थॉट ऑफ द वीक : चूक कि बरोबर

सुप्रिया पुजारी, लाइफ कोच
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

‘आई, मी हे कपडे घालू का?’
‘आई, मला हे कपडे चांगले दिसतील का नाही?’
‘बाबा, मी कुठे ॲडमिशन घेऊ?’
‘मित्रा, मी जॉब कुठे करू?’

लहानपणापासून आपल्याला दुसऱ्यांच्या मतावर अवलंबून राहावे लागते. आपण काय करावे हे सांगितले जाते. किंबहुना, ठरविले जाते. लहानपणापासून काय चूक आणि काय बरोबर आपल्याला सांगितले जाते कारण ती काळाची गरज असते. या चूक, बरोबरची यादीच बनत जाते. आपण मोठे होतो तसे आपण आजचे अनुभव कालच्या चूक-बरोबरच्या यादीमध्ये पडताळून पाहत असतो. याची इतकी सवय होते, की कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्या मनात काय आहे? मला काय चूक किंवा बरोबर वाटते? कधी कधी जुनी यादी मनाला पटत नाही. परिणामी, आपले विचार प्रत्येक वेळी दुसऱ्या व्यक्तीकडून पडताळून घ्यायची सवय लागते. कारण मी चुकलो/चुकले तर? हा प्रश्‍न उद्‍भवत असतो. ज्याला आपण ‘Fear of Failure’ म्हणतो. एका विशिष्ट स्वरूपात विचार करीत असल्यामुळे, नवीन व वेगळा विचार आपण करू शकतो हे लक्षात नाही येत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मग काय करायचे?
आपली चूक व बरोबरची यादी वेगळी असू शकते, हे समजून घ्या. आजपासून ‘चूक की बरोबर’ या ओझ्यातून मुक्त होऊ. आपण काही प्रश्‍न स्वतःला विचारू
1) चुकलं तर काय होईल?
2) चुकलं नाही तर काय होईल?
3) चुकलं तर त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल?
4) चुकलं नाही तर त्याचा माझ्यावर काय परिणाम होईल?

एकदा या चार प्रश्‍नांची उत्तरे शोधायला सुरुवात केली की आपलं मन आपोआप सर्व शक्यतांची पडताळणी करतं आणि आपल्याला आपोआप सर्व गोष्टी स्पष्ट होतात. प्रत्येक मिळालेला सल्ला आपल्या परिस्थितीला योग्य किंवा अनुरूप असेलच असं नाही. आपली परिस्थिती, आपली पार्श्‍वभूमी फक्त आपल्याला माहीत असते. त्यामुळे एका नव्या आणि दुसऱ्या दृष्टिकोनासाठी आपण सल्ला जरूर घ्यावा. पण अंतिम निर्णय फक्त आपला असावा. म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे, ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’. एकदा निर्णय घेतला की आपल्याला मार्ग दिसतो. मार्ग दिसल्यानंतर कृती महत्त्वाची.

ती कृती करण्यासाठी गरज असते ती निर्णयांची जबाबदारी घेण्याची. आपल्या मनाला ठामपणे सांगा ‘मी जो निर्णय घेतला किंवा विचार केला तो माझा आहे. त्याचे सर्व परिणाम माझे आहेत. तो चुकला तरी मी परिस्थितीला किंवा संबंधित व्यक्तीला दोष देणार नाही.’ चूक की बरोबर याचा प्रमाणापेक्षा जास्त विचार न करता त्याची जबाबदारी घ्या आणि आत्मविश्‍वासाने आपल्या विचारांना व निर्णयांना कृतीमध्ये आणा! कारण...
‘Every choice has a price to pay.
Beauty is choosing which is worth the risk.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: supriya pujari article about wrong or right

टॅग्स