मुलांना अडचणींचा सामना करायला शिकवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lifestyle
मुलांना अडचणींचा सामना करायला शिकवा

मुलांना अडचणींचा सामना करायला शिकवा

अनेकदा अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत, घडत नाहीत. त्यामुळे लहानपणापासून समृद्धीपेक्षा अडचणींचा सामना कसा करायचा, हे मुलांना शिकवणं महत्त्वाचं आहे. मात्र आपण हे करत नाही, मग कठीण प्रसंगाला सामोरं कसं जायचं, हे मुलांना कसं कळणार?

डॉ. समीर दलवाई

दिवाळीत शुभेच्छा देण्यासाठी माझे स्नेही व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अद्वणकर यांच्या घरी मी दरवर्षी जात असतो. यंदाही गेलो तेव्हा बोलताना वहिनींनी मला एक प्रश्न विचारला, आज आपल्याकडे घराघरात एवढी समृद्धी, श्रीमंती पाहतोय, तरीही मुलं एवढी निराश का होतात? आत्महत्यांची संख्या का वाढतेय? खरंच समृद्धी-श्रीमंती वाढत असताना नैराश्याचं प्रमाणही वाढलं आहे... असं का व्हावं, हा प्रश्न पडतो.

काही दिवसांपूर्वी आसाममधील एक जोडपं आपल्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये आलं. मूल अतिचंचल आहे, शांत बसत नाही, दिवसभर मोबाईल बघतो, अभ्यासात जराही लक्ष नसतं, शिक्षकांचं ऐकत नाही, आगाऊपणा करतो वगैरे वगैरे त्यांच्या तक्रारी होत्या. पालक एका कंपनीचे संचालक होते. मुलाला तपासल्यानंतर त्याला न्यूरॉलॉजिकल अथवा इतर काही आजार नसून केवळ वर्तनाचा स्वभाव दोष आहे, हे लक्षात आलं. मोठ्या घरी श्रीमंती, समृद्धी आणि आदेशाचं पालन असं वातावरण असतं. आपणही याचाच एक भाग आहे, असं समजून मूलही असंच वागू लागतं. पालक मला म्हणाले, की माझ्या मुलाचा कर्मचारी आणि इतरांसोबत बोलताना जो टोन आहे ते ऐकून मलाही असं वाटतं की तो त्यांना एखाद्या बॉसप्रमाणे आदेश देतो. हे मला जराही पटत नाही, असं ते म्हणाले.

मूल आपल्या आई-वडिलांच्या अवतीभोवतीचं श्रीमंतीचं वातावरण पाहतात. तेही स्वतःला त्याचा एक भाग समजतात आणि त्याप्रमाणे वागतात. इंग्रजीत त्याला इंडोमेंट सिंड्रोम असं म्हणू शकतो. मराठीत ‘महाराज’ सिंड्रोम असं म्हणतात. त्यामध्ये मुलाला असं वाटतं, की मी महाराज आहे आणि सर्वांनी माझ्या मनासारखं वागायला हवं. हल्ली थोड्या-अधिक प्रमाणात सर्व घरांत असा प्रकार नेहमीचा झाला आहे. बहुतांश जणांच्या घरी श्रीमंती, समृद्धी आहे. पूर्वीसारखी मोठी कुटुंबे राहिलेली नाहीत. त्यात आई-वडील नोकरी करतात. त्यामुळे मुलांना कुणीच वेळ देत नाही. मुलांवर खर्च करणे हा एकमात्र पर्याय त्यांच्याकडे उरला आहे, असं त्यांना वाटू लागतं. वेळ नाही, त्यामुळे मुलं जी मागणी करतात, ती पुरवंली जाते. मुलांना नाही, असं सांगणं फार अवघड जातं. हळूहळू आई-वडिलांचं माझ्यावर खर्च करणं, माझं ऐकणं हे एक कर्तव्य आहे, असं मुलाला वाटायला लागतं. ‘नाही’ हा शब्द मुलाच्या कानावर पडत नाही. मग मूलही हा शब्द कधीच गृहीत धरत नाही.

ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात, ‘मन का हुआ तो अच्छा, न हुआ तो और भी अच्छा.’ या वास्तवापासून ही मुलं फार लांब असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यात नैराश्याचे क्षण येतात. हे जीवनाचं अभिन्न सत्य आहे. अनेकदा अनेक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. त्यामुळे लहानपणापासून समृद्धीपेक्षा अडचणींचा सामना कसा करायचा, हे मुलांना शिकवणं महत्त्वाचं आहे. मात्र आपण हे करत नाही.

आता मुलांना पूर्वीप्रमाणे त्यांच्या शिक्षकांचा धाक उरला नसल्याचं अनेक पालक मला नेहमी सांगतात. मात्र, एखाद्या शिक्षकाने मुलाला धाक दाखवला, तर पालक स्वतः त्याच्याविरोधात तक्रार करायला पुढे असतात. मुलाच्या भावना दुखावल्याची पालकांची तक्रार असते. मात्र, जगात सर्वांच्या भावना दुखावतात, त्या वेळी ती परिस्थिती कशी हॅण्डल करायची हे मुलांना शिकवलं पाहिजे. मुलांचं जीवन सोपं कसं होईल, त्यांचं मन दुखावलं जाणार नाही, याकडे पालकांचं लक्ष असतं. मुलांना त्रास नको म्हणून अगदी शाळेतील प्रोजेक्टही आपण पैसे देऊन बाहेरून करून घेतो. त्यामुळे आपण मुलांना सर्व गोष्टी सोप्या करून देत असतो. ‍जीवन सोपं करून दिलं, असं आपल्याला वाटतं. मात्र, खरं तर आपण त्यांचं आयुष्य-‍ जीवन अडचणीचं करतोय, हे आपल्याला तेव्हा कळत नाही. मुलांचं आयुष्य जेवढं सोपं करायला जाल, तेवढं ते अडचणीचं होणार आहे.

