esakal | डिजिटल, टेलिमेडिसीनच्या पर्यायातून जीवदान शक्य; World Heart Day 2021
sakal

बोलून बातमी शोधा

world heart day 2021

हृदयविकाराचा झटका आल्यास १२० मिनिटांच्या आत उपचार मिळाल्यास जीवदान मिळू शकते.

World Heart Day 2021: डिजिटल, टेलिमेडिसीनच्या पर्यायातून जीवदान शक्य

sakal_logo
By
शिवाजी यादव -सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अचानक हृदयविकाराचा (Heart Attack)झटका आल्यानंतर उपचारापर्यंत पोहचण्यास होणाऱ्या विलंबामुळे मृत्यू ओढवत आहेत. जिल्ह्यात हे प्रमाण पाच ते सात टक्क्यांवर आहे. त्यामुळे झटका आलेल्या रुग्णाला १२० मिनिटांच्या आत उपचार मिळाल्यास जीवदान मिळू शकते. अशा स्थितीत डिजिटल हेल्थ, टेलिमेडिसीनच्या (Digital Telemedicine) सुविधा प्रभावी राबवल्याचा निश्‍चित फायदा आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाने तातडीने उपचार देण्याची सेवा सक्षमीकरण करणे अशी संकल्पना घेऊन यंदाचा जागतिक हृदय दिन साजरा होत आहे. याबाबत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हृदय वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत काही निष्कर्ष काढले आहेत. त्या आधारे हृदयरोगाविषयी जागृती केली जात आहे.

हृदयरोग आहे त्यांना किंवा हृदयरोगाची लक्षणे सुरू झाली आहेत अशांना तासातच किंवा काही कालावधीनंतर हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. अशा अचानकपणे येणाऱ्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ज्या व्यक्ती लक्षणे तातडीने ओळखतात, तातडीने उपचार घेतात त्यांचे प्राण वाचण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने उपचार ही बाब महत्त्वाची आहे. परदेशात सरासरी ६२ वर्षांनंतर हृदयविकाराचा झटका येतो, तर भारतात ५० वर्षांच्या आतच हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

जगभरात मृत्यू दर- २१ टक्के

४० ते ५० वयोगटांत झटका येण्याचे प्रमाण- २५ टक्के

४० वर्षांपेक्षा कमी वयात झटक्याचे प्रमाण- २५ टक्के

हृदय झटक्याची कारणे

  • अनुवंशकता

  • मधुमेह, लठ्ठपणाचे वाढते प्रमाण

  • तरुण वयात कामाचा वाढता ताण

  • सतत ऑनलाईन व जागरण

  • खाण्यातील असंतुलन

  • हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या

  • रक्त वाहिनीचा आकार जन्मतःच लहान असणे

(भारतीय व्यक्तीत २.५ ते २.७ मिलिमीटर, तर परदेशातील व्यक्तीत हा आकार ३.५ ते ४.५)

कमी वयात हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. झटका आल्यापासून १२० मिनिटांत रुग्ण रुग्णालयात पोहचणे, तपासणी व उपचार सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी झटका आला तिथून रुग्णाला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोचवत असतानाच गोल्डन अवरमध्ये टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञाकडून वैद्यकीय मार्गदर्शन, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे हृदय उपचाराचा दवाखाना, तेथील डॉक्टर, तपासण्या, उपचार सुविधा व खाटांची उपलब्धतेची माहिती तत्काळ देणारे केंद्र असावे. विशेषतः तालुकानिहाय अशा सुविधा सुरू झाल्यास हृदय रुग्णांना जीवनदान मिळणे शक्य होईल.

- डॉ. अक्षय बाफना, हृदयरोग तज्ज्ञ.

loading image
go to top