थॉट ऑफ द वीक : आपण हो का म्हणतो?

Thought
Thought

    हो, मी तुम्हाला कॉल करेन.
    हो, आपण बरोबर आहात.
    हो, मी तुझ्यासाठी हे करीन!
    हो, मी हे केले पाहिजे कारण व्यक्ती ‘नाही’ म्हणण्यापेक्षा महत्त्वाची आहे.
    हो, मी तुम्हाला दुखावू इच्छित नाही म्हणून मी सहमत आहे!
    हो, मी हे केले कारण मला भांडणाची भीती वाटते.
वरील वाक्ये तुमच्या आयुष्यातील दैनंदिन भाग आहेत ना? मात्र, आपण आधी ‘हो’ म्हणतो व नंतर, ‘मला ‘नाही’ म्हणायचे होते,’ हा विचार करत बसतो. हे सर्व लहानपणापासूनच सुरू होते. आपल्या शाळेतील, महाविद्यालयीन ग्रुप्स, एखादा विशिष्ट मित्र अथवा मैत्रीण यांची आपल्याला स्वीकारावे व आपल्याला त्यांनी आपल्या विश्‍वात सामावून घ्यावे म्हणून आपण ‘हो’ म्हणत जातो. आपण जसजसे मोठे होऊ लागतो, तसे ग्रुप्स बदलतात पण स्वीकृतीची आवश्यकता सुरूच राहते. नंतर एखादी विशेष व्यक्ती, कार्य सहकारी, वरिष्ठ, समवयस्क, कुटुंब, जीवनसाथी यांनी स्वीकारावे असे वाटत राहते. ‘बाह्य स्वीकृती’ ही भावनिक गरजच आपल्याला हो म्हणायला लावत असते. ही भावनिक गरज दोन गोष्टींमुळे प्रामुख्याने निर्माण होते.
१. प्रेमाची गरज
२. एकटे पडण्याची भीती

१. प्रेमाची गरज
एक मुलगी कायम जिथे माया मिळेल, त्या नातेवाईक किंवा मैत्रिणींकडे वेळ घालवायची. मग कितीही त्रास होऊदे, कोणीही कसेही वागवूदे, थोडी माया मिळते मग थोडा त्रास सहन करू असा विचार करून ‘जाऊदे’ म्हणायची व मनात ‘हो’ म्हणायची. ‘जाऊदे’ या शब्दाचा परिणाम आपल्याला नवीन नाही.

प्रेमाची गरज ही भावनिक अनुपलब्ध पालक, दीर्घकाळ घालविलेले एकटेपण, भूतकाळातील कठीण प्रसंग या गोष्टींमुळे निर्माण होते. हेच न मिळालेले प्रेम व भावनिक अनुपलब्धता, बाह्य स्वीकृतीची अंतर्भूत आवश्यकता निर्माण करते. रोजच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात या प्रेमाची आवश्यकता मनात राहून जाते व आपले मन नकळत प्रेम आणि स्वीकृती मिळवण्याचा प्रयत्न करत राहते. अर्थातच नाही म्हणायचे असताना ‘हो’ म्हणून.

२. एकटे पडण्याची भीती
एका विद्यार्थ्याला प्रश्‍न पडला, मला घरी शांत पुस्तक वाचायला आवडते; पण मित्र म्हणतात बाहेर जाऊ. अशा वेळी घरी बसलो तर मी एकटा पडेन? मला चिडवले जाईल का? त्यापेक्षा ‘हो’ म्हणूयात. त्याला आपण ‘फियर ऑफ लेफ्ट आऊट’ म्हणतो. या भीतीमुळे आपण ‘हो’ म्हणत राहतो. याचा परिणाम आपल्या निर्णयक्षमतेवर होतो. बऱ्याच वेळा आपली मित्रमैत्रिणींची निवड, सहकाऱ्याची, लाइफ पार्टनरची निवड ही काही वेळा भीतीने केली जाते.

मग आता करायचे काय?
स्वतःवर काम करा. आपण स्वतःला अंतर्गतरीत्या स्वीकारतो तेव्हा बाह्य लोकांकडून मान्यता असण्याची आवश्यकता नसते.

स्वतःला प्राधान्य द्या. एकदा आपण आपल्या भावनिक गरजांना महत्त्व दिले, की त्या गरजा पूर्ण करण्याची ऊर्जा, ताकद व क्षमता आपल्यात आहे हे उमजेल. स्वतःच्या विचारांवर आणि कृतींबद्दल आत्मविश्‍वास बाळगा.

क्लिॲरिटी घ्या. मला नक्की कशाची भीती आहे? हे जाणून घ्या. भीतीमुळे घेतलेले निर्णय ती भीती घालवत नाही. स्वतःला आहे तसे स्वीकारा. आपण वेगळे आहोत त्यात काही चुकीचे नाही हे समजून घ्या.

आपण आपल्यामध्ये हे बदल घडवून आणले की, आपण दुसऱ्यांना व त्यांचा भावनांनाही प्राधान्य देऊन योग्य मार्गदर्शन करू शकतो. लक्षात ठेवा, एकदा आपल्या भावनांना प्रथम स्थान देण्याची कला शिकल्यानंतर, ‘मी हो का म्हणाले,’पेक्षा ‘मी नाही म्हणाले,’ याचा अनुभव घ्या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com