हायड्रोजन फ्युएल म्हणजे पेट्रोल आणि बाकी तेलांना - नैसर्गिकरित्या पर्यायी मार्ग. याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर पॉडकास्ट नक्की बघा.)
एवढ्या मोठ्या घरामध्ये हाताखाली नोकर एकच. आणि एक जण स्वयंपाकाला. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना फक्त आम्हीच नाही तर आमच्या सोबत असलेला प्रत्येक जण कम्फर्टेबल झाला.
हे एवढं सांगण्यामागचं कारण म्हणजे, या इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला मला ब्रँडेड गाड्यांची हौस होती! आपल्या दारापुढे एखादी तरी चांदणी लावलेली असावी असं वाटायचं. लग्नानंतर मी गाडी घ्यायला निघाले होते. स्वप्नील कायम त्याच्या विरोधात होता. ‘‘मोमो, गाडी विकत घेण्यापेक्षा जमीन घेऊया, ती आपल्याला आयुष्यभर पुरेल असं स्टेटस देऊन जाईल आणि ते पैशात मोजता येणार नाही असं असेल,’’ असं त्याचं म्हणणं होतं! आणि अर्थात आम्ही जमीन घेतली.. आणि मग परत महागडी गाडी नाही घ्यावीशी वाटली. कित्येकदा मित्र-मैत्रिणींच्या गाड्या बघून मनात वाटूनही जातं की खरंच नाही घ्यायची? आणि मग जेव्हा रवी पंडित यांच्यासारखी माणसं आयुष्यात येतात, तेव्हा पटतं की खरंच नाही घ्यायची! समाजामध्ये व्यक्ती किती यशस्वी आहे हे मोजण्याचे फार ढोबळ नियम आहेत - कुठे राहतो? कुठल्या गाडीतून येतो? कुठल्या ब्रँडचे कपडे जोडे वापरतो!
...पण असे लोक भेटले, की यशस्वी की लोक असेही असतात, किंवा यालाही यशच म्हणतात हे कळतं! आठवड्यातून एक दिवस ठरवून केवळ पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणारे, आणि इतर वेळी सायकलला प्राधान्य देणारे गुरुदास नूलकर.
यशाच्या शिखरावर असून सस्टेनेबल आयुष्य जगणारे रवी पंडित. पैसे किती कमावले यापेक्षा झाडं किती वाचवली याकडे लक्ष देणाऱ्या केतकी- मानसी. स्वतःसाठी नाही तर आपल्या पिकांसाठी शास्त्रीय संगीत आणि भरतनाट्यमचा कार्यक्रम ठेवणारे राजेंद्र भट. नद्या जिवंत रहाव्यात म्हणून जीवाचं रान करणाऱ्या शैलजा देशपांडे.
या सगळ्यांना भेटून एक नक्की जाणवतं - माणूस यशस्वी आहे, हे दाखवण्याचा मार्ग फक्त ब्रॅण्डेड रस्त्यावरून नाही जात, त्याला पर्यायी नैसर्गिक आणि सस्टेनेबल मार्ग आहे - कदाचित हायड्रोजन फ्युएलसारखा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.