मुलासाठी भरपूर प्रॉपर्टी, संपत्ती आणि पैसा सोडून जाणं, हे पालकत्वाचं ध्येय आहे का? कारण मूल काही दिवसांत त्या संपत्तीची विल्हेवाट लावू शकतात. मुलांना अधिकाधिक शिक्षण दिलं, हे पुरेसं आहे का? कारण शिक्षणाने मुलं नैराश्यावर मात करतील, असंही नाही. अलीकडे उच्चशिक्षित मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं दिसतं. मुलाने स्वत:चं जीवन आनंदाने जगलं पाहिजे आणि लोकांना प्रेमाने वागवायला हवं, यासाठी त्यांना कायम प्रोत्साहित करणं हे पालकत्वाचं ध्येय असलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यासाठी मुलांना पैसे असताना नव्हे तर पैस नसताना कसं जगायला पाहिजे, याचं शिक्षण मिळायला हवं...

गौतमबुद्धांनी जीवनातील चार आर्यसत्यं सांगितलीत. त्यातील एक सत्य हे, जीवन हे दु:खाने भरलेलं आहे. हे सत्य आपल्या मुलाला कठोरपणे सांगितलं नसेल, तरी कमीत कमी जीवन अडचणींनी भरलं आहे, हे तरी सांगायला हवं. मुलांपासून हे सत्य लपवण्यात काहीच अर्थ नाही. मुलांना हे कळलं नाही, तर जीवन सोपं आहे, अशा भ्रमात ती जगतात. त्यातून सर्व गोष्टी माझ्या मनाप्रमाणे व्हायला हव्यात, असा दुराग्रह विकसित होतो. मात्र, आई-वडील नसताना काय? याचा विचार करायला हवा.

एखादा मुलगा परीक्षेत नापास होतो किवा त्याला एखादी मुलगी नकार देते... मनाप्रमाणे गोष्टी झाल्याच पाहिजेत, असं ज्या मुलाला वाटतं, त्याच्या भ्रमाला त्या अपयशाने किंवा नकाराने तडे बसतात आणि मूल दोन टोकाच्या गोष्टी करू शकतो. त्या नकार दिलेल्या मुलीवर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा स्वतःचं बरं-वाईट करण्याचा विचार होऊ शकतो. त्याला नकार पचवण्याची ताकद द्या. घरातील नोकरचाकरांना फटके मारताना कुणी थांबवलं नसल्याने तो नकार पचवू शकत नाही. म्हणूनच पालकांनी आपल्या मुलांना अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार करण्याची गरज आहे. अडचणीच्या काळात आम्ही तुझ्याबरोबर आहोत, हा विश्वास त्याला दैनंदिन आयुष्यात द्या. यश लगेच आलं नाही, हरकत नाही; मात्र त्यांना पाठबळ द्या. मार्गदर्शक बनून मुलाला प्रत्येक गोष्टीसाठी लढायला शिकवलं पाहिजे. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. हल्ली पालकांना वेळ देणं शक्य होत नाही. म्हणून त्याला पर्याय म्हणून मुलाला आपण एटीएम, क्रेडिट कार्ड ऑफर करतो. पालक क्रेडिट कार्ड आहे असं मुलांना वाटत असेल, तर ते एके दिवशी स्वीच ऑफ होणार आहे... त्यानंतर काय, याचा विचार करणं आवश्यक आहे.

वयाच्या अनुषंगाने जे नैराश्य त्या त्या काळातील परिस्थितीनुसार येणार आहे, त्या सर्व अडचणींना सामोरे जाण्यासाठी मुलांना थांबवू नये. त्यावर पांघरूण घालू नये. मूल काही चुकीचं करत असेल तर त्याला न ओरडता, न मारता समजावून सांगा, की हे थांबव... तू चुकतोयस. असं करू नको. त्यापुढे जाऊन हे मी खपवून घेणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. बजेट हे केवळ पैशाचं नाही तर वेळेचंही आहे. किती वाजता मी काय केलं पाहिजे, किती वेळ मी व्हिडीओ गेम खेळला पाहिजे, मोबाईल बघायचा असेल तर तो किती वेळ, त्याबाबत काही मर्यादा असली पाहिजे. त्यावर एक स्वयंशिस्त असली पाहिजे आणि मुलांना स्वत:हून नियम पाळणं, तसं करायला शिकवणं आवश्यक आहे. जे चार तास आहेत, त्या अमुक वेळात अमुक टास्क करणं, या प्रत्येक गोष्टीचं बजेट करायला आपण त्याला शिकवलं तर त्याला आकार देताना आपण स्वत:ही काही शिकू शकतो. मुलाने कुठल्याही आपत्तीजनक परिस्थितीत वा संकटाच्या वेळी नैराश्य येऊ न देता हिमतीने सामोरं जाणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी नियोजनाची खूप मोठी गरज असते. मुलाच्या आयुष्यात अडचणी ही सामान्य गोष्ट आहे. कदाचित समृद्धीपेक्षा अडचणी जास्त येत असतात. जर मुलांना खरी गोष्ट कळली, तर मुलांना स्वतंत्रपणे आपलं जीवन जगायला शिकणं सोपं होईल.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत)

loading image
go to